Marathi

आनंदाचे वृत्त नवे

गुढी उभारू आनंदाची, चिंता साऱ्या दुर करू,
मळभ मनातील दुर हटविण्या, आनंदाचे पर्व करू….

आता जाऊ द्या चिंता साऱ्या, उगा कशाला दु:ख हवे,
सृष्टीच्या ह्या वसंत ऋतुला, नवस्वप्नाचे सुख हवे…

जंतुतंतुच्या चिंता साऱ्या, आता विलया जाऊ द्या,
नव्या मनुच्या नव्या कल्पना, पुनः एकदा येऊ द्या…

सामगानही शुद्ध ऋचांचे, पुनः एकदा होऊ द्या,
दु:ख जंतूच्या सर्व तमाला, शुभ मंत्रानी जाऊ द्या….

यज्ञामधल्या ज्वालानी त्या, आसमंत हे उजळू द्या,
प्रदीप्तज्वाला अग्निशिखांनी, लक्ष रवी हे तळपू द्या..

मंगलघटिका नव वर्षाची, शांती यज्ञ ते होऊ द्या,
मनामनातील आनंदाचा, वसंततिलक हा होऊ द्या..

चैत्रप्रतिपदा आनंदाची, गुढी उभारू हर्षमने,
उमलुनी आपल्या हृद्यमनाला, दु:ख घालउ दुंदुभिने..

आता कशाला उगाच चिंता, दु:खवेदना जाऊ द्या,
नव्यायुगाच्या नवीन कल्पना, हर्ष सोहळे होऊ द्या…

सृष्टिमधले सुंदर सारे, पवित्र सारे येऊ द्या,
वृथा कल्पना नैराश्याच्या, सप्तसूरांनी जाऊ द्या..

मंगल सारे उदात्त आता, नभोमंडपी लक्षदिवे,
सुखस्वप्नाच्या सूक्तरवांनी, गंधर्वांचे गीत नवे….

दूर जाहल्या दु:खतमांच्या, साऱ्या निशा लुप्त आता,
आता तयारी आनंदाची, नवविश्वाचा दीप नवा….

विश्व जाहले प्रसन्न आता, आत्म्याचे नवसूक्त नवे,
मनामनातीला हर्ष मानसी, स्नेहाचे मधुपुष्प नवे….

अंतरिक्ष नी सर्व देवता, सर्व गायति आनंदाने,
कल्याणाच्या सप्तसूरांनी, प्रदत्त करती आशीर्वचने….

चल गाऊ या संगे आपण, शांतिमंत्र ते उच्च रवे,
हिरण्यगर्भा प्रसन्न करण्या, आनंदाचे वृत्त नवे…

|| मुकुंद भालेराव || | औरंगाबाद | चैत्रशुद्ध प्रतिपदा |

Share this on:

One thought on “आनंदाचे वृत्त नवे

  1. सुंदर कविता. नवीन वर्षाच्या आपणास शुभेच्छा

Comments are closed.

©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top