Marathi

मेघ बरसला हरी कृपेचा

माळावरती उभी साजरी, एक सानुली पर्णकुटी

वेलीवेली मधुनी जातसे, वाट चिमुकली स्वप्न जशी……

हिरव्या वेली हिरवी पाने, चैतन्याचा दिव्य मळा,

फुलाफुलांचा रंग बहरला, वनराणीचा गोड लळा…….

माळावरती दूर पसरली, हिरवी पिवळी रम्य फुले,

धुंद पाखरे वने विहरती, वनराणीचा स्नेह फुले……….

लवलेल्या त्या प्रेमळ वेली, वृक्षावरती प्रेम दिसे,

मंदगतीने  विहरत ललना, वनात त्यांचे प्रेम वसे……….

वाट चिमुकली ललना जाती, पक्षांचेही लक्ष थवे,

सूर्याफुलांच्या  आसक्तीने, नभी शुकांचे लक्ष थवे……….

वाट नर्तकी सुंदर भासे, अशी तोरणे पुष्पांची,

रानफुलांची हिरवी पिवळी, उधळण झाली रंगाची…………

पर्णकुटीच्या दारावरती, इवल्या इवल्या माळा त्या,

पाहुनी ललना आनंदाने, तिथे थबकती अवचित त्या…….

पर्णकुटीच्या अंतर्यामी, सप्तसुरांची दिव्य पदे,

अवचित ललना मुग्ध जाहल्या, कशा थिरकती शब्दपदे…..

मधूर मंगल स्वरावली ती, अंतरातले  गीत असे,

प्रेमारंगे हरी भेटण्या, ललनांचे ते रूप दिसे……….

मीरामय त्या ललना दिसती, हरी शोधण्या मुक्तमनी,

अधीरतेने कृष्ण सख्याच्या, बावरलेल्या भावांनी……….

तसा अचानक कृष्ण सखा तो , अवतरला त्या दिव्यवनी,

युगायुगाची प्रीत आठवूनी, मीरा-ललना स्तब्ध मनी…………..

शब्द थांबले उगा कशाला, शब्दांचे ते बंध तसे,

नयनामधुनी अंतरातले, सुखस्वप्नांचे प्रेम दिसे…………

मीरा राधा नर्तन करती, आलापांचे गीत जसे,

मनी भाळला हरी प्रिया तो, प्रेम भासते दिव्य जसे…………..

वनराणीही तिथे थबकली, धुंद पाहुनी राधा त्या,

मनी साठवी प्रेम हरीचे, ऐकुनी पावा राधा त्या………………….

क्षणात सार्‍या स्तब्ध जाहल्या, वेणूचा तो सुर नसे,

मंगल गाणी सप्त सुरांची, आणि हरी तो तिथे नसे……………

क्षणात सार्‍या बावरलेल्या, हरी शोधती नीलनभा,

रूप तयाचे नभात दिसता, मनात त्याची दिव्य अभा……………….

हरी तसा तो नभात दिसता, क्षणात फिरती शिघ्रगती,

पदन्यासाने राधांच्या त्या, मेघ बरसला प्रेमरती………………

मिलन तयांचे तसे आगळे, रंगाचे ते सूर नभी,

मनी कल्पना स्नेह वलय ते, प्रीत तयांची दिव्य वनी………

मेघ बरसला हरी रुपाचा, चिंब जाहल्या सार्‍या हो,

शांत मनीचे प्रीतगीत ही, सर्व हरीच्या झाल्या हो…………….

मुकुंद भालेराव

औरंगाबाद / ०१-०५-२०२१ / ३१-०८-२०२१

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top