Marathi My Articles

मनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत

कालिदास हे एक अभिजात संस्कृत लेखक होते. त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत. कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो.

संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदासाचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात.

सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृतचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीविषयी उत्सुकता असते. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांच्या ‘मेघदूता’मुळे त्यांची आषाढाच्या पहिल्या दिवशी आठवण होतेच होते.

कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे. त्यांच्या ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम्, मेघदूत या काव्य रचना, तसेच मलाविकाग्नीमित्र, विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील नाटक-वजा-महाकाव्य रचनांमुळे त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली, तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्वात अजरामर झाली. त्यामधील कुमारसंभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये, तर मेघदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत.

 मेघदूताच्या पहिल्या भागात भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे. तर दुसरा भाग आशा, भीती, विरह आणि इच्छापूर्ती या विषयांवर आहे. यामध्ये माणूस प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही हे दाखविले आहे. ही रचना काव्यप्रेमींच्या नजरेतून सुटू शकत नाही. सिंहली भाषांतही मेघदूताचे अनुवाद झालेले आहेत. काव्यावर पन्नास (५०) टीकाग्रंथ आहेत. https://mr.wikipedia.org/s/3o8

महाकवी कालिदासाचे जीवन:

कालिदास द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या आश्रयास होता. चंद्रगुप्ताने इ.स. ३८० पासून ४१३ पर्यंत राज्य केले. यावरून, कालिदास हा चौथ्या शतकाच्या शेवटी व पाचव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेला असावा. कालिदासाच्या आयुष्या विषयी निश्चित अशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; परंतु एक दंतकथा प्राचीन परंपराभिद्न्य पंडितांच्यामते  प्रचलित आहे. 

कालिदास हा एका ब्राम्हणाचा मुलगा होता. तो पाच-सहा महिन्याचा असताना,  त्याचे आईबाप वारले व तो परका झाला. अशा अवस्थेत योयोगाने तो गवळ्याच्या दृष्टीस पडला. त्या गवल्याने त्यास घरी नेऊन त्याला लहानाचा मोठा केला. स्वतः गौरवर्ण व शरीराने सुकुमार असल्याने तो इतर गवळ्याच्या मुलात राकट असला तरी सहज ओळखू येई. तथापी, त्याला शिक्षण मुळीच न मिळाल्यामुळे वयाच्या अठरा वर्षापर्यंत तो अगदी अडाणी राहिला. जेथे तो रहात होता, त्या नगराच्या राजाला एक अतिशय रूपवती व कलाभिज्ञ अशी मुलगी होती. ती उपवर झाल्यावर तिच्याकरिता राजाने पुष्कळ वर पहिले, पण त्यापैकी एकही अखिलकलाशास्त्रविशारद नसल्यामुळे तिला पसंत पडेना. शेवटी राजाने कंटाळून वरसंशोधनाचे काम प्रधानावर सोपविले. प्रधानाला काही कारणाने राजकन्येचा सूड घ्यावयाचा होता. एकदा प्रधान त्याच्या घराच्या गच्चीवर बसला असता, त्याला एक ब्राम्हणकुमार गवळ्याच्या मुलांबरोबर दिसला. प्रधानाला एक युक्ती सुचली. त्याने त्या ब्राम्हण मुलाला आपल्या वाड्यात बोलावून घेतले. 

आपल्याजवळील मौल्यवान, वस्त्रालंकारानी त्याला भूषित करून, बरोबर अनेक तरुण, शास्त्री पंडितांचा लवाजमा बरोबर देऊन राजकन्येला निरोप पाठविला कि, काशीचे एक विद्वान पंडित आले आहेत, तरी त्यांची परीक्षा घेऊन आदरसत्कार करावा. तिच्या अनुमतीने त्याला शिष्यसमुदायासह राजसभेत आणले. तेथील पंडितांनी त्याच्या शिष्यापुढेच हात टेकले, तेव्हा राजकन्येला  त्याची परिक्षा घेण्याची आवश्यकता वाटली नाही. तो स्वतः गौरकाय व देखणा असल्यामुळे राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले व लौकरच त्यांचा विवाह झाला. पण पूढे दोनचार दिवसातच त्याचे बिंग फुटले. तेव्हा त्याला ठार मारण्याचा धाक दाखवून तिने त्याच्याकडून सर्व वस्तुस्थिती समजून घेतली. त्यावेळी तिला अत्यंत दुःख झाले. तथापि, विवाह होऊनगेल्यावर काय करणार? नंतर तिने त्याला कालीमातेचची उपासना करण्यास सांगितले. त्यानेही देवीच्या पायाजवळ धरणे धरले, परंतु  ती प्रसन्न होईना, तेव्हा स्वतःचा शिरच्छेद करण्यासही तो तयार झाला. त्याची भक्ती व दृश्यनिश्चिय पाहून देवी त्याच्यावर प्रसन्न झाली व तिने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हापासून, तो अत्यंत विद्वान व प्रतिभासम्पन्न कवी झाला व ‘कालिदास’ या नावाने प्रसिद्धी पावला. कालिदास परत आल्यावर राजकन्येला भेटला. त्यावेळी, तिने त्याच्या ‘अस्ति कश्चितद्वाग्विशेष:’ (आपल्या वाणीत काही फरक झाला आहे काय?) म्हणून विचारले. त्यावेळी, कालिदासाची वैखरी देवीच्या प्रसादाने पवित्र झाली होती, म्हणून त्याने ‘अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:’ असा आरंभ करून ‘कुमारसम्भव’, ‘कश्चितकांताविरहागुरूंणा’ (‘मेघदूत’) व ‘वागर्थाविव सम्प्रूकतौ वागर्थ प्रतिपत्तये’ अशा मंगल वचनानेयुक्त असा ‘रघुवंश’, अशी तीन काव्ये धडाधड म्हणून दाखविली. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले व त्यांची कीर्ती दिगंतात पसरली. अशा रीतीने आपला भाग्योदय करणाऱ्या राजकन्येला मात्र तो मातृवत व गुरुवत मानू लागला, त्यामुळे चिडून जाऊन राजकन्येने तुला स्त्रीच्या हातूनच मृत्यू येईल असा शाप दिला, वगैरे. पुढे कथा मोठी आहे, परंतु आपण तो भाग सोडून पुढे जाऊ, कारण आपला विषय कालिदासाचे चरित्र असा नसून ‘कालिदाचे ‘मेघदूत’ असा आहे. कालिदास पुढे ५५ वर्षेपर्यंत जगला असे म्हणतात.

कालिदासाची अभूतपूर्व ग्रंथसम्पदा:

कविकुलगुरू महाकवी कालिदास हा संस्कृत भाषेचा सर्वश्रेष्ठ कवी आहे. पाश्चात पंडित कालिदासाला भारताचा शेक्सपियर म्हणून गौरवितात. खरे तर शेक्सपीयरला इंग्लडचा कालिदास म्हणावयास हवे, कारण कालिदास हा इसवी सनाच्या चौथ्या शतकात ( ई. स. ४०० ते ई. स. ४५०) झाला व शेक्सपियर (१५६४ ते १६१६) त्यानंतर ११०० वर्षानंतर झाला. त्यामुळे, कालिदासाचे स्थान शेक्सपियरच्या तुलनेत नक्कीच वरचे आहे. कालिदासाच्या आयुष्याविषयी खूपच थोडी माहिती उपलब्ध आहे. कालिदासाचे जीवन चरित्र, ग्रंथकर्तृत्व व कालावधी या तिन्ही बाबतीत अद्यापि अनिश्चिताच आहे. हा कोठे जन्मला, त्याच्या आईवडिलांचे नाव काय, कुल कुठले वगैरे माहिती उपलब्ध नाही.

कवी कालिदास हा अत्यंत विनयसम्पन्न पुरुष होता, म्हणून त्याने आपल्या स्वतःविषयी कोठेच काही लिहून ठेवलेले नाही. महाकवी कालिदासाची सर्वमान्य ग्रंथ सम्पदा खालील प्रमाणे आहे.

१) ऋतुसंहार – लघुकाव्य

२) कुमारसमभाव – महाकाव्य

३) मालविग्निमित्रम् – नाटक

४) विक्रमोर्वशीयम् – नाटक

५) रघुवंश – महाकाव्य

६) अभिज्ञानशाकुंतल – नाटक

७) मेघदूत – खंडकाव्य

आपला आजचा चर्चेचा विषय मुख्यतः ‘मेघदूत’ असल्यामुळे आपण कालिदासाच्या ह्या ग्रंथसम्पदेबाबत विस्तृत चर्चा न करता पुढे जाणार आहोत.

मेघदूताची पार्श्वभूमी:    

मेघदूताची पार्श्वभूमी अशी आहे कि, अलका नगरीतील एका यक्षाने आपल्या कामात काही प्रमाद केल्यामुळे कुबेराने ‘एक वर्षभर तुझे सामर्थ्य नष्ट होईल’ असा त्याला शाप दिला, तेव्हा त्याला अलका नगरी सोडावी लागली व सीतादेवीने स्नान केल्यामुळे जिथले उदक पवित्र झाले आहे, अशा रामगिरीवरील आश्रमात तो एकटाच येऊन राहिला. तेथे आठ महिने झाल्यानंतर आषाढ महिन्याच्या आरंभी, वर्षाऋतू जवळ आला असता, मेघदर्शनाने त्याला प्रियाविरह दु:सह झाला. आपल्या पत्नीची हि अशीच अवस्था झाली असेल, असे जाणून त्याने त्या मेघाला आपला दूत म्हणून पाठविण्याचे ठरविले. वास्तविक धूम, अग्नी, जल व वायू वगैरेंच्या समवार्याने उत्पन्न झालेला अचेतन मेघ यक्षाचा संदेश कसा नेणार ? पण मदनार्त यक्षाला इतका विवेक कोठला. त्याने त्या पर्वतावर उभारलेली उभारलेली कुटजपुष्पे मेघाला अर्पण करून व त्याची स्तुती करून अलकेला मार्ग सांगावयास सुरुवात केली.3   

पूर्वमेघ व उत्तरमेघ – विषय, आकृतिबंध व भावचित्र

‘पूर्वमेघ’ यामध्ये, एकूण ६५ श्लोक आहेत, तर ‘उत्तरमेघ’ यामध्ये ५५ श्लोक आहेत. पूर्व मेघामध्ये रामगिरीवर मेघाला साकडे घालण्यापासून (श्लोक ४) येथून सुरुवातहोते व मेघाला अलका नगरीत यक्षाला प्रियतमा दृगोच्चर होते. इथे अर्धविराम होतो मेघदूताचा (श्लोक ६५).

उत्तरमेघाचा पहिल्या श्लोकात, यक्ष मेघाला अल्कानगरीच्या प्रथम दर्शनातील रमणीयता सांगतो, तर ५४ व्या श्लोकात मेघाला त्याच्या चांगुलपणाची जाणीव करूनदेत यक्ष त्याला सुखावतो, व शेवटच्या ५५ व्य्या श्लोकात यक्ष मेघाच्या हृदयाला हात घालत अगदी गाढमैत्रिच्या नात्याने असे मनोगत व्यक्त करतो कि,  ‘हे घना! माझ्यासारखा तुला तुझ्या विद्द्युलता सखेचा विरह एक क्षणही न होवो. This emphasizing creates an intrinsic emotional appeal to the kindness of Megh, the intent being to convey Megh by Yaksha that being a friend; I would not like you to be subjected to severe pain of parting of your darling ever.  इतक्या तरलपणे मेघाच्या हृदयात हळवेपणाने शिरण्याची कल्पना अपूर्वच म्हटली पाहिजे .

पूर्वमेघात प्रामुख्याने मेघाचा रामगिरीवरून अलकेपर्यंतचा प्रवास, मार्गातील सुंदर वन, उपवने, नद्या, पर्वत, झरे, तलाव हे विषय आहेत, तर उत्तरमेघात, अलका नगरीत प्रवेश केल्यानंतर अतिशय रम्य प्रसाद, लोक, युवती, रतूनी यांचे वर्णन आढळते.

आकृतिबंध हा दोन्ही भागात वेगवेगळा आहे. पहिल्या भागात कालिदासाने आपली आर्तता, हळवेपणा व मार्गात न रमत मेघाने लवकर अल्कानगरीत पोहचावे  याकरिता उत्कट व अधीरता यांनी परिपूर्ण अत्यंत भावनाविवश पुरुष हे रूपचित्र निर्माण केले. दुसऱ्या भागात मात्र बराचसा शांत, स्वस्थ, थोडासा गलबललेला, थोडासा संकोचलेला परंतु अंतस्थ आनंदी असा रतिरक्त पुरुष दृष्टोपत्तीस पडतो.  

‘भावनाचित्र’ ह्या दृष्टिकोनातून, पूर्वमेघात काहीसा कृष्णासारखा सावळा, काहीसा शुभ्र, आणि चंदेरी सोनेरी रंगाचे उत्तरीय परिधान केलेला मित्रवर्य जलद, जलदपणेमार्गस्थ, हे मनोहारी, नयनरम्य व मनाला सुखवितानाच आतुरतेने व आर्ततेने ओतप्रोत भरलेली भैरवी ऐकण्याची जाणीव करून देते.

उत्तरमेघात, एखाद्या तरुणीने बांधलेले तिचे विलग असलेले केशकलाप मंद वाहणाऱ्या वायुलहरींवर विहरत जावे तसे अलका नगरीत पोहचलेल्या मेघाच्या रूपात यक्षाला झालेले दिसते. येथेही भावना उत्कट झालेल्या आढळतात, कारण यक्षाला आता आतुरता असते त्याच्या प्रियेचा निरोप ऐकण्याची.

मेघदूतातील अलंका:

‘उपमा कालिदासस्य’ हि उक्ती तर पंचकाव्यातील प्रत्येकाच्या खास गुणाकरिता कालिदासाच्या काव्यात्मकतेकरिता प्रसिद्ध आहेच, परंतु याशिवाय, जागोजागी उत्प्रेक्षा वगैरे अर्थालंकाराची पखरण केलेली आढळते.

मंदाक्रांता – गजगामिनीचा पदन्यास

शब्दांचे, अर्थाचे वा दोन्हींचे सौंदर्य वाढविणारी अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा आदी विशिष्ट शब्दार्थयोजना ‘अलंकार’ या नावाने ओळखली जाते. रस, गुण वा रीतीसुद्धा सौंदर्यकारक असली तरी त्याहून अलंकार भिन्न होत, असे अनेकांचे मत आहे. चमत्कृतिजनक शब्दार्थयोजना म्हणजे अलंकार, अशीही व्याख्या साहित्यशास्त्रकार करतात. शब्दार्थांच्या सौंदर्याचा प्रश्न मुख्यतः ललित साहित्यकृतींच्या संदर्भात येतो. त्यामुळे अलंकारांची चर्चा साहित्यशास्त्राला अपरिहार्य ठरते. ‘अलंकार’ या शब्दाचा मुख्यार्थ पाहिला तर दागिना किंवा शोभादायक वस्तू असा आहे. विविध प्रकारच्या दागिन्यांनी शरीर जसे सुशोभित होते, त्याचप्रमाणे निरनिराळ्या अलंकारांनी साहित्य सजविले जाते, अशी कल्पना हा शब्द साहित्याच्या संदर्भात वापरण्यामागे आहे. काही संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी शब्दार्थांना काव्याचे शरीर मानले. रीती अथवा विशिष्ट शब्दरचनेमुळे निर्माण होणारी भाषाशैली म्हणजे त्यांच्या मते या काव्यरूपी शरीराच्या अवयवांची ठेवण. श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सौकुमार्य, अर्थव्यक्ती, उदारता, ओजस्, कांती आणि समाधी ह्या निरनिराळ्या रितींच्या दहा गुणांची तुलना त्यांनी शरीर धारण करणाऱ्‍या काव्यसुंदरीच्या स्वभावगुणांशी केली आणि अलंकार हे दागिन्यांप्रमाणे काव्यशरीरास शोभा देतात असे सांगितले.

अलंकारांचे प्रकार :

शब्दालंकार, अर्थालंकार आणि उभयालंकार असे अलंकाराचे एकूण तीन प्रकार मानले आहेत. शब्दालंकार हे विशिष्ट शब्दयोजनेवर आधारलेले असतात. त्यांचा अर्थाशी संबंध नसतो. उदा. अनुप्रास आणि यमक हे शब्दालंकार आहेत. अनुप्रासात विशिष्ट वर्णांची पुनरावृत्ती केली जाते आणि ती साधण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात. उदा. कवि भा.रा.तांब्यांच्या पुढील ओळी:

कडकडा फोड नभ, उढव उडुमक्षिका, खडखडवी दिग्गजां, तुडव रविमालिका

माड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका, खवळवी चहुंकडे या समुद्रा

या ओळींत ‘ड्’ ‌या वर्णाची पुनरावृत्ती आहे. https://vishwakosh.marathi.gov.in/26314/

अक्षरगणवृत्ते म्हणजे लघु-गुरु अक्षरांचा साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ अविष्कार करणे होय. अक्षरगणवृत्तामध्ये खालील उपप्रकार असतात. अक्षरगणवृत्तात लघु म्हणजे हॄस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरु म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे. यांचा क्रम रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये ४ ओळींची गण रचना असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते.

‘मंदाक्रांता’ हे अनेक सुंदर अक्षरवृत्तामधील एक वृत्त आहे. मंदाक्रांता हे मुळातच मंदपणे चालणारे वृत्त आहे. मेघदूतातील सर्व १२० श्लोक ह्या एकाच वृतांत रचलेले आहेत. आपण पुढे जाण्यापूर्वी, ह्या मंदाक्रांता वृत्ताची थोडीशी माहीत घेऊ. 

कवितेस चाल देण्याचे एक वृत्त…..’ मंदाक्रांता म्हणति तिजला माभनातातगागा | म-भ-न-त-त-ग-ग’.

मंदाक्रांता म्हणति तिजला वृत्त हे मंद चाले

ज्याच्या पादी मभनतत हे आणि गा दोन आले

उदाहरणे :

मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी,

पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी,

त:निश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी,

मंदाक्रांता सरल कविता कालिदासी विलासी

— (कवि माधव ज्युलियन)

कश्चित्कांता विरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः

शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः |

किंवा, शान्ताकारं भुजगशयनं पद्‌मनाभं सुरेशम्‌ |

पूर्वमेघातील आर्तता व प्रार्थना:

पूर्वमेघातील यक्ष त्या आषाढातील सायंकाळी खूपच व गंभीर व दू:खी झाला. तिच्या भावना इतक्या उत्कट झाल्या की, हा मेघ आहे व तो असा कसा आपला संदेश आपल्या सखीकडे घेऊन जाईल याचा सारासार विचार देखील त्याच्या मनाला शिवला नाही.   

भिन्न भिन्न भाषातील कवींवर कालिदासध्या साहित्याचा प्रभाव आढळतो. सर्वप्रथम आपण आंग्ल भाषेतील अनुवादाकडे वळूयात.

आंग्ल भाषेतील अनुवाद:

कालिदासाच्या नंतर अनेक शतके, अगदी आजपर्यंत वेगवेगळ्या देशातील साहित्यिकांवर कालिदासाच्या साहित्यकृतींचा प्रभाव आढळून येतो. आंग्ल कवींबरोबर  भारतातील प्रसिद्ध उर्दू व  हिंदी भाषेतील अनेक रचनांवर कालिदासाचा अप्रभाव आढळून येतो. काहींनी कालिदासाच्या मेघदूत व इतर साहित्य कृतींचे अनुवाद इतर भाषेत केले तर काहींनी त्यातुन स्फूर्ती घेऊन स्वतंत्र रचना केलेल्या आहेत. इंग्रजांच्या सेवेत असलेल्या त्या वेळच्या असिस्टंट सर्जन असलेल्या होर्यास हेमन विल्सन यांनी केलेल्या मेघदूताचा इंग्रजीतील अनुवाद  “The Megh Duta or Cloud Messenger – a Poem in the Sanskrit Language” या नावाने प्रसिद्ध  झाला.  उदाहरणादाखल,  आपण दोन श्लोक व विल्सन ने केलेला त्याचा अनुवाद पाहू. पूर्व मेघातील हा श्लोक पाहू.

तेषां दिक्षु प्रथितविदिशा लक्षणां राजधानीम

गत्वा सद्य: फलमविकलं कामुकत्वस्य लब्धा ।

तीरोपांतस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यस्मा,

त्सभ्रू भन्गम मुखमिव पयो वेत्रवत्याश्च्यलोर्मि ।।२४।। पूर्वमेघ

Where royal Vidisha confers crown:

There Vetravati’s stream ambrosial laves,

And there her rippling brow ad polished face

Invite thy smiles, and sue for thy embrace.

नीचैराख्यमं गिरी मधिवसेस्तत्र विश्रामहेतो –

स्त्वत सम्पर्कापुलकीतमिव प्रौढपुष्पई: कदम्बई: ।

य: पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणा-

मुद्दामानि प्रथयति शिला वेश्मा भिर्योवनानि ।।२५।। पूर्वमेघ    

Next o’er the lesser hills thy flight suspend,

And growth erect to dropping flowerets lend,

While sweeter fragrance breathes from each recess,

Tan rich perfumes the hireling wanton’s dress.

श्री. कोलिन जॉन हॉलकोम्ब  यांनी मेघदूताचा The Cloud Messenger – The Meghaduta by Kalidas’ या नावानेगद्य स्वरूपात अनुवाद केला. त्यातील उदाहरणादाखल दोन श्लोकांचा  अनुवाद पाहू.

Purva Megh Shlok-27:

Circuitous your path: if not received

With tumult in the places of Ujjain

By women sidelong glittering in their eyelids,

Your lightning’s sweep and dazzlement has been

By their eyes’ allurement much deceived.

Purvs Megh Shlok: 28

From undulating lines of birds above

The extended water’s loquacious girdle string,

See the Nirvandhya reveal her navel

And, like a woman passed from dallying

In gestured overtures, declare her love.

कर्नल एच. ए. औवरी यांनी मेघदूताचे गद्यात्मक भाषांतर, ‘The Megha Duta or Cloud Messenger’ ह्या नावाने केले. त्यांच्या अनुवादातील देखील दोन श्लोक पाहूया.

त्वय्या यततं कृषिफ्लमिती भ्रूविलासानाभिज्ञाऐ:

प्रीति स्निगधैर्जनपदवधूलोचनई: पीयमान:।

सद्य सिरोत्कषणसुरभिक्षेत्रमारूह्य मालं

किंचितपश्च्याद्व्रज लघु गति र्भूय एवोत्तरेण ।।१६। पूर्वमेघ

On these depends the fruitfulness of the soil! With these thoughts, imbibed from the eyes of the country women, who are unacquainted with the play of the eye-brows, and which are moist with affection, ascend, when you have reached the fields of mala, that small sweet, having been newly turned up by the plough, a little to the West, with a light movement, and from thence bearing to the Northward.

अजून एक उत्तर मेघातील श्लोक पाहूया. 

भूयश्च्याह त्वमपि शयने  कंठलग्ना पुरा मे

निद्राम गत्वा किमपि रूदती स स्वनं विप्रबुद्धा ।

सान्तर्हासं कथितमस कृतपृच्छतश्च्य त्वया मे

दृष्ट: स्वप्ने कितव! रमयन्कामपि म येति ।।५१।। उत्तरमेघ  

And once again haply thou wilt be on the couch with me formerly, clinging to my neck; suddenly thou wilt awake somewhat weeping, and being repeatedly asked (the reason), you will relate to me, with half-suppressed laughter, ‘You rogue, I saw thee in a dream making love to another.’             

हेमन विल्सन,  श्री. कोलिन जॉन हॉलकोम्ब व कर्नल एच.ए.औवरी  या तिघांनी केलेल्या अनुवादाकडे पहिले असता एक गोष्ट लक्षात येते कि, त्यांनी ‘अक्षरश:’ भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील आनदंडची गोष्ट म्हणजे  अभिहजत संस्कृत साहित्याची तोंडओळख पाश्चिमात्य जगाला व्हायला मदत झाली, परंतु मूळ संस्कृतमध्ये कालिदासाने जितक्या हळुवारपणे भवन ज्या पद्धतीने व्यक्त केल्यात तितक्या हळुवारपणे  व्यक्त करणे त्यानं जमलेले नाही. दुसरे म्हणजे मूळ काव्यबन्ध गद्य  स्वरूपात रूपांतरित केल्यामुळे त्यातील आकर्षकता नक्कीच कमी झालेली आहे; अर्थातच ते गेय नाहीच. पाश्चिमात्य पद्धतीने ओढून ताणून हेल काढून शब्द उच्चारणे म्हणजे गाणे होत नाही. भारतीय संगीतातील ख्याल गायकी, आलाप व हरकती तशाच सुंदरपणे गद्य स्वरूपातील वाक्याना कशा लावता येतील. दुसरा एक भाग म्हणजे, १८१४ व १८६८ या वर्षी हे अनुवाद केलेले असल्यामुळे त्यातील आंग्लशब्द हे जुन्या (Shakespearean) काळातले आहेत व वाटतात. त्यामुळे,  वाचल्यानंतर लगेच अर्थबोध होत नाही. काही विशेष नाव जशीच्या तशी उपयोगात आणली, परंतु तसे करताना, मुळातच गद्य स्वरूपातील उरलीसुरली कायावात्मकता देखील नष्ट झालेली आढळते. एवढे असूनही त्याची मातृभाषा आंग्ल असताना त्यांनी संस्कृत मधील खंड्काव्याचे भाषांतर करण्याचा प्रयत्न स्तुत्यच म्हणावयास हवा.   

मराठीतील काव्यानुवाद:       

मेघदूताचा मराठीत अनुवाद करणाऱ्यांमध्ये रा. प. सबनीस, कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉ श्रीखंडे, पं. ग.वि कात्रे, ना.ग.गोरे, वसंतराव पटवर्धन, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांत शेळके, द. वे. केतकर, अ .ज.विद्वांस असे अनेक  दिग्ग्ज आहेत. सर्वप्रथम आपण सर्वात जुना मराठीतील मेघदूताचा काव्याविष्कार पाहू जो श्री. चिंतामणराव देशमुखांनी १९४३ मध्ये केलेला आहे. तो समश्लोकी, समवृत्त व सयमक असा आहे.

उत्तरमेघातील ७, १२, २२ व ३३ हे श्लोक नमुन्यादाखल पाहू.

नीवीबंधोच्छवसितशिथिलं यत्र बिंबाधराणां

क्षौमंरागादनिभृतकरेश्वाक्षिपत्सु प्रियेषु ।

अरचित्सुन्गानभिमुखमपि प्राप्य रत्न प्रदीपान

ह्रीमूढांनां भवति विफल प्रेरणा चूर्ण मुष्टि: ।।७।। उत्तरमेघ   

आता या श्लोकाचा श्री चिंतामणराव  देशमुखांनी काव्यानुवाद कसा केला तो पाहू.  

                                                                                                                                                                                                                                मुक्तग्रंथी शिथिल कटिचे रेशमी वस्त्र जेथ, औत्सुक्याने पटुतर करे ओढिता दूर नाथ,

बिंबोष्टी सभ्रम शरमुनी फेकिती तो गुलाल, उच्चज्योतीवरति परि हो रत्नदीपात फोल…         

या नंतर, त्यांचाच आणखी एक श्लोक पाहू .

पत्रश्यामा दिनकरहयस्पर्धिनो यत्र वाहा:

शैलोदग्रास्तमिव करिणो वृष्टीमन्त: प्रभेदात ।

योधाग्रण्य: प्रतिदशमुखं संयुगे तस्थिवांस:

प्रत्यादिष्टाभरणरूचयश्च्यन्द्रहासव्रणाङ्कै: ।।१३।। उत्तरमेघ 

नानारंगी वसन, नयनां मद्य जे नाचवीत

लेणी नानाविध, नवं फुले पल्लवाच्या समेत

तैसे पादांबुज सजविण्या आळता जेथ यक्ष

स्त्री-साजाला पुरवि सगळ्या एकला कल्पवृक्ष

तन्वी श्यामा शिखरिदशना पक्व बिंबाधरोष्टी

मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभि: ।

श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्ना स्तनाभ्यां

या तत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्ऐव धातु: ।।२२।। उत्तरमेघ        

बिंबोष्ठी जी सुदति, तरुणी, लोचनांनी कुरुंगी

जैशी भ्याली, तनु-तर-कटी, गाढ-नाभी कृशांगी

श्रोणीभारे लघुपद न घे, अल्प वाके स्तनांनी

वाटे हीच प्रथम विधीची मूर्ति नारी-विधानी              

सा संन्यस्ताभरणमबला पेशलं धारयन्ती

शय्योत्संगे निहितमसकृत दु:खदु:खेन गात्रं ।

त्वामप्यस्त्रं नवजलमयं मोचयिष्यत्यवश्यं

प्राय: सर्वो भवति करुणावृत्तिरार्द्रन्तरात्मा ।।३३।। उत्तरमेघ

झाली दु:खे कृश, उतरली भूषणे मव्दियोगी

अंगा शय्येवरि घडिघडी टाकितें कोमलांगी

दृश्ये अश्रूपरि नवजला ढाळशील स्वयेची

प्राय: सारे सकरुण जया आर्द्रया अंतरीची  

श्री चिंतामणराव देशमुखांनी केलेला स्वैर अनुवाद हा खरोखरीच अत्यंत सुलभ, गेय व सोपा वाटतो. विशेष म्हणजे त्यांनी मूळ मंदाक्रांता हेच वृत्त त्यांच्या स्वैरानुवादाकरिता उपयोगात आणले आहे. त्यांनी शक्यतो मूळ संस्कृतमधील शक्य तितके शब्दही वापरेल आहेत. त्यांच्या अनुवादाचा अर्थ समजण्यास अतिशय सोपा आहे. त्यांच्या रचनेत नादमाधुर्यही आहे, लय आहे व दिमाखात चालणाऱ्या घरंदाज स्त्रीचा भारदस्तपणाही आहे.  

आता आपण प्रसिद्ध कवी कुसुमाग्रजयांनी केलेल्या मेघदूताचा काव्यात्मक अनुवादाकडे वळूयात. अर्थात त्यांच्या पूर्ण  अनुवादाचा परामर्श जागेच्या वेळेच्या अभावी आपल्याला इथे घेता येणार नाही. तेव्हा आपण फक्त काही श्लोक तेवढे पाहू.

तां कस्यांचिद्भवनवलभौ सुप्तपारावतायां

नीत्वा रात्रि चिरविलसनातखिन्न वि द्द्युत्कलत्र: ।

दृष्टे सूर्ये पुनरपि भवान्वाहयेदध्वशेषम्

मंदायन्ते न खलु सुहृदामभ्युपेतार्थकृत्या: ।।३८।। उत्तरमेघ

विलास करुनि थकून कांता सौदामिनी

जिथे पारवे विसावले त्या सौधावर जाउनी

रात्रभरी विश्रांत  सख्या हो, होता सूर्योदय

वाटचाल कर, कार्य प्रियांचे नित्य असावे मनी.

नीवीबनधोच्छवसितशिथिलं यत्र बिंबाधराणां,

 क्षौमं रागादनिभृतकरेश्वाक्षिपत्सु प्रियेषु

अर्चिस्तुंगानभिमुखमपि प्राप्त रत्न प्रदीपान,

ह्रीमूढानां भवति विफल प्रेरणा चूर्ण मुष्टि: ।।७।। उत्तरमेघ

सैल निरी ओढिता सख्याने वसन रेशमी गळे

रुपगर्विता बावरती, ना काय करावे कळे

दिवे मालवावया उधळती गुलाल हातातला

असती पण ते पुंज हिऱ्यांचे, प्रकाश ना मावळे !

यत्र स्त्रीणां प्रियतम भुजलिंगनोंच्छवसिताना,

 मंगलानिं सुरतजनितां तन्तुजालावलंबा:।

त्वत्संरोधापगमविशदैश्च्यपादैर्निशीथे,

 व्यालुम्पन्ति स्फुटजललवस्यंदिनश्च्यन्द्रकांता ।।८।। उत्तरमेघ

उत्तर रात्री निवळता नितळ शशीचे कर,

द्रवुनि छतातिल चंद्रकांत, रस गळे मंचकावर

रमणांच्या विळख्यातुनि  झाल्या मुक्त तिथे अंगना,

शीण रतीचा वारतील ते  रत्नांचे पाझर !     

तन्वी श्यामा शिखरिदशना पक्व बिंबाधरोष्टी,

 मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभि: ।

श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्ना स्तनाभ्यां,

 या तत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्ऐव धातु: ।।२२।। उत्तरमेघ   

देह मुलायम, दात मनोहर, अधर तोंडल्यापरी,

उदरकटी कृश, चकित मृगासम नजर जरा बावरी,

स्तनभाराने लवली किंचित, मंद नितंबामुळे,

स्त्रीरूपाची पहिली प्रतिमा हीच विधाता करी !   

सर्वात अलीकडचा मेघदूताचा काव्यात्मक मराठी अनुवाद केलेला आहे श्रीमती शांताबाई शेळके यांनी.  सर्वात अलीकडचा मेघदूताचा काव्यात्मक मराठी अनुवाद केलेला आहे श्रीमती शांताबाई शेळके यांनी. त्यांच्या अनुवादित मेघदूतातील काही श्लोक पाहूया. 

तस्मिनद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी,

 नीत्वा मासा न्कनक वलय भ्रंशरिक्तप्रकोष्ठ:।

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

 वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।२।। पूर्वमेघ

गिरीवरी त्या महिने काही कंठीत तो राही तो विरही जन

सखिविरहे कृश असा जाहला गळे करातुनि सुवर्णकंकण

आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला

टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला !

त्वामारुढम पवनपदवीमुदगृहीतालकांता:

प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिता: प्रत्ययादाश्र्वसन्त्य: ।

क: संनद्धे विरहविधुराम त्वय्युपेक्षेत जायां,

न स्यादन्योsप्यहमिव जनो य: पराधीनवृत्ती:।।८।। पूर्वमेघ  

वाऱ्यावर तू वाहत जाता केश आपुले मागे सारून वाटसरूंच्या स्त्रिया पाहतील विश्वासे तुज अति आनंदुन

दर्शन होता तुझे उपेक्षिल कोण आपुली प्रिया विरहिणी? मी तर असला पराधीन, जन मजसम दु:खी असेल का कुणि ? 

तत्रावश्यम वलयकुलिशोदघट्टनोन्दगीर्णतोयं नेश्यन्ति

 त्वां सुरुयुवतयो यंत्रधारगृहत्वं ताभ्यो मोक्षस्तव यदि सखे !

धर्मलब्धस्य न स्यात् क्रीडालोला:

श्रवणपरुशैर्गजिर्तिर्भाययेस्ता: ।।६३।।  पूर्वमेघ

सुरललनांची रत्नकंकणे हीरक त्यांचे तुजला रुतता फुट ता धारा करतिल त्या तव धारायंत्रच स्नानाकरितां

ग्रीष्मी जल सुख घेता रमल्या मुक्त न करतिल त्या जर तुजशी कर्ण कटू तर करुनि गर्जना सहज, सख्या रे ! भिवव तयांशी !  

तां जानीथा: परिमितकथां जीवितं मी द्वितीयं

 दुरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम।

गाढोत्कंठा गुरूषु दिवसेंश्वेषु गच्छत्सु बाला जाता

 मन्ये शिशिरमथीता पद्मिनी वाsन्यरूपा ।।२३।। उत्तरमेघ  

केवळ दुसरा प्राणच माझा मितभाषी ती जाण लाडकी विरहें माझ्या मनी झुरतसे चक्रवाकि व जणु एकाकी कठिण दुरावा गाढ सोसता असेल गेली म्लान होऊनी शिशिराचा आघात सोसता विशीर्ण व्हावी जशी कमलिनी!  

उत्संगें वा मलीनवसने सौम्य ! निक्षिप्य वीणां

 मंदगोत्रांकं विरचितपदं गेयमुदगातुकामा ।

तंत्रीरारद्रामं नयनसलिलै: सारयित्वा कथंचिद्भूयो

 भूय: स्वयमपि कृतां मूर्च्छनां विस्मरन्ती ।।२६।। उत्तरमेघ

मलिनवासनिं वा मांडीवरती वीणा घेऊन असेल बसली

नाव गुंफिले ज्यात माझे गीत गावया आतुर झाली

गाताना पण नयनी आसू ओघळती ते तारांवरती

स्वये योजिल्या ताणांचीही सखिला होते, हाय ! विस्मृती !              

श्रीमती शांताबाई शेळके यांच्या अनुवादाकडे बारकाईने पहिले असता आपल्या लक्षात येईल कि, त्यांनी मूळ कालिदासाच्या संस्कृत रचनेतील जवळपास सगळ्या शब्दांना त्यांच्या अनुवादात सामावून घेतले आहे, परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही कि, त्यांनी त्या श्लोकाच्या लक्षार्थाकडे दुर्लक्ष केले आहे. एक गोष्ट मात्र खरीव कि त्यांच्या अनुवादात सहज सुंदर गेयता जाणवत नाही. कदाचित त्यांनी भिन्न वृत्ताचा उपयोग केला असेल व त्यामुळे असे वाटत असेल. एक गोष्ट नि:संशयपणे सांगता येईल कि, त्यांनी मुळ श्लोकातील अर्थाला कुठेही धक्का लागू दिला नाही. 

डॉ रामचंद्र शंकर वाळिंबे यांनी मेघदूताचा मराठीत अनुवाद केला, पण तो काव्यात्मक नसून गद्यात्मक व रसग्रहणात्मक टिका अशा स्वरूपाचा आहे.१० त्यामुळे, इतर वर उल्लेखिलेल्या कवींप्रमाणे मूळ श्लोक व त्याचा तुलनात्मक विचार न करता, त्याऐवजी त्यांनी केलेल्या रसग्रहणाबाबत चर्च करणे जास्त संयुक्तिक ठरेल.

डा. वाळिंबेनी निसर्गसौंदर्याच्या पार्श्वभूमीवर मानवी भावनांची विलसिते, अल्केचे गूढरम्य सौंदर्य, यक्षाचे भवन, यक्षपत्नीचे दर्शन, यक्षसंदेश, शृंगारिक प्रतिमानांची भूमिका, दृकसंवेदनेवर आधारलेली कल्पनाचित्रे, रंगाचे सौंदर्य, श्रोत्रसंवेदनेवर आधारलेली प्रतिमाने, स्पर्शसंवेदनेवर आधारलेली  प्रतिमाने, घ्राणसंवेदनेवर आधारलेली प्रतिमाने, फुलांचे उल्लेख, रसनवेदना, शैलीचे सौंदर्य, मेघदूतातील उपमा, उत्प्रेक्षा, अर्थान्तरन्यास, अशा विविध बाजूने कालिदासाच्या मेघदूतावर प्रकाश टाकला आहे. ते खरोखरीच एक उत्कृष्ट’ विवेचनात्मक पुस्तक आहे.

शाब्दिक पातळीवर विचार करता लक्षात येते कि शांताबाईंनी मूळ श्लोकातला ‘अस्तन्गमितमहिमा’हा शब्द सोडता इतर प्रत्येक शब्दाचा अनुवाद केला आहे. कुसुमाग्रजांनी मात्र कश्चित, स्वाधिकारातप्रमत्त, अस्तंगमितमहिमा, भर्तू:, अश्रमेषु असे तब्ब्ल पाच शब्द अनुवादातून वगळलेआहेत. ‘अस्तंगतमितमहिमा’ गाळण्यासाठी शानबाईकडे चखल प्रतिशब्द नसल्याचे किंवा प्रतिशब्द वृत्तात बसत नसल्याचे कारण होते, पण कुसुमाग्रजांनी जे शब्द गाळले आहेत, त्यांचे स्वरूप पाहता हि करणे त्यांना लागू होणार नाहीत. अशा अनुवादांवर साधारणपणे मूळ साहित्यकृतीशी अप्रामाणिक असा शिक्का बसतो. पण आपण जरा वेगळ्या दृष्टीकोणातून पाहू……. कुसुमाग्रजांच्या मते मेघदूत हे भावकाव्य आहे. क्लूसुमाग्रज मेघदूताची तुलना उमर खय्यामच्या ‘रुबायत’ शी करतात. त्यांच्या  मताप्रमाणे, रुबायांप्रमाणेच मेघदूतातील प्रत्येक श्लोक हि स्वतंत्र कविता आहे. म्हणूनच कि काय, ते अनुवादित  श्लोकांसाठी ‘रुबाई’ चाच साचा वापरतात. असे केल्याने कुसुमाग्रजांच्या अनुवादाला एक वेगळे वैशिष्ठय प्राप्त झाले आहे. त्यांचं अनुवादाचे पण मधेच उघडले आणि वाचायला सुरुवात केली तरी आधीच श्लोक न वाचताही त्या श्लोकाचा  आस्वाद घेता येतो…….मूळ मेघदूतात ‘मंदाक्रांता’ नावाचे अक्षरगणवृत्त वापरले आहे. अनुवादासाठी मात्रावृत्त वापरणे केव्हाही चांगलेच ! कारण त्यामुळे लघु-गुरुची जाचक चौकट  नसूनही मात्रात बांधलेली सुंदर, लयबद्ध रचना करता येते. ‘साकी’ या वृत्तात लागणाऱ्या मात्रांची संख्या व ‘मंदाक्रांता’ या वृत्तातील मात्रांची संख्या सारखीच म्हणजे २७ इतकी आहे. एक मात्र म्हणजे एखादा नाद उच्चारण्यासाठी लागणार कालावधी लागतो, परंतु मेघदूतात ओळीतील लघु-गुरूंचा एक विशिष्ट क्रम आहे, तर तसे बंधन नसल्याने तेवढ्याच कालावधीच्या चौकटीत राहूनही कुसुमाग्रजांना अनुवाद करण्यासाठी तुलनेने अधिवक् स्वातंत्र्य मिळते .

शांताबाईंनी सुद्धा मात्रावृत्तच वापरले आहे. त्यांनी वापरलेल्या वृत्ताचे नाव पादाकुकला, परंतु या वृत्तात मात्रासंख्या ३२ म्हणजे मंदाक्रांता व बाकीच्या मात्रा संख्येहून अधिक आहे. मूळ श्लोकाच्या वृत्ताहून अधिक

मात्रासंख्या असलेले वृत्त अनुवादासाठी वापरणे ही शांताबाईंच्या अनुवादाची गरज होती, कारण त्यांना मेघदूतातील प्रत्येक बारीकसारीक तपशील अनुवादात टिपायचा होता.११

येथून पुढे जाण्यापूर्वी, डॉ वा. वि. मिराशी यांची काही निरीक्षणे पाहणे संयुक्तिक ठरेल. “मार्गात लागणारी गंभीरा नदी, देवगिरी नामक पर्वतावरील कार्तिकेयाचे देवालय, चर्मनवती(चंबळा) नदी, दशपुर (हल्लीचे मंदसोर), ब्रम्हावर्त देश, कुरुक्षेत्र, सरस्वती व गंगा या नद्या व शेवटी हिमालय व त्यावर वसलेली अलका यांचे थोडक्यात पण मनोरम वर्णन करून कवीने आपल्या काव्याचा पूर्वार्ध समाप्त  केला आहे. या भागात रामगिरीपासून अलकेपर्यंतच्या मार्गावर लागणारे पर्वत, नद्या, देश , नगरे , ग्राम, वने व उपवने यांचे रमणीय  वर्णन आल्यामुळे हा भाग अत्यंत चित्ताकर्षक झाला आहे. यात ठिकठिकाणी कवीच्या कल्पनेचा रम्य विलास दृष्टीस पडतो. पण हि स्थळे सर्वांच्या परिचयाची असल्यामुळे कवीला त्यात आपल्या कल्पनाशक्तीला स्वैर  सोडता येईना, म्हणून उत्तरार्धात अलका नगरीच्या व यक्षगृहाच्या वर्णनात त्याने आपल्या प्रतिभेने नूतन सृष्टी निर्माण करून कल्पनाशक्तीला यथेच्छ विहार करण्यास मोकळीक दिली आहे: “वा मेघ ! अलका नगरीतील गगनचुंबी प्रसाद चित्रादिकांनी सुशोभित, मृदगध्वनीने युक्त व रत्नखचित आहेत. तेथे राहणाऱ्या यक्षांना सदैव तारुण्याचा उपभोग घेता येतो. तेथील वृक्ष व कमलिनी नेहमी सपुष्प, मयूर आनंदित व रात्री चंद्रप्रकाशयुक्त असतात. तेथील हर्म्यांच्या स्फटिकयुक्त पृष्ठभागावर बसून तुझ्याप्रमाणेच गंभीर अशा मृदंगाचे बोल ऐकत यक्ष स्वस्त्रियांसमवेत मद्यपान करीत असतात. त्या ठिकाणी चित्रविचित्र रंगांची वस्त्रे, मद्य, अलंकारार्थ पल्लव व पुष्पे, पायांना लावण्याचा लाक्षाराग, इत्यादी स्त्रियांना लागणारी सर्व प्रकारची वेशभूषा एकटा कल्पवृक्ष पुरवीत असतो. तेथे श्रीशंकराचा साक्षात वास असल्याने मदन आपल्या धनुष्याचा उपयोग करीत नाही; पण त्याचे कार्य चतुर स्त्रियांच्या अमोघ कटाक्षांनी होऊन जाते.”१२ 

मेघदूताचे वेड इतक्या शतकानंतरही अजून कायम आहे. आपण सुरुवतीलाच पहिले की कित्येक मराठी कवींनी मेघदूतचे मराठीत अविष्करण आपआपल्या पद्धतीनुसार, समजुतीनुसार व कल्पनेनुसार केलेले आहे. तसेच ते इंग्रजी भाषेतही केलेले आहे. जर्मन भाषेत देखील झालेले आहे. हिंदीमध्ये स्व. हरिवंशराय बच्चन यांनी देखील केलेला आहे. भारतातील इतर भाशात सुद्धा आहे. एकंदरीत, कुठल्याही भाशेतील कवीला मेघदूताने मंत्रमुग्ध केले नाही असे उदाहरणच सापडणार नाही.

साभार संदर्भ:

  • कालिदास एक समग्र दर्शन, खंड १६ वा, १ ली आवृत्ती, पृष्ठ: ७५ व ७६, लेखक पदमभूषण डॉ. वा.  वि. मिराशी    
  • संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास, लेखक: डॉ. विनायक वामन करंबेळकर, पृष्ठ: २३१ व २३२
  • ‘कालिदास, पदमभूषण डॉ वा. वि. मिराशी, पृष्ठ क्रमांक ११८
  • The Megh Duta or Cloud Messenger – a Poem in the Sanskrit Language by Horace Hayman Wilson, published by Black, Parry and Company, London, 1814
  • The Cloud Messenger – The Meghaduta by Kalidas by Colin John Holcombe, published by Ocaso Press, Ltds. Santiago, Chile, 2008
  • The Megha Duta or Cloud Messenger by Colonel H. A. Ouvry, C.B. Member of the Royal Asiatic Society, Published by Williams and Norgate, London, 1868
  • महाकवि कालिदासाचे मेघदूत अनुवादकर्ता चिंतामण द्वारकानाथ देशमुख, प्रकाशक – सौ. सुधा महादेव जोशी, पुणे, १९५२
  • मेघदूत – वि. वा. शिरवाडकर  (कुसुमाग्रज), जोशी आणि लोखंडे प्रकाशन, पुणे
  • मेघदूत – श्रीमती  शांताबाई  शेळके, प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, १९९४ / २०१९
  • मेघदूत – विवेचक रसास्वाद, मूळ संस्कृत, मराठी अनुवाद व टीपा, डा. रामचंद्र शंकर वाळिंबे, प्रकाशक – जोशी आणि लोखंडे प्रकाशन, पुणे, १९५७
  •  कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास: अर्चना आंबेरकर   https://pandharyavarachekale.wordpress.com/2008/12/28/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/
  •  क्रमांक १ प्रमाणे
Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top