Marathi

आनंदाचे पर्व नवे

धुक्यात झाली पहाट ओली, रवि किरणांचे नृत्य नवे |
नभानभाच्या सुवर्ण महिरपी, आशेचे हे गीत नवे ||१||

मधुर सुंदरी धुक्यात ओली, शब्दांचे हे गीत नवे |
शांत मानसी शुद्ध स्वरूप हे, आत्म्याचे नवरूप नवे ||२||

गोड अशी ही धुन मनातील, धुक्यात हरवली मुक्त मने |
धुंद मानसी गीत असे हे, कवितेचे स्मितरूप नवे ||३||

वसुंधरेच्या नव्या कल्पना, स्वर्गाचे नवरंग नवे |
मनात साऱ्या नव्या भावना, रंगांचे आसमंत नवे ||४||

वसुंधरेची नवी वल्कले, ताऱ्यांचे नीजरूप दिसे |
रजनीकांत तो नभी उगवता, प्रेमाचे नव रूप दिसे ||५||

शुद्ध मनाला सर्व गवसले, अंतरातले स्वर्ग नवे |
सोन्यालाही लाजविणारे, नात्याचे नवबंध नवे ||६||

शुद्ध भावना शुद्ध कल्पना, आशेचे नवकिरण नवे |
नभातले हे मनात सारे, कुणी गातसे गीत नवे ||७||

कशास चिंता वृथा आता ह्या, दु:खाचे प्रतिबिंब नसे |
मनी कल्पना आनंदच्या, कवितेचेही स्वप्न नवे ||८||

उदयगिरीवर प्रभा उगवली, रंगपताका स्नेहाची |
मनात फुलली दिपावलीही, आकाशाचे रंग नवे ||९||

जुने बहाणे नव्या कहाण्या, नात्याचे हे पदर नवे |
मिळून आले मनामनाचे, आनंदाचे पर्व नवे ||१०||

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top