Marathi

|| आनंदसूक्त ||

|| अर्थात आनंदाचे सामगान ||

या किरणानो त्वरा करा रे, आनंदाचे गीत म्हणा रे ,
दु:ख मनातील सर्व पुसा रे, आशेचे नवगीत म्हणा रे ||१||

दूर जाऊद्या मळभ मनाचे, आनंदाचे गीत म्हणा रे |
निराश किरणे दूर करा रे, प्रेमाचे नवगीत म्हणा रे ||२||

उदात्ततेचे नवरंग येऊ द्या, भीतीचे भयसूर जाऊ द्या |
हर्षमानसी सामगान ते, वसुंधरेचे सूक्त होऊ द्या ||३||

घाबरलेले समाज मन हे, उक्त होउनी पुलकित आता |
आशेचे नवगीत स्वरांकित, मनामनाचे मंत्र होऊ द्या ||४||

जातील आता सर्व वेदना, सामगान ते गाऊ या |
सूक्त प्रीतीचे आनंदाचे, सर्व मिळूनी गाऊ या ||५||

हरल्या चिंता हरली दु:खे, आनंदाचे स्वरसुर नवे |
चला पाहू या सर्व मिळूनी, विश्वाचे उन्मेष नवे ||६||

सुंदर सारी वसुंधरा ही, विश्वाचे नवगीत असे |
मनामनाची पुलकित सुमने, ईशावास्य उपनिषद असे ||७||

सप्तसुरांचे मेघनादही, गीत मनाचे होऊ द्या |
दु:खवेदना हरवित आता, मननभ सारे उजळू द्या ||८||

धरती सारी पुलकित आता, बीज सुखाचे पेरू या |
निशा संपली काळोखाची, नवरूप मनाचे पाहू या ||९||

स्वरगीत नवे हे आरोहाचे, अवरोहाचा निषाssद नसे |
हृदयी भरले चैतन्याचे, आनंदाचे नवगीत असे ||१०||

वसंत आता मनात फूलला, आनंदाची धवल फुले |
विसरून सारे दु:ख आता ते, प्रेमाची मनमुक्त फुले ||११||

यज्ञ सुखाचा पूर्ण जाहला, दु:ख आहुति देऊनी |
सामगान हे नवराष्ट्राचे, नित्य स्मरू या नित्य मनी ||१२||

भुतकाळाची भूते आता, सुख मंत्राने लुप्त जाहली |
पुनश्च हरी ओम मंत्र रवाने, मनात कुसुमे फुलूनी आली ||१३||

नको निराशा नकोच शंका, विसरून जाऊ कृष्णनभा |
दाटुनी आले सुखस्वप्नाचे, हर्ष मनाचा स्वरमेघ नवा ||१४||

हरी मनाचा कृष्ण भावही, तोच मनाचा नित्य सखा |
प्रेम तयाचे अनंत आता, मनी बहरला राग नवा ||१५||

स्नेह मनाचा भाव असावा, प्रेमाचा मधुरंग नवा |
आरोहातुनी सहज विहरता, हरीहराचा मनी गंध नवा ||१६||

विषजंतूची काळरात्र ती, भयभीत सारे दुस्वप्न असे |
प्रभात झाली आज नवी ही, सुखमंत्राचे गीत नवे ||१७||

मनी आठवा हरी नामाला, रूप तयाचे शांत असे |
मनी तयाला सतत पाहता, सुखस्वप्नाचा स्वर्ग असे ||१८||

मंत्ररवाने पुलकित आशा, इंद्रधुनचे नभरंग नवे |
शितल सुंदर बहरत आली, नव्या मनाची दिव्यफुले ||१९||

नभी उगवला नव प्रकाशही, नव्या युगाचे गीत नवे |
मन आकाशी सुर उगवले, हरी नामाचे मंत्र नवे ||२०||

सरल्या चिंता सरली दु:खे, आता निराशा मनी नसे |
आनंदाची रंगीत कुसुमे, गीत इशाचे रूप असे ||२१||

फुले बहरली मने बहरली, दु:खाचा लवलेश नसे |
नभात आता प्रकाश सुंदर, मनात आता ईश वसे ||२२||

सप्तसुरांचे सामगान ते, मनामनाला फुलवित आहे |
आज नभाचा रंग निराळा, धुंद स्वरानी आळवित आहे ||२३||

नभात सारे विहंग दिसती, मनात सारी स्वप्ने असती |
स्वप्न मनीचे सुंदर असती, जगात सारे सुंदर असती ||२४||

दु:ख उगा का मनी आणसी, सुखे न का तु मनी पाहसी |
मनी प्रवसले सुख स्वप्नाचे, तेच प्रसवते जगी पाहसी ||२५||

उगाच चिंता मनी कशाला, दु:ख पेरणी करी कशाला |
सुखे सुखाची करी कल्पना, सुखे पावसी त्वरा कशाला ||२६||

विश्वे असती अनंत कुसुमे, मनी तयाचा ध्यास धरी |
सत्यामध्ये स्वप्न उतरण्या, कार्य योजना पुरी करी ||२७||

अवचित गवसे क्षणात सारे, यत्न मनी तु करुन पहा |
गवसे मनीचे स्वप्न तुलाही, यत्नाचा आधार हवा ||२८||

कधी कुणा ना अशी गवसली, अवचित सारी स्वप्नफुले |
विचार याचा मनी करुनी, कर यत्नाची गिरिशिखरे ||२९||

जगी कधीही कुणा न मिळते, सहजची ऐसे भाग्य असे |
केल्यावाचून कधी न मिळते, साधेही अनुमात्र असे ||३०||

युगायुगांच्या पानावरती, दिव्य महात्मे कोरून गेले |
नाव तयांचे कार्यासाठी, महाकार्य ते करून गेले ||३१||

साधे छोटे कसे कसेही, कार्य मात्र ते करून पाही |
लोका त्याचे रुचे महत्वही, चिंता त्याची करू न काही ||३२||

समाज सारे देतो आम्हा, ऋण तयाचे घेतो तु |
कधी फेडण्या ऋणही त्याचे, काय कधीरे करतो तु ||३३||

सुखात सारे लोळत असता, कार्यामध्ये मग्न असे |
ऐसे असते रूप तयाचे, महापुरुष जे असती रे ||३४||

ऐसे असते तैसे असते, वृथा वल्गना करू नये |
आम्ही काही केले असते, असत्य वाणी वदू नये ||३५||

धैर्य धरावे मनी सदाही, धीर कधीही हरू नये |
सहजची काही कधी न गवसे, यत्न तरीही हरू नये ||३६||

कार्यकुशलता अशी असावी, कार्य सुलभ ते भासावे |
नसता मात्र कार्यकुशलता, तरी कार्य ना नासावे ||३७||

ऐशी कुठली विद्या नाही, यत्न करूनी ना मिळते |
साहसयत्न पुरे करुनी, खचितची विद्याही मिळते ||३८||

कधी कुणीही प्रयत्न करता, पाऊल मागे घेऊ नये |
यत्न मात्र तो करीत असता, मनी भिऊनी जाऊ नये ||३९|

कधी गवसले कधी कुणाला, सहजची यश ते मात्र सुखे |
यत्नावाचून कधी न गवसे, लवलेश सुखाचा मात्र असे ||४०||

रामालाही गुरुगृही ती विद्या गवसे, विना तयाला ना मिळते |
कृष्णालाही सांदीपनीची, विद्या ऐशी ना मिळते ||४१||

धैर्य धरावे मनी सर्वदा, मार्ग यशाचा दूर असे |
अवचित सारे सोडून देता, यश प्राप्ती ती दूर असे ||४२|

कार्यासाठी मनी योजना, स्वछ असावी स्पष्ट कल्पना |
आखीव रेखीव स्वल्प बिंदूची, पूर्ण करावी मनी कल्पना ||४३|

साधन सारे स्पष्ट असावे, स्वछ असावी स्पष्ट योजना |
मार्गामध्ये धोके कसले, आधीच त्याची करी योजना ||४४||

स्पष्ट योजूनी उपाय त्याचे, परी करावी कार्य कल्पना |
सहजची सारे साध्य नसे ते, करून याची खरी कल्पना ||४५||

छोट्या छोट्या बिंदूनाही, योजून मापून करी योजना |
खचितची होई कार्यपूर्णही, मनी बांध तु शब्दखुणा ||४६||

समुहामध्ये कार्य करे जो, तोच यशाचा धनी असे |
हेच विसरुनी योजन करता, यश प्राप्तीचा मार्ग नसे ||४७||

सहचर सारे गुणी असावे, भूमिका त्यांची स्पष्ट असावी |
सूक्ष्म अति ते मनी योजुनी, कार्यप्रणाली योग्य असावी ||४८||

विविध योजना विविध कल्पना, सारे सारे ऐकून घ्यावे |
चर्चा करुनी सवे सर्वदा, यश सर्वांना वाटून द्यावे ||४९||

यंत्र असावे तंत्र असावे, कार्याचे आसमंत असावे |
प्रत्येकाला कार्यमध्ये, आनंदाचे भाग्य असावे ||५०||

आयुष्याची समान रेषा, कधी कुणाला ना मिळते |
तरी मानसी ईछ्या करता, ईप्सित सारे ते मिळते ||५१||

शिकण्याला विराम नसे, शिकण्याला आराम नसे |
जगी बदलते आहे सारे, विद्येचा आभास असे ||५२ ||

शिकणे आता जूने जाहले, नव्या युगाच्या नवीन वाटा |
खुल्या मनाने स्पष्ट पाहता, दिसतील सुंदर मनोज्ञ वाटा ||५३ |

एक नसे विषय आता तो, बहू आता विज्ञान नवे |
ध्येय प्राप्तीची आशा असता, बहू आता कौशल्य हवे ||५४||

मनी असाव्या जून्या कल्पना, समोर येती नव्या कल्पना |
कवेतघेण्या आकाशाला, नव्या युगाच्या दिव्य कल्पना ||५५||

कधी न केले कार्य असे ते, नव्या युगाचे कार्य असे |
नवीन काही करण्यासाठी, जुन्या युगाचे साम्य नसे ||५६||

जुन्या कल्पना जुनी साधने, कुचकामी जी होऊन गेली |
त्यांच्या जागी नव्या युगाची, नवी कल्पना उगवून आली ||५७||

मनात साऱ्या शंका आता, संशय आता कुठे नको |
स्पष्ट असाव्या कार्यकल्पना, दु:खाचा लवलेश नको ||५८||

संकट वाटे नवीन ऐसे, कार्य कधीही करू नको |
पराभवाच्या भीतीने तू, कार्य तरिही सोडू नको ||५९||

सातत्य असावे योजनेतही, धरसोड कधीही करू नको |
संकट येता सहकार्याने, मनी निराशा धरू नको ||६०||

सरलही नसती मार्ग सदा ते, तरी योजना सोडू नको |
येता संकट धीर मनाने, धैर्य मनाचे सोडू नको ||६१||

मनात कसले दु:ख नको अन, भीतीचा लवलेश नको |
कार्यप्रवणही तू सदैव असता, उगीच चिंता मनी नको ||६२||

कितीही योजना सुंदर केल्या, संकट कैसे आले हे |
विचार ऐसा करतो तेव्हा, हरण्याचा तो मार्गच रे ||६३||

मुक्त कल्पना मुक्त भावना, मुक्त मनाने येऊ दे |
नव्या युगाचे नवीन वारे, यशोगान ते होऊ दे ||६४||

तैसे तेव्हा केले होते, सदाच ऐसे बोलू नको |
सहकार्याच्या नवीन कल्पना, स्वार्थासाठी सोडू नको ||६५||

सगळे आपुले मुक्त असावे, शांत करावे धीर मना |
ऐकून साऱ्या नवीन कल्पना, धरी युगाचा मार्ग नवा ||६६||

समानतेच्या सर्व कल्पना, मनी तशा हृदयात वसू दे |
अशक्य सारे कधी न वाटे, नव्या यशाचे मार्ग दिसू दे ||६७||

काही अशक्य नसते, सारे मनात असते |
मनी भासता अशक्य, काहीच शक्य नसते ||६८||

सारेच शक्य असते, ऐसाच भाव व्हावा |
सारेच शक्य आहे, मनी भाव हा रुजवा ||६९||

सारेच कार्य करण्या, नसते कुणी समर्थ |
प्रत्येक कार्य करण्या, असते कुणी समर्थ ||७०||

अंगात साठलेले गुण कोणते समर्थ |
शोधुनी कार्य करतो तोची असे समर्थ ||७१||

सर्वात सर्व सारे, गुण का कधी मिळाले |
त्याच्यात काय आहे, हे शोधणे निराळे ||७२||

शोधीत लुप्त असती, वाटा नव्या यशाच्या |
सहकार्य सर्व करता, साऱ्याच त्या यशाच्या ||७३||

विश्वास हा मनाचा, व्यापुनी सर्व विश्वा |
अप्राप्य प्राप्त करसी, हा मंत्र रे यशाचा ||७४||

जीवनात ध्येय आपुले, ऐसे तरी असावे |
दिव्यार्थ प्राप्त करण्या, आयुष्य ते जगावे ||७५||

जगण्यात अर्थ असतो, राष्ट्रास अर्पण्याचा |
जगतो समाज तेव्हा, सारेच अर्पण्याचा ||७६||

धनकिर्ती जीवनात, ऐश्वर्य ही असावे |
इतुकेच ध्येय असता, जगणेच का म्हणावे ||७७||

कित्येक किर्तीवान, होऊन येथ गेले |
उरले न काही त्यांचे, स्मरते न नाव येथे ||७८||

काही असे करावे, जे वेगळे असावे |
उत्कृष्ट दिव्य करुनी, स्मरणात ते उरावे ||७९||

आम्हास देश देतो, जगण्यास जीवनाला |
आम्हीही काय देतो, विचार तु मनाला ||८०||

आयुष्य स्वप्न जैसे, रंगात साठलेले |
काहीतरी तरी करावे, स्वप्नात पाहिलेले ||८१||

ते स्वप्नही असावे, देशास वैभवाचे |
लाभो तयास सारे, हृदयात पाहिलेले ||८२||

जलवायु सर्व आम्हा, देते वसुंधरा ही |
ऋणमुक्त या धरेचे, करणे आम्हास काही ||८३||

नरसिंह तो प्रगटता, भयभीत हिरण्यकशपू |
तैसेच ते कराया, प्रल्हाद सर्व होऊ ||८४||

ही हिंदूभूमी आपुली, आहेच वीर प्रसवा |
बाजीप्रभू निमाला, तैसा हमीद अपूला ||८५||

भूमीलोभ मत्तसत्ता, असती विक्राळलेल्या |
चहूबाजूनीच त्यांच्या सेना उभारलेल्या ||८६||

ही श्वापदे अशी ही, जातीच भक्षकांच्या |
आहेत सज्ज साऱ्या, लचकेच तोंडण्याला ||८७||

जातीच असुर यांच्या, ही क्रुद्ध ही गिधाडे |
खाण्यास हिंदू राष्ट्रा, निर्लज्ज ते निघाले ||८८||

नीच क्रूर हीन यांची, सारीच दैवते की |
खाण्यास मानवाला, टपली सदैव सारी ||८९||

याना न दु:ख कसले, ना लाजही कशाची |
आपल्याच सैनिकाना, ते पाडती धरेशी ||९०||

देशात अंतरात, आपलेच शत्रु असती |
बाहेरचे रिपूला, हे प्रेम् मात्र करती||९१||

जयचंद होत मागे, अथवा तसेच दुष्ट |
पोसून या धरेने, मातेस छळती दुष्ट ||९२||

यांचे इमान ऐसे, आहे गहाण तेथे |
हे गाती महती त्यांची, मातेस मारती हे ||९३||

यांना न वाटते ही, ही लाज ही कशाची |
विकती इमान सारे, मातेस काळ असती ||९४||

विषजंतू क्रूर कितीही, असतो तसा तरिही|
हे बेईमान इतके, आईस विकून खाती ||९५||

देशास विकणारे, इतके दलाल आहे|
आपल्याच आईचीही, लुटतात अब्रू आहे ||९६||

खातात अन्न इथले, गातात स्तोत्र त्यांचे |
निर्लज्ज ना नितीही, पद चुंबतात त्यांचे ||९७||

यांचेच शब्द तेथे, आपल्या उरिच येती|
आपलेच रक्त यांना, आनंद खूप देती ||९८||

पैशास विकणारे, आपलेच स्वत्व सर्व |
फिरती निलाजरे हे, देशास विकुनी सर्व ||९९||

इतके भयाण दुष्ट, फिरती सभोवताली|
तरी राष्ट्र हे जगवण्या, कर आपली तयारी ||१००||

राहो सदैव माझा, हा देश मुक्त आपुला |
उत्क्रांत संस्कृतीचा, वेदात पाहिलेला ||१०१||

© मुकुंद भालेराव
| औरंगाबाद | ऑक्टोबर २, २०२० |

Share this on:

3 thoughts on “|| आनंदसूक्त ||

  1. केवळ अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत. कविता गेय आहे. जणू एखाद्याचे आत्मगानच. ओघवती भाषा आणि समर्पक बोल दुग्ध शर्करा योग.
    असाच व्यक्त होत रहा.
    मनोमन शुभेच्छा..

  2. आदरणीय दादा आपण या रचनेतुन खुप छान अशी बांधणी सर्व विषयांची केलेली आहे.धन्यवाद

Comments are closed.

©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top