Marathi My Articles

लोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं

(१) पुराणांची पार्श्वभूमी व स्वरूप:
वर्तमान हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणाधिष्टित असून, हिंदू धर्माला अंगभूत असलेल्या असंख्य तात्विक व व्यावहारिक संकल्पना पुराणांनी विशद केल्या आहेत. त्यांनी वैदिक धर्मातील यज्ञादींचे महत्व कमी करून हिंदू धर्माला एक नवे वळण देण्याचे काम केले. वैदिक मंत्रांच्या बरोबरीने पौराणिक मंत्र वापरले जाऊ लागले. देवपूजा, राज्याभिषेक, मूर्तीस्थापना इत्यादि बाबतीत पौराणिक पद्धत पुढे आली. पुराणांनी पुण्यप्रपाटीचे अनेक सोपे मार्ग दाखविले. त्यांनी विविध प्रकारच्या व्रते व उपासना सांगितल्या. उपवासांचे महत्व वाढविले. तीर्थक्षेत्रांच्या महिमा सांगणारी स्वतंत्र महात्म्ये अनेक पुराणात आहेत. तीर्थयात्रा व तीर्थस्नान यांचे महत्व वाढले. भक्तीचे माहात्म्यही पुराणांनी वाढविले. भक्तीचे लौकिकी, वैदिकी व आध्यात्मिकी, मानसी, वचिकी, व कायिकी आणि सात्विकी, राजसी व तामसी इ. विविध प्रकार करण्यात आले. जप, नामस्मरण, मूर्तीपूजा, मंदिराची निर्मिती इत्यादींना पुराणांकडून प्रोत्साहन मिळाले. बहुजन समाजापर्यन्त धर्माचे ज्ञान पोहोचविण्याची मोठी कामगिरी पुराणांनी पार पाडली आहे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रभाव वाढवला, स्त्री-शुद्रांनाही मोक्षाचा मार्ग खुला केला, बौद्धधर्माकडे वळलेल्या लोकाना परत हिंदू धर्मात आणले, जैनधर्माचा प्रभाव कमी केला आणि तीर्थयात्रा, दांन, व्रते, जप इत्यादींचे महत्व वाढवून हिंदू धर्माचे सध्याचे स्वरूप सिद्ध केले, ही त्यांची कार्ये ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची आहेत. ‘पुराण’ या शब्दाचा वाच्यार्थ ‘प्राचीन’ असा आहे. वायुपुराणाच्या मते पुरा (पूर्वी) आणि अन् (अस्तित्वात असणे) ह्या शब्दांपासून ‘पुराण’ हा शब्द बनलेला असून ‘पूर्वी अस्तित्वात असणारे’ असा त्याचा अर्थ आहे. पद्मपुराणाच्या मते परंपरेची इछा करणारे, ते पुराण होय. ‘पुरा नवं भवति इति पुराणम्’| (नारदपुराण) जे प्राचीन असूनही नित्यनूतन भासते, ते पुराण अशी याची व्याख्या केली जाते. रघुवंशामध्ये ‘पुराण पत्रापग मागन्नतरम्’ | अशीही एक व्याख्या आढळते. वैदिक वाङमयांमध्ये, ‘प्राचीन: वृतान्त:|’ असाही उल्लेख सापडतो. पुराण या शब्दाचा उल्लेख वारंवार अनेक वैदिक वाङमयात आढळतो. अथर्ववेदामध्ये, ‘ऋच: सामानि छंदासि पुराणं यजुषा सह’ (ऋगवेद:११.७.२) असा उल्लेख आहे. शतपथ ब्राम्हणात तर पुराणवाङमयाला वेदसुद्धा म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदात, ‘इतिहास पुराणं पंचम वेदानांवेदम्’ (७.१.२) पुराणास वेद म्हटले आहे. ‘इतिहास पुराणाभ्यां वेदार्थमुप ब्रूंहयेत | अर्थात वेदाचा विस्तार पुराणांद्वारा करावयास हवा असे म्हटले आहे. पुराण कशाला म्हणावे याची व्याख्या मत्स्यपूराणात दिलेली आहे. ती अशी:
‘सर्गश्च्य प्रतिसर्गश्च्य वंशो मन्वंनराणि च | वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणं ||’
अ) सर्ग: पंचमहाभूते, इंद्रियगण, बुद्धी आदि तत्वांच्या उत्पततीचे वर्णन
ब) प्रतिसर्ग: ब्रम्हादिस्थावरांत संपूर्ण चराचर जगताच्या निर्मितीचे वर्णन
क) वंश: सूरीचंद्रादि वंशांचे वर्णन
ड) मन्वंतर: मनु, मनुपुत्र, देव, सप्तर्षि, इन्द्र आणि परमेश्वराच्या अवतारांचे वर्णन
इ) वंशानुचरित: प्रतिवंशाच्या प्रसिद्ध पुरूषांचे वर्णन

अशा पाच लक्षणांनीयुक्त संहितेला ‘पुराण; म्हणतात. भारतीय पुराणे म्हणजे इतिहास असे मानले जाते, पण प्रत्यक्षात पुराणांत इतिहास आहे. एक समजूत अशी ही आहे की, ब्रम्हदेवाने सर्वप्रथम ज्या धर्मग्रंथाची रचना केली ते म्हणजे ‘पुराण’.
मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयम् | अनापलिंनगकूस्कानि पुराणानि पृथक्रु ीथक् || या श्लोकाप्रमाणें जी 18 महापुराणें आहेत ती खालील प्रमाणे आहेत.
(1)अग्नि पुराण (2) कूर्म पुराण (3) गरुड पुराण (4) नारद पुराण (5) पद्म पुराण (6) ब्रह्मव पुराण (7) ब्रह्मवैवर्त पुराण (8) ब्रह्मांड पुराण (9) भविष्य पुराण (10) भागवत पुराण (11) मत्स्य पुराण (12) मार्कंडेय पुराण (13) लिंग पुराण (14) वराह पुराण (15) वामन पुराण (16) वायू पुराण (17) विष्णु पुराण (18) स्कंद पुराण, महर्षि व्यासांनी लिहिलेल्या 18 पुराणांच्या काही उपपुराण रचना आहेत. उपपुराणे ही पुरणांचे संक्षिप्त रूप होय. उपपुराणांची संख्या बहुधा 27 आहे. (1) आदित्य पुराण (2) आचार्य पुराण (3) एकाम्र पुराण (4) औषनस पुराण (5) कपिल पुराण (6) कल्कि पुराण (7) कालिका पुराण (8) गणेश पुराण (9) दत्त पुराण (10) दुर्वास पुराण (11) नंदीकृत पुराण (12) नीलमत पुराण (13) नृसिंह पुराण (14) पराशर पुराण (15) प्रज्ञा पुराण (16) भार्गव पुराण (17) मनु पुराण (18) मरीच पुराण (19) माहेश्वर पुराण (20) मुद्गल् पुराण (21) वारूण पुराण (22) वाशिष्ठ पुराण (23) विष्णुधर्मोत्तर पुराण (24) शिवधर्म पुराण (25) सनत्कुमार पुराण (26) सांब पुराण (27) साळी पुराण (28) सिद्धराम पुराण (29) सौर पुराण (30) हरिवंश पुराण.

पुराणांची निर्मिती: मत्स्य व वायू पुराणांच्या मते ब्रम्हदेवाने आधी पुराणांची निर्मिती केली व नंतर त्यांच्या तोंडून वेद बाहेर पडले. भागवतानुसार ब्रम्हदेवाने एकेका मुखाने एक एक वेद निर्माण केला आणि नंतर एकदम चारही मुखांनी इतिहास-पुराणांची निर्मिती केली. शंभर कोटी श्लोक असलेल्या मूळच्या पुराणांची, व्यासांनी 4 लाखांच्या 18 पुराणात रचना केली असे मानले जाते. म्हणूनच, बलदेव उपाध्याय यांनी पुराणांच्या विकासात, व्यासपूर्व आणि व्यासोत्तर असे दोन प्रवाह स्पष्टपणे दिसतात, असे म्हटले आहे. त्यांच्यामते व्यासांपूर्वी पुराणें ही लोकप्रचलित, परंतु अव्यवस्थित होती आणि ती लोकवृतात्मक विद्याविशेष या स्वरूपात होती. ऋग्वेदात आलेला ‘पुराण’ हा शब्द, ‘प्राचीन’ या अर्थाने असला. तरी अथर्ववेदात मात्र तो ‘एक विशिष्ट विद्या’ या अर्थाने आल आहे. गोपथब्राम्हणात सर्पवेद, पिशाच्चवेद, असुरवेद, इतिहासवेद व पुराणवेद यांच्या निर्मितीची चर्चा आहे. शतपथ ब्राह्मण व आश्वलायन गृह्यसूत्रात पुराणांचा समावेश ‘स्वाध्याया’ त केलेला आहे.
प्रारंभीच्या विस्कळीत पुराण साहित्यातून व्यासांनी पुराणसंहिता निर्माण केली, तरी प्रत्यक्षात ही पुराणे अनेकांनी रचलेली आहेत. बदलत्या काळानुसार, आणि स्थानिक, सांप्रदायिक व धार्मिक गरजेनुसार पुराणांच्या स्वरूपात बदल होत गेले. त्यांचे स्वरूप वेदांप्रमाणे अपरिवर्तनीय राहिले नाही. त्यांच्या संहितेतील काही भाग गाळले गेले, तर काही भाग त्यात नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. याज्ञवल्क्य स्मृतीने (१.३) पुराण ही एक ‘विद्या’ किंवा ‘धर्माचे एक साधन’ मानले आहे. पुराणांचे वर्गीकरण तींन प्रकारात केल्या जाते.
अ) सात्विक पुराणे: विष्णु, नारदीय, भागवत, गरुड, पद्म, वराह
ब) राजस पुराणे: ब्रम्हांड, ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय, ब्रह्म, वामन, भविष्य
क) तामस पुराणे: मत्स्य, कूर्म, लिंग, शिव, अग्नि, स्कंद
पुराणांचे विषय: कालक्रमानुसार पुराणांचे विषय बदलत गेले असल्याचे आपल्या लक्षात येते. पुराणांच्या संहिता होण्यापूर्वी त्या लोकसाहित्याच्या स्वरूपातील प्राचीन आख्याने अशा होत्या. व्यासांनी आख्याने, उपाख्याने, गाथा व कल्पशुद्धी या विषयांच्याआधारे पुराणसंहिता तयार केल्या. आख्यान व उपाख्यान ही दोन्ही कथानकेच असतात. स्वत: पाहिलेल्या घटनेचे वर्णन हे आख्यान व ऐकलेल्या घटनेचे वर्णन हे उपाख्यान असे एक मत असून दुसऱ्या एका मतानुसार, आख्यान हे आकाराने मोठे आणि उपख्यान आकाराने छोटे असते. ज्यांचा कर्ता कोंण आहे हे माहीत नाही अशी जी अनेक परंपरागत व लोकप्रसिद्ध पदये वैदिक वाङमयात व पुराणांत आढळतात, त्यांना ‘गाथा’ म्हणतात, त्यात प्रसिद्ध राजांच्या पराक्रमांची आणि दानांची वर्णने असतात. ऋगवेदसंहितेत अशा गाथांना ‘नाराशंनसी’ असे म्हणतात.

पुराणांचे त्यावेळचे विषय विश्व, देवता, मानव इत्यादिंच्या सर्गांची म्हणजे निर्मितीची वर्णने आहेत. या सर्गविदयेवर सांख्य तत्वज्ञानाचा प्रभाव असला तरी बहुतेक वेळा सांख्य व वेदान्त यांच्या तत्वांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. पुराणांनी प्राकृत ३ सर्ग, वैकृत ५ सर्ग, व प्राकृत-वैक्रुत १ असे एकूण ९ सर्ग मानलेले आहेत. याच संदर्भात एक श्लोक पाहण्यासारखा आहे. ‘पुराणे हि कथा दिव्या आदिवंशाश्च धीमताम् | कथ्यन्ते हि पुरास्माभि: श्रुतपूर्वा पितुस्तव ||’ असा एक श्लोक महाभारतात आढळतो. “Hinduism is quite different from Christianity in its perspective on evolution. The Hindu Puranas (test narrating the history of the universe) in the mythology (This is author’s word, to which I do nto agree respectfully.) of avatars……descent of God I biological form…. can be seen as depicting evolution. According to the puranas, God’s first avatar is in the form of a great fish. The second is a great tortoise. The third is boar. The fourth is man-lion. The fifth is a dwarf man. The sixth through the ninth avatars depict an evolution of the human being, from the primitive highly emotional mind to Buddha, a man of mental maturity and emotional equanimity. The tenth avatar is yet to come, again alluding to something like the Christian Second Coming (except that for Hindus it is the Tenth Coming).”3 सर्व पुराणांत, प्रमुख असणाऱ्या पुराणांपैकी वायूपुराण व विष्णुपुराण होत. आपण त्यांचा अनुक्रमे विचार करुया. प्रथम वायूपुराण.

(२) वायूपुराण:
वायूपुराण हे सर्वात जुने पुराण आहे असे डॉ भांडारकरांचे मत असून काही जणांनी त्याचा काळ इसवीसनापूर्वी ३०० वर्षे हा मानलेला आहे. प्रक्रिय, उपोद्घात, अनुषंग आणि उपसंहार या चार पादांत विभागलेल्या या पुराणांत, ११२ अध्याय असून त्यांची श्लोकसंख्या सुमारे ११,००० आहे. काहींच्या मते ती संख्या २४,००० श्लोक इतकी आहे, परंतु आता उपलब्ध असलेल्या प्रतिमध्ये ही संख्या फक्त १२,००० इतकी आहे. शतकानुशतके वायूपुराण सतत बदलत गेले आहे. काही प्रतिंमध्ये ११२ अध्याय आदळतात तर काही प्रतिंमध्ये १११ अध्याय आढळतात. यात पंचलक्षणे स्पष्टपणे दिसून येतात. वायुपुराणाचा उल्लेख महाभारतात (३.१९१) व हरिवंशपूराणात (१.७) सुद्धा वायुपुराणाचा उल्लेख आहे. बाणभट्टाच्या ‘हर्षचरीत’ मध्ये ३ र्या प्रकरणात सुद्धा वायपूराणाचा उल्लेख आहे. २० व्या शतकातील विद्वान लेखक श्री दीक्षितार यांनी वायूपुराण लिहिण्याची सुरुवात इसवीसनापूर्वी ३५० ह्या काळात झाली असे म्हटले आहे. याबाबत एक अवतरण नमूद करण्यासारखे आहे. “Each of the Puranas is encyclopaedic in style, and it is difficult to ascertain when, where, why and by whom these were written. As they exist today, the Puranas are stratified literature. Each titled work consists of material that has grown by numerous accretions in successive historical eras. Thus, no Purana has a single date of composition. It is as if they were libraries to which new volumes have been continuously added, not necessarily at the end of the shelf, but randomly.”4 जसे आज विकिपीडियामध्ये कुणीही कोणत्याही विषयाबाबत आपण स्वत: हून भर घालू शकतो, असे त्यांना कदाचित म्हणावयाचे आहे असे दिसते. ‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृहयेत |’ अर्थात, इतिहास, पुराणांनी वेदांचे मर्म जाणून घेता येते. वायुपुराणांत तींन अध्याय ‘सृष्टिप्रकरणम्’ याकरिता लिहिलेले आहेत. ‘ज्योतिष्प्रचार’ या करिता चार अध्याय, ‘कश्यपीयप्रजासर्ग:’ या करिता चार अध्याय, ‘विष्णुवंशवर्णनम्’ करिता तींन अध्याय, ‘गयामहात्म्य’ याकरिता पाच अध्याय, ‘चंद्रवंशकिर्तनम्’ करिता तींन अध्याय, ‘श्राद्कल्प’ करीता १३ अध्याय तर ‘भुवनविन्यास’ करिता १० अध्याय खर्ची घातलेले आहेत, परंतु ‘भुवनविन्यास’ या विषयाकरीता १० अध्याय हे अत्यंत मौल्यवान आहेत असे माझे मत आहे, कारण त्यात पृथ्वीचे, संपूर्ण विश्वाचे व खास करुन आपल्या प्रिय भरतभूमीचे नितांत सुंदर वर्णण केले आहे. वायूपुराणात, देवांचे वंश Genealogy of Gods) , खगोलशास्त्र (Astronomy), सूर्यवंशीय व चंद्रवंशीय राजांच्या वंशावळी, पुराणें (Puran), भूगोल (Geography), भूमिती (Geometry), मानव अवतार (Incarnation of God in Human Form), सूर्यमंडले (Solar System), आकाशीय ग्रहांचे परिचलन (Movements of Planets in the Space) अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आहे. याशिवाय, नंतरच्या शतकात त्यामध्ये भर पडलेले अध्याय म्हणजे, अध्याय १६ व १७; ज्यामध्ये, वर्णव्यवस्था आणि लोकानी आयुष्यातील वेगवेगळ्या आश्रमांमध्ये (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि सन्यास) पार पाडावयाची कर्तव्ये, अध्याय १८ मध्ये, संन्याशांनी करावयाच्या तपश्चर्येबाबत उल्लेख आहे. तसेच अध्याय ५७ ते ५९ अध्यायांमध्ये धर्म, अध्याय ७३ ते ८३ मध्ये संस्कार आणि अध्याय १०१ मध्ये जन्मानंतर नरकाची संकल्पना व त्यावर चर्चा केलेली आढळते. संस्कृत साहित्याचा अभ्यास ह्या दृष्टीकोणातून ‘भुवनविन्यास’ या विषयावरील १० अध्याय अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातील काही संदर्भ आपण येथे पाहू. ‘चंद्रप्रतिकाशा पूर्वचन्द्र निभानना | वलयांगद केयूर हार कुंडल भूषिता | स्त्राग्विणाश्चित्र मुकुटाश् चिप्राच्छादन वाससा: |’ पुर्णचंद्राप्रमाणे ज्यांचे मुख आहे, दैदीप्यमान हार कुंडले वगैरे अलंकार परिधान केलेल्या स्त्रिया ‘तस्य मध्ये गिरीवर: सिद्धचारण सेविन: | चंद्रतुल्यप्रभै: कांतेश्च द्राकारे: सुलक्षनै | श्वेतवैदूर्यकुमुदौश चित्रौसौ कुमुदप्रभ: | ते पर्वत चंद्राप्रमाणे धवल आहेत. येथील सरोवरे पूर्ण विकसित झालेल्या चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे कांतीमान आहेत. अनेक पर्वतरांगा, निर्झर, उत्तुंग शिखरे आणि विविध वेलींनीसुद्धा ते पर्वत सुशोभीत दिसतात. तस्य कुक्षिस्वनेकासु भ्रांततोया तरंगिणी ||अ.४२ श्लो.५५|| व्याहत्त मानसलिला गता च धारिणी ||अ.४२ श्लो.५६|| त्या पर्वतांच्या अनेक रांगामधून मार्ग काढतांना त्रास होतो, परंतु शेवटी डोंगरमाथ्यावर आघात करत ती जमिनीवर येऊन पोहचते. इतके मनोहारी वर्णण वाचल्यानंतर ‘जंबुद्वीपवर्णणम्’ व भुवनविन्यास’ हे अध्याय पूर्णपणे शांतपणे एकएक शब्द समजून घेऊन वाचावा, अभ्यास करावा व त्याचा मराठीत अनुवाद करावा व त्याची वास्तविक भौगोलिक परिस्थितीशी व इतिहासात असणाऱ्या महितीशी तुलना करून मग त्यावरून एक स्वयंत्र विचारचित्रण करावे, म्हणजे खरा रसास्वाद घेता येईल असे मला वाटते. असो.

(३) विष्णु पुराण :
‘नारायणं नमस्क्रुत्य नरं स्त्रैव नरोत्तमम् | सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ||’
विष्णु ही देवता जगप्रसिद्ध आहेच, ती खास करून दहा अवतारांमुळे. श्रीमद् भगवदगीतेत ७ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, “यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्यूथानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् || [भगवद्गीता: अध्याय: ७ वा, श्लोक: ७]. जगात रामायण, महाभारत व भगवद्गीता हे ग्रंथ वेदा व उपनिषदांपेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत. “However, the texts called the Purans (Ancient Lore) claim that this divine entity assumes a form and name to make itself accessible to humankind. Hence, Hindus speak of the Supreme Being as both Nirguna (without attributes) and Sagun (with attributes such as grace and mercy). Texts identify the Supreme Being variously as Vishnu (All pervasive), Shiva (Auspicious One) or the Goddess in one of her many manifestations, such as Shakti (Energy), Durga, and Kali.”6
सर्व पुराणांमध्ये पुराणांच्या पंचलक्षणांची परिपूर्ती करणारे विष्णुपुराण आहे. विष्णुभक्तीला प्राधान्य दिल्यामुळे हे नांव प्राप्त झालेले हे पुराण, भागवत पुराणाखालोखाल महत्वाचे असून त्याला वैश्णवदर्शनांचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलस्य याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले असे म्हटले आहे. इसवीसनाच्या ३ ते ५ शतकांच्या दरम्यान ते तयार झाले असावे, असे दिसते. श्री. बलदेव उपाध्याय यांच्या मते इसवीसनपूर्व दुसरे शतक हा त्याचा काळ होय. व्हीनसेंट स्मिथ यांच्या मते तो इसवीसनपूर्व ४०० – ३००, सी व्ही वैद्य यांच्या मते ९ व्या शतकांत तर श्री राजेंद्रचंद्र हाजरा यांच्या मते इसवीसन २७५ ते ३२५ असा आहे.
हे पुराण सहा अंशात विभागले असून त्याचे १२६ अध्याय आहेत. पहिल्या अंशात २२ अध्याय, दुसर्या अंशात १६ अध्याय, तिसऱ्या अंशात १८ अध्याय, चौथ्या अंशात २४ अध्याय, पाचवा व सहावा हे अंश तुलनेने मोठे असून त्यात अनुक्रमे ३८ व ८ आध्याय आहेत. मूळ प्रतीत जवळपास २३,००० श्लोक होते असे म्हणतात, परंतु त्याच्या उपलब्ध प्रतीत सुंमारे ६००० ते ७००० श्लोक आहेत. या पुराणात फार कमी फेरफार झाले आहेत. पंचलक्षणांचे या पुरणा ईतके व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुरणात आढळत नाही. यांत अनेक आख्यानांबरोबर कृष्णचरित्रही वर्णिलेले आहे विष्णुपुराण लहान म्हणजे छोट्या असणाऱ्या पुराणांपैकी एक आहे. यात प्रामुख्याने, विष्णु व त्यांच्या अवतारांबाबत लिहिलेले आहे. विष्णुपूराणाचा कर्ता म्हणून महर्षि व्यासांचे नाव घेतल्या जाते, परंतु, त्याच्या लेखकाविषयी व नक्की केव्हा लिहिले याबबात बरीच वेगळवेगली मते आहेत.
विष्णुच्या पूजेविषयी १ ल्या अंशाच्या २२ व्या अध्यायात सांगितलेले आहे. तसेच त्यात विष्णुच्या इतर नावांचा उल्लेख विस्तृतपणे केलेला आहे; जसे हरि, जनार्दन, माधव, अच्युत, हृषीकेश वगैरे. ह्याच आध्यायात, जगातील सर्व वस्तू, पूर्ण विश्व, सगळे प्राणिमात्र, प्रत्येकाचे आत्मन, बुद्धी, स्वाभिमान, मन, संवेदना, अज्ञान, शहाणपण, सगळे वेद व इतर सर्व व जे जे आहे आणि जे जे अस्तित्वात नाही ते सगळे भगवान विष्णुमध्ये समाविष्ट आहे.
दुसऱ्या अंशात, पृथ्वीची उत्पतती, सप्तखंड, सात महासागर, मेरू पर्वत, मंदार पर्वत, आणि इतर पर्वत; तसेच, भारतवर्ष (भारतदेश), त्यातील नद्या आणि विभिन्न लोक यांचे वर्णन त्यात आलेले आहे. त्यात सात खंड, जंबु, प्लक्ष, सलमला, कुश, क्रौंच आणि पुष्कर व त्यांच्या चहूबाजूनी असणारे वेगवेगळे जलसाठे (खरे पाणी, ताजे पाणी, मदिरा, रस, उसचा रस, लोणी, दही आणि दूध. त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या वर असणारी आवरणें, ग्रह, तारे, सूर्य आणि चंद्र असे समग्र विवरण खूपच सुंदर केले आहे.
या पुराणांत, ब्राम्हणाने शास्त्रांचा अभ्यास करावा, देवांची पूजा करावी, दुसऱ्याच्या वतीने धर्मकार्य करावीत. क्षत्रियाने, त्याच्या शस्त्रांचे जतन करून पृथ्वीचे रक्षण करावे, वैश्याने शेती करावी, आणि क्षुद्राने व्यापार करून नफा मिळवावा व इतर हातानी करावयाची कामे करावी. यात सगळ्या वर्णांच्या लोकानी नितीने रहावे असे म्हटले आहे. सर्वांबरोबर चांगले वागावे, कधी कुणाचाही अपमान करू नये, असत्याच्या मोहात पडू नये, कधीही दुसऱ्याच्या पत्नीशी असभ्य व अभद्र व्यवहारर करु नये, दूसर्याच्या धनाची चोरी करू नये, दुसऱ्याविषयी आपल्या मनात द्वेशभाव बाळगू नये, कधीही कुणा व्यक्तीची वा प्राण्यांची हिंसा करू नये. देव, साधु व गुरुची सेवा करावी, असे या पुराणात म्हटलेले आहे. सर्व प्राणिमात्रांचे, स्वत:च्या मुलांचे व स्वत:चे सदैव कल्याण करावे.
वेदांच्या निर्मिती विषयी पहिल्या अंशातील ५ व्या आध्यायात, दुसऱ्या अध्यायात, २४ तत्वांचा विचार, विश्वाची उत्पती व विष्णूचा महिमा खूपच व्यवस्थितपणे सांगितला आहे. ‘पृथ्वीवयापस्तथा तेजो वायूराकाश एव च | सर्वेइंद्रियान्त:करणं पुरुषास्य हि य ज्जगत’ ||१.२.६८||
स एव सर्वभुतात्मा विश्व रउपो यतोsव्यय: | सर्गादिकं तु तस्यऐव भूतस्थमुपकारकम् ||२.१.६९||
पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश व सर्व इंद्रिय तथा अंत:करण इत्यादि, जितकेही जगात आहे ते सर्व पुरुशरूप आहे, कारण ते विष्णुच विश्वरूप आहे आणि सर्व प्राणिमात्रात त्यांचा वास आहे.
त्यामुळे, ब्रह्म व सर्गादिक त्यांचीच रुपे आहेत. त्यापुढे जाऊन, पहिल्याच अंशात पाचव्या अध्यायात, ‘गायत्रंच ऋचश्चैव त्रिवृत्सोमं रथन्तरम|अग्निश्टोमं च यज्ञानां निर्ममे प्रथमान्मुखात् ||१.५.५३||
नंतर ब्रम्हाने त्यांच्या पूर्वाभि मुख्यतून गायत्री, ऋगवेद, त्रिवृत्सोम रथन्तर आणि अग्निश्टोम यज्ञयाची निर्मिती केली.
यजूषि त्रैष्टूभं छंद: स्तोमं पंचदश तथा | बृहत्साम तथोक्यच दक्षिणाद सृजन्मुखात ||१.५.५४||
नंतर त्यांनी त्यांच्या दक्षिण मुखातून यजुर्वेद, त्रैश्टुभछंद, पंचदशस्तोम, बृहत्साम व उक्थकी चि रचना केली.
सामानि जगती छंदस्तोमं सप्तदशं तथा | वैरूपमतिरात्रं च पाश्चिमादसृजन्मुखात् ||१.५.५५||
एकविंशमथर्वाणमार्यामाणमेव च | अनुश्टुभं च वैराजमुक्तरादसृजन्मुखात् ||१.५.५६||
उत्तर मुखातून ब्रम्हाने एकविंशतीस्तोम, अथर्ववेद, आप्तार्यामाण, अनुश्टुभ छंद आणि वैराजकी सृष्टि निर्माण केली.
पहिल्याच अंशात, २२ व्या अध्यात, मला आजच्या संदर्भात एक श्लोक महत्वाचा आहे.
एते सर्वे प्रवृतस्य स्थितौ विश्णोर्महात्मन: | विभूतिभूता राजानो ये चान्ये मुनि सत्तम||१.२२.१६||
सर्वे राजे जे संपूर्ण विश्वाच्या प्रतिपालनात निमग्न आहेत ते सर्व श्रीविष्णू भगवानाचीच रुपे आहेत.
यानंतर दुसऱ्या अंशात अत्यंत महत्वाचे व जे अभ्यासाने पडताळून पाहता येते असे भौगोलिक वर्णंन आहे, विश्वाचे.
चतुर्दशसहस्त्राणि योजनानां महापुरी | मेरोरूपरि मैत्रेय ब्रम्हण: प्रथिता दिवि ||२.२.३१||
मेरू पर्वताच्या वर अंतरिक्षात चौदा हजार योजने इतकी मोठी ब्रम्हदेवाची महापुरी आहे. भरत खंडांचे वर्णन दुसर्या अंशत ३ र्या अध्यायात येते ते असे.
उत्तरस्य यतसमुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्तति: ||२.३.१||
जो समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला आहे त्याचे नांव भारतवर्ष असे आहे.
भरतभूमीचे वैशिश्ठय वर्णन हे विशेष आहे व त्यामुळेच भारत व इतर पाश्चिमात्य देशात जगण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे
इत: स्वर्गश्च्य मोक्षश्च्य मध्यंचान्तश्च्य गम्यते | न खल्वन्यत्र मर्त्यानां कर्म भूमौ विधियते ||२.३.५||
फक्त याच भारतभूमित आपआपल्या कर्मानुसार स्वर्ग, मोक्ष, अंतरिक्ष, किंवा पाताल आदि लोकांना प्राप्त केल्या जाऊ शकते. संपूर्ण पृथिवीवर अन्यत्र कुठेही मनुष्याकरीता अशा प्रकारची कर्मभूमि उपलब्ध नाही.
श्लोक २२ ते २६ यात भारतवर्षात जन्म घेणे व अप्राप्य ते प्राप्त करणे शक्य आहे.
अत्र जन्म सहस्त्राणां सहस्त्रैरपि सत्तम | कदाचिल्लभते जंतुर्मानुष्य पुण्यसंचयात ||२.३.२३||
भारताच्या अप्राप्यतेबाबत तर फारच सुंदर वर्णंन विष्णुपुराणात आलेले आहे.
गायन्ति देवा: किल गितकानि, धन्यास्तु ते भारत भूमिभागे | स्वर्गापवर्गा स्पदमार्गभूते, भवन्ति भूय: पुरुषा: सुरत्वात् ||२.३.२४||
देवसुद्धा निरंतर असे गायन करतात की, ज्यांनी स्वर्ग आणि अपवर्गाच्या मार्गावर भारतभूमीत जन्म घेतलेला आहे, ते पुरुष देवतांपेक्षाही भाग्यवान आहेत.
२ र्या अंशत, ४ थ्या अध्यायात एक श्लोक पृथ्वी सुक्ताचि आठवण करून देणारा व अतिशय अर्थगर्भ आहे.
सेयं धात्री विधात्री च सर्वभूतगुणाधिका | आधारभूता सर्वेषां मैत्रेय जगतामिती ||२.४.९७||
आकाशादि सर्व भूतांपेक्षा जास्त गुणांनी युक्त असणारी ही पृथ्वी संपूर्ण जगाला आधारभूत आहे आणि सर्वांचे पालणपोषण करणारी असून उद्धार करणारी सुद्धा आहे.
दु:ख दु:ख म्हणून आपण सारखे दु:ख करत असतो व मग प्रश्न विचारतो ‘सुख म्हणजे नक्की काय असते?’ या अति महत्वाच्या व तितक्याच गहन प्रश्नाचे उत्तर, दुसऱ्या अंशात सहव्या अध्यायात दिलेले आहे. सगळे मनाचे खेळ आहेत. आजचे मानसशास्त्रज्ञ सुद्धा हेच म्हणते.
तस्माद्दु:खात्मकं नास्ति न च किंचित्सुखात्मकम् | मनस: परिणामोsयं सुख दु:दि लक्षण: ||
२.६.४९||
अर्थात जगत कोणताही पदार्थ किंवा वस्तू दु:खमय नाही किंवा सुखदायकही नाही, हे सुख व दु:ख तर मनाचे विकार आहेत.
यानंतरचा भाग हे तर संपूर्ण खगोलशास्त्रच (Astronomy) आहे.
भूमेर्योजनलक्षे तु सौरं मैत्रेय मंडलं | लक्षा द्दिवाकरस्यापि मंडलं शशिन: स्थितम् ||२.७.५||
पृथ्वीपासून (Earth) एक लक्ष योजने दुर् सूर्यमंडल (Solar Galaxy) आहे. सूर्यमंडलापासून एक लक्ष योजने इतके दुर् चंद्रमंडल (Moon Galaxy) आहे.
पुढे जाण्यापूर्वी, जरा ‘योजन’ या संकल्पनेचा अर्थ बघूया, कारण ‘योजन’ हे यंत्राचे मोजमाप दद्वापर व तरत युगात अस्तित्वात होते. मेरियम वेबस्टर शब्दकोशात १ योजन म्हणजे ४ ते १० मैल. १ मैल बरोबर १.६०९३४ किलोमीटर. याचाच अर्थ १ योजन म्हणजे सुमारे १६.००.००० किलोमीटर)
पुर्णे शतसहस्त्रे तु योजनानां निशाकरात् | नक्षत्रमंडलं कृत्न्यमुपरिष्टातप्रकाशते ||२.७.६||
चंद्रमंडलापासून Solar Galaxy) शंभर हजार (१ लक्ष) योजने दुर् अंतरावर संपूर्ण नक्षत्रमंडल (Planets) प्रकाशित आहे.
द्वे लक्षे चोत्तरे ब्रह्मन् बुधो नक्षत्र मंडलात् |तावत्प्रमाणबहंगे तु बुधस्याप्युशना: स्थित: ||२.७.७||
नक्षत्रमंडळापासून दोन लाख योजनेवर बुध (Mercury) आणि बुधापेक्षाही पुढे दोन लक्ष अंतरावर शुक्र (Venus) विराजमान आहे.
अंगारकोsपि शुक्रस्य तत्प्रमाणे व्यवस्थित: | लक्षद्वये तु भौमस्य सतहितो देवपुरोहित: ||२.७.८||
शुक्रापासून इतक्याच म्हणजे दोन लक्ष योजने अंतरावर मंगल (Mars) आणि मंगळापासून दोन लक्ष अंतरावर बृहस्पति (Jupiter) आहे.
शौरिर्बृहस्पतेश्चोर्वोte द्विलक्षे समवस्थित: | सप्तर्षिमंडलं तस्माल्लक्षमेकं द्विजोत्तम ||२.७.९||
बृहस्पति पासून दोन लक्ष योजने दुर् अंतरावर शनि (Saturn) आहे आणि शनिपासून एक लक्ष योजने दूर अंतरावर सप्तर्षिमंडल (Galaxy of Seven Sages) आहे.
सारांशस्वरूप, दुसऱ्या अंशात खरे तर विष्णु पुराणाचे सारच आहे.
दारुण्यग्निर्यथा तैलं तिले तद्वत्पु मानपि | प्रधानेsवस्थितो व्यापी चेतनात्मात्म वदेन: ||२.७.२८||
विष्णु पुराणांत राजांच्या वंशावळी आणि बरेचसे धार्मिक विधीसुद्धा वर्णंन केलेले आहेत. सुरुवातीला पहिल्याप्रमाणे विष्णुपुराण देखिल एका निश्चित तारखेला, एखाद्या विशीष्ट व्यक्तीने असे लिहिलेले नसल्यामुळे व अनेक शतकांत त्यात भर पडत गेल्यामुळे, अनेक विषय वेळोवेळी त्यात समाविष्ट केले गेलेले आहेत. अस्तू.
इतके असले तरीही इतिहास, खगोलशास्त्र, धर्मशास्त्र वगैरे अनेक विषयांच्या द्रुष्टिकोणातून ‘विष्णु पुराण’ हा अत्यंत ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक ग्रंथ म्हणून महत्वाचा आहे असे मला वाटते.

—————————————————————————————————————
संदर्भ:
१) मराठी ज्ञानकोश–पुराणे व उपपुराणे: https://vishwakosh.marathi.gov.in
२) मुक्त ज्ञानकोष विकिपीडिया: https://hi.wikipedia.org/w/index.php?title=पुराण&old id=5175217
३) God is Not Dead – What Quantum Physics Tells is about Our Origins and How We Should Live by Amit Goswami, Fifth Impression 2010, Jaico Publications, Page 127
४) Comelia Dimmitt and J.A.B. van Buitenen, Classical Hindu Mythology: A Reader in the Sanskrit Puranas.
५) Studies in the Puranic Records on Hindu Rites and Customs, Hazra, Rajendra Chandra (1940) – Motilal Banarasidass, ISBN 81-208-0223-3, https://books.google.com/books?id=Jar4V3piCeQC,
६) World Religions – The Illustrated Guide, General Editor, Michael D. Coogan, Published by Deccan Baird Pulbishers, London.

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top