Marathi My Articles

तत्वज्ञान – भारतीय तत्वज्ञान व षडदर्शने

तत्वज्ञान ह्या शब्दाला आंग्लभाषेत ‘Philosophy’ असा शब्द आहे. संकृत मधील ‘दर्शनशास्त्र’ ह्या करिता Philosophy हा शब्द मुळीच योग्य नाही, कारण त्याचा अर्थ ज्ञानाविषयी प्रेम [Philo=Knowledge] व [Sophie=Love], म्हणजे ज्ञानाविषयी प्रेम. म्हणून दर्शनशास्त्राकरिता ‘Philosophy’ हा शब्द अयोग्य आहे. त्याकरिता फारतर जवळचा शब्द ‘Mysticism’ असा स्विकारता येऊ शकतो, याचे कारण खरोखरीच दर्शनशास्त्र गूढ, अगम्य व समजण्यास अतिशय कठीण आहे. दर्शनांचा उद्देशच मुळी तत्वांचे ज्ञान करून घेणे असा आहे. असो. तर ह्या तत्वज्ञांच्या (दर्शना) माध्यमातून आपल्याला जे माहीत करून घ्यावयाचे आहे, समजून घ्यावयाचे आहे ते काय आहे? हेच तर आपल्याला माहिती नाही. ‘ते’ अगम्य, अतर्क्य व गूढ ज्ञान म्हणजे नक्की काय व कसे याचाच शोध तर घेणे आवश्यक आहे. ‘ते’ हे अज्ञात आहे ते आपण जे आहे त्याच्या माध्यमातून ते जे ‘नाही–आहे’ त्याची कल्पना करण्याचा सदोदित प्रयत्न करत असतो. खरे तर, हे ही खरे नाही. आपला प्रयत्न ‘ते’ जे नाही–आहे, त्या पलीकडे (beyond) जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रश्न असा आहे की, आपल्या मर्यादित क्षमतेने आपण ज्ञात नसलेल्या त्या’अतिगूढ अस्तित्वाचा वेध कसा घेणार? आपण मुळातच ‘असण्याच्या पलीकडे असेलल्या किंवा कदाचित नसलेल्या गोष्टीची कल्पना प्रत्यक्षात असलेल्या मर्यादित शक्ति, बुद्धी व कल्पकतेच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न करत आहोत व हा शोध कशाकरिता तर संपूर्ण विश्वाला नियंत्रित करत असलेल्या ‘त्या’ अदृश्य शक्तीचे ज्ञान व प्रत्यंतर घडून येण्याकरिता. शास्त्रज्ञ देखील हेच करत असतात. सर्व शास्त्रज्ञ जे ज्ञात आहे त्या पलीकडे काय आहे व असू शकते याचा सदोदित मागोवा घेत असतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा उद्देश मानवी आयुष्य अधिक सुखकर, सोपे, आनंदी व सहज बनविणे हाच असतो, परंतु दार्शनिक जे असतात ते केवळ ऐहिक आनंदाकरिता आज्ञाताचा शोध घेत नसतात, तर जे ज्ञात आहे त्याच्या पलीकडे जे आहे किंवा असेल, ते नेमके काय व कसे आहे याचा शोध घेतात, कारण दार्शनिकांचा उद्देश ऐहिक सुख हा कधीच नसतो व असूही शकत नाही. त्यांचा उद्देश मूळ तत्व काय आहे (What is the Essence?) हा पूर्वीही होता व आज आहे व भविष्यात देखिल असेल यात तिळमात्रही शंका नाही. आपण जर ‘हिरण्यगर्भसूक्त’ किंवा ‘नासदीय सूक्त’पहिले तर हे आपल्याला नक्की पटेल.

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत ।
स दाधार पृथ्वीं ध्यामुतेमां कस्मै देवायहविषा विधेम ॥

‘कस्मै देवा हविषा विधेम?’ हाच एक प्रश्न हिरण्यगर्भ सुक्तात वारंवार येतो, प्रत्येक कडव्याच्या शेवटी. याचे कारणच मुळी हे आहे की, ते ’तिथे पलीकडे जे आहे; कदाचित त्या द्रष्टयांच्या दिव्य दृष्टीला त्याचा भास किंवा आभास किंवा अनुभूति झाली असेल, परंतु ती अनुभूति कदाचित अपूर्ण असेल असे त्यांना वाटले असेल व म्हणूनच त्या द्रष्ट्या ऋषींनी तरीही ‘कस्मै देवा हविषा विधेम? हा प्रश्न वारंवर विचारला असेल. अशीही एक शक्यता आहे की, त्यांना भगवान श्रीकृष्णांनी अभिन्नहृदयस्यवयस्य परमसखा अर्जुनाला जसे विश्वरूप दर्शन दिले, तसे काहीतरी भव्यदिव्य दिसले असेल व त्या अनिर्वचनीय दर्शनाने ते इतके मंत्रमुग्ध झाले असतील की, त्यांना त्या अगाध दृश्याचा अर्थ व संदर्भ लागला नसेल व म्हणूनच त्यांनी ‘कुठल्या देवाला हवी अर्पण करू?’ असा प्रश्न विचारला असेल.तसे तर ‘उष:सूक्त’तील काव्यकल्पना ह्या नितांत सुंदर, मनोहारी व आपल्या चित्ताला मोहून टाकणार्याि आहेत. खरे तर त्यास ‘शब्दचित्र’ संबोधने जास्ती योग्य आहे, कारण उष:सूक्त वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण चित्र जसेच्या तसे उभे राहते. यावरून असे ठामपणे म्हणता येऊ शकते की, ते महर्षि खरोखरच द्रष्टे होते, अन्यथा त्यांना अशा दिव्य गोष्टींची अनुभूती होणे शक्यच झाले नसते व हाच फरक चर्मचक्षूनी पाहणार्याह आपल्या सारख्या सामान्य व्यक्ति व द्रष्ट्या महर्षिमध्ये आहे. त्यांच्या दिव्यदृष्टीला जे दिसू शकते व जे पूर्वी दिसले असेल ते आपल्या सारख्या सामान्य माणसाला सहजपणे दिसणे शक्यच नाही. मी म्हणतो ‘सहजपणे’ दिसणे शक्य नाही, म्हणजे अविश्रांत प्रयत्न केले तर कदाचित दिसूही शकेल. जर संत ज्ञांनेश्वरांच्या अपार सामर्थ्याने रेडा वेद म्हणू शकतो, तर परम शक्तिमान दिव्य पुरुषांच्या कृपेने सामान्य माणसाला देखिल असामान्य गोष्टी शक्य होऊ शकतात. जसा एक श्लोक आपण सर्वांनी ऐकलेला असेलच, मूकं करोति वाचालं, पंघूम् लंघयते गिरिं | यत्कृपा तमहं वंदे, परमानंद माधवं || परमेश्वर जर मुक्याला बोलका करू शकतो, लंगड्याला पर्वतावर चढण्यास मदत करू शकतो, जर परमेश्वराने कृपा केली तर. तशीच मदत आपल्याला केली व आपली त्याकरिता असामान्य, अतीव, खडतर व अविश्रांत प्रयत्न करण्याची तयारी असेल तर मग काहीच दुरापास्त नाही. हे करत असताना, आपण गृहीत धरत आहोत की, आपल्याला माहीत असलेल्या व ज्ञात असलेल्याच्या पलीकडेही काहीतरी आहे. ते जे ‘नाही–आहे’ ते खरच आहे का हाच आपला खरा प्रश्न आहे. आपली समस्या अशी आहे की, ‘ते जे नाही-आहे’ते अस्तित्वातच नाही असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही, कारण ‘ते’ नसल्याचा सबळ पुरावा आपल्याकडे नाही, तसेच ‘ते’ असल्याचाही पुरावा आपल्याकडे नाही; आणि म्हणून सबळ पुरवयाच्या अभावी, आपण तिला नाकारण्यापेक्षा सुरक्षितपणे ते असावे असा कयास करून पुढे जात असतो. म्हणजेच ‘त्या’ अदृश्य असलेल्या द्र्व्याला अथवा शक्तीला अथवा ऊर्जेच्या स्त्रोताला आपण गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहोत. किंबहुना अशीच धडपड ऋग्वेदकाळात द्र्ष्ट्या ऋषींनी केली असेल, खरे तर जास्तच तीव्रपणे केली असेल व त्या तिव्रतेच्या प्रमाणात व त्या महर्षिन्च्या आर्ततेच्या अनुषंगाने त्यांना ‘त्या’चे दर्शन झाले असेल. शक्यता तर अशीही आहे की, त्या अनेक महर्षिनी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार जे प्रयत्न केले असतील, त्यांना ‘त्या’चे जे काही दर्शन झाले असेल त्याचे प्रस्फुटिकरण त्यांनी केले असेल. त्याचेच ज्ञात स्वरूप म्हणजे ‘सांख्यदर्शन’, ‘योगदर्शन, ‘वैशेषिक दर्शन’, ‘न्यायदर्शन’वगैरे.

खरे तर ते ‘त्यांचे’ दर्शन झाले. त्या दर्शनांची खरी अनुभूति आपल्याला ‘वैयक्तिक’ हवी असेल, तर आपल्याला स्वत:ला तसे प्रयत्न करावे लागतील. जसे आपल्याला भूक लागली, तर आपल्याला स्वत:ला जेवावे लागते, तरच आपले पोट भरते, ते जेवण दुसर्यााने करून चालणार नाही; अगदी तसेच ‘त्या’चे, म्हणजे जे ‘नाही–आहे’ ते खरेच कसे आहे हे अनुभवण्याकरिता स्वत:ला कष्ट घ्यावे लागतील. एवढे मात्र खरे की, ‘महाजनो येन गतस्य पंथा:|’ह्या उक्तीप्रमाणे, त्या द्रष्त्यांनी अनुभवलेल्या दर्शनाच्या सहाय्याने त्यांनी दाखविलेल्या मार्गाने, ते गेलेल्या मार्गाने, कदाचित आपण लवकर व विनासायास तिथपर्यन्त पोहचू शकू.

‘दर्शनशास्त्र’ याचा अर्थ मुख्यत: ‘शड्दर्शने’, शिवाय पूर्वमिमांसा व उत्तरमिमांसा. दर्शनशास्त्रामध्ये दोन प्रकारची दर्शने आहेत, आस्तिक व नास्तिक दर्शने. आस्तिक म्हणजे जे वेदाला प्रमाण मानतात ते, व नास्तिक म्हणजे जे वेदांना प्रमाण मानत नाहीत. आस्तिक दर्शनामध्ये, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा यांचा समावेश होतो; तर नास्तिक दर्शनांमध्ये चार्वाक, जैन व बौद्ध दर्शनांचा समावेश होतो. म्हणजे एकूण नऊ दर्शन दर्शन शास्त्रात अंतर्भूत आहेत. दर्शन याचा अर्थ ‘दिसणे व ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो व अनुभूती घेऊ शकतो ते. प्रश्न असा उपस्थित होतो की, कशाचे दर्शन घ्यायचे? ‘दृश्यते इति दर्शन:|’ जे दृगोच्चर होते किंवा दिसते ते ‘दर्शन’. हा झाला सामान्य अर्थ, परंतु इथे ‘दर्शनशास्त्र’ म्हणजे सामान्य गोष्टींचे दर्शन नव्हे, तर अतर्क्य असे जे सामान्य बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या, व्याप्तिच्या व शक्तिच्या पल्ल्याड आहे, त्या अगम्य व तर्कातीत आहे अशा अस्तित्वाचे दर्शन. पातंजल योगसूत्रात ‘अदृश्य होणे’ व ‘अश्राव्य होणे’ याचे उल्लेख आहेत. पातंजल योगसूत्रात विभूतिपादामध्ये ‘संस्कारसाक्षात्करणात्पूर्वजातिज्ञानम्’ ||१८|| चित्तामध्ये अनंत जन्मार्जित वासनांचे संस्कार असतात. ह्या संस्कारांवर संयम केल्याने त्यांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार झाल्यावर त्यामुळे त्या योग्याला कोणत्याही पूर्वज्न्माचे ज्ञान होते. त्या मार्गाने जावयाचे किंवा नाही हे ज्याचे त्याला ठरवावे लागेल, जर ती अनुभूति घेण्याची ईच्छा असेल तर. थोडे पुढे जाऊन महर्षि पातंजलि म्हणतात,

‘कायरूपसंयमात्तद्ग्राग्राह्यशक्तिस्तम्भेचक्षु: प्रकाशासंयोगेSन्तर्धानम्’ ||२१||

आपल्या शरीराचे जे रूप त्यावर संयम केल्याने ते शरीर इतरांस नेत्रेंद्रियद्वारा ग्राह्य व्हावे अशा प्रकारची त्याच्या ठिकाणी जी शक्ति आहे, तिचे स्तंभन होते व त्यामुळे पाहणार्यारच्या चक्षुरिंद्रियाचा जो प्रकाश योग्याच्या शरीराच्या स्वरूपाचा संयोग होत नाही व म्हणून योगी अंतर्धान पावतो, म्हणजे त्याच्या शरीराचे रूप पाहणाराला दिसत नाही.

आता असा मार्ग तर महर्षि पतंजलिनी आपल्याला दाखविलेला आहे. कुणाला खरोखर असे अदृश्य होता येते का हा अनुभव घ्यावयाचा असेल तर खडतर प्रयत्न करावे लागतील; कारण हे महर्षि पतंजलीन्चे दर्शन आहे. आपल्याला ती अनुभूति घ्यावयाची असेल तर आपल्याला आपले प्रयत्न करावे लागतील. असे अदृश्य होणे हे काही ‘मि. इंडिया’ त दाखविल्याप्रमाणे हातात एखादे घड्याळ घालून शक्य होणार नाही; कारण ती चित्रपटातील कल्पना आहे. अस्तू.

न्याय दर्शनामध्ये महर्षि गौतमानी काही तत्वे प्रतिपादिलेली आहेत. त्यापैकि काही आपण पाहू. प्रथम खंडात प्रथम प्रकरणामध्ये ते म्हणतात, “बुद्धि:” उपलब्धिर्ज्ञानमित्यनर्थान्तरम् ||१.१.१५|| उपलब्धि (apprehension), प्र्त्यक्ष (perception) व बुद्धी (intellect) ह्या तीन संकल्पना एकमेकांशी संबंधित जरूर आहेत पण एक नाहीत. सांख्य दर्शनाप्रमाणे, बुद्धी ही मूलस्थ आहे, स्वभावत: आहे, परंतु, ज्ञान (knowledge) हे बाहेरील गोष्टींच्या आत्म्यावर होणार्याह अप्रत्यक्ष प्रतिबिंबात्मक स्वरूपाचे आहे आणि आत्मा हा स्फटिकप्रभ जाणिवेचे निवासस्थान आहे. हा सिद्धांत आपण अनुभवू शकतो खचितच.

परं वा त्रुटे: ||४.२.१७|| ‘अणू’ म्हणजे ज्याचे अजून पुढे विभाजन होऊ शकत नाही (Indivisible). दोन अणूंचा एक द्वाणूक व तीन द्वाणुकांचा एक त्रसरेणु बनतो. सर्व गोष्टी ज्यांची आपल्याला जाणीव (Perceive) होते, त्या सर्व प्रसरेणूंच्या बनलेल्या आहेत. अणू हा द्वानुकापेक्षा सूक्ष्म व त्रसरेणुपेक्षा सूक्ष्मतर असतो. ही संकल्पना तर विज्ञानाने सुद्धा आता मान्य केली आहे. वैशेशिकदर्शनामध्ये महर्षि कणादांनी काही दृष्टान्त मांडलेत. त्यातील काही आपण उदाहरणादाखल पाहू या. ‘द्रव्यगुणयो: सजातीयारम्भकत्वं साधर्म्यम् |१.१.९|’ द्रव्य आणि गुण यामध्ये आपल्या सारख्याच सजातीय वस्तूंना उत्पन्न करण्याचा गुणधर्म असतो. हे द्रव्य व गुण यातील साधर्म्य आहे. उदा, पृथ्वीरूप जडद्रव्यातून पृथ्वी सदृश्य वस्तु उत्पन्न होतात, जळाच्या द्रवत्वामुळे त्याच्याशी संपर्कात आलेले पृथ्वीतत्वाचे पदार्थ द्रवरूप धारण करतात, तेजाच्या संयोगाने त्याच्या संपर्कात आलेले पृथ्वीरूप धातू तेज धारण करतात. एका प्रकारच्या वायुतून दुसर्याच प्रकारचे वायु निर्माण होतात. तसेच गुणातून गुण उत्पन्न होतात, जसे एका प्रकारच्या गंधातून दुसर्याक प्रकारचा गंध, एका प्रकारच्या रसातून दुसर्या प्रकारचा रस, एका प्रकारच्या रुपातून दुसर्याे प्रकारचे रूप, एका प्रकारच्या स्पर्शातून दुसर्याा प्रकारचे रूप, एका प्रकारचा स्पर्श तर एका प्रकारच्या स्वरातून दुसर्यात प्रकारचा स्वर निर्माण होतो. याप्रमाणे, द्रव्य आणि गुण आपल्यासारखेच पदार्थ निर्माण करतात हे द्रव्य आणि गुण यातील ‘साधर्म्य’ होय.

द्रव्यांनाम द्रव्यं कार्यम् सामान्यम् |१.१.२३| द्रव्याची निर्मिती गुणान्पासून होऊ शकत नाही, कारण गुण हे द्रव्यांच्या आश्रयाने राहतात. एखाद्या वस्तूला रंग, वास इत्यादि गुण असतात. त्या गुणातून ती वस्तू उत्पन्न होऊ शकत नाही. अधिक स्पष्टीकरण देत असे म्हणता येईल की, गंध हा पृथ्वीचा गुणधर्म असला तरी गंधातून पृथ्वी उत्पन्न होत नाही, रस हा जलाचा गुणधर्म असला तरी रसातून जल उत्पन्न होत नाही, रूप हा तेजाचा गुणधर्म असला तरी रुपातून तेज उत्पन्न नाही, स्पर्श हा वायुचा गुणधर्म असला तरी स्पर्शातून वायु उत्पन्न होत नाही तसेच शब्द हा आकाशाचा गुणधर्म असला तरी शब्दातून आकाश उत्पन्न होत नाही. गुणातून उत्पन्न न होणे हा द्र्व्यांचा गुणधर्म आहे.

विषाणी ककुद्मान प्रांते बालधि: साम्नावान् इति गोत्वे दृष्टम लिंगम |२.१.८| शिंग, वशिण्ड, शेपटाला केसांचा गोंडा, गळ्याखाली पोळी इत्यादि लक्षणे ही ‘गोत्व’ गाय असण्याची चिन्हे होत. एखादी वस्तू वा पदार्थ ओळखला जातो तो त्याच्या वैशिष्थ्यपूर्ण अशा लक्षणावरुन. या लक्षणासच ‘लिंग’ असे म्हटले जाते. ही लक्षणे दिसून आली म्हणजे त्यावरून ‘ती अमुक वस्तू आहे’ असे अनुमान करता येते. याप्रमाणे, लिंग अथवा लक्षणचिन्ह हे अनुमानाचे साधन असते असे म्हणता येते. वरील सुत्राने गाय अथवा ‘गोत्व–गायपणा’ कशावरुन ओळखावा याची सामान्यलक्षणे उदाहरण म्हणून दिली आहेत. लिंग हे प्रत्यक्ष दिसून आले तरच त्यावरून लिंगीचे, म्हणजे ते लिंग ज्याचे आहे त्या वस्तूचे अनुमान करता येते.

वरील तीन दर्शनांमधील सिद्धांताचा अनुभव आपल्याला देखिल घेता येऊ शकेल व तो तसा घेणे अगदीच अशक्य मुळीच नाही. याचा अर्थ असा मुळीच नाही की सर्वच्या सर्व सिद्धान्त आपल्याला अगदी सहजपणे अनुभवता येतील. काही अगदी सहजपणे, काही थोड्याशा प्रयत्नाने, तर काही अनुभवण्याकरिता खूप परिश्रम घ्यावे लागतील व वेळही लागेल; हे जर मान्य असेल तर मग निश्चयपूर्वक संकल्प केला की, तिथपर्यंत नक्कीच पोहचता येईल.

सर्व सहा दर्शने आपल्याला अंतर्मुख व्हायला उद्युक्त करतात, प्रोत्साहित करतात, आपल्याला तशी ऊर्जा प्रदान करतात, व तेथपर्यन्त पोहचण्याकरिता सहाय्य सुद्धा करतात. अर्थात हे सहा मार्ग आहेत त्या अदृश्य गंतव्याच्या ठिकाणी पोहचण्याचे. हेच तर तत्वज्ञान आहे. त्याविषयी जरा बोलू या. ‘तत्वज्ञान’ म्हणजे तत्वासंबंधी ज्ञान. ‘तत्’ म्हणजे ते, जे काही आहे ते, ते सर्व, एकूण एक, यच्चयावत. या ‘तत्’ चा तत्-पणा म्हणजे तत्व. जसे मनुष्याचा मनुष्यपणा म्हणजे मनुष्यत्व किंवा पशुचा पशुपणा म्हणजे पशुत्व, तसे ‘तत्’ चा तत्-पणा किंवा ‘तत्’ चे सार म्हणजे तत्व. ह्या व अशा अगणित प्रश्नाची उत्तरे शोधण्याकरिता लहान मुलासारखे निर्व्याजपणे स्वत:ला व इतरांना प्रश्न विचारावे लागतील. जसे आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात पाहतो की, लहान मूल एकसारखे प्रश्न विचारत असते जो पर्यन्त त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्याच्या सारखे सातत्त्याने, न थांबता प्रश्न विचारणे हाच मार्ग आहे, अर्थात तशा प्रश्नावर मनन व चिंतन देखिल आवश्यक आहे.

[‘परिणामत्रयसंयमादतीतानागतज्ञानम्’ – विभूति पाद: सूत्र: १६]

आपली ज्ञानेंद्रिये व कर्मेन्द्रिये ह्यांच्या व्यापारांचे नियंत्रण करणारे जे अंतरींद्रिय त्यास ‘अंत:करण’ (Inner Cosmos) म्हणतात. ‘हे अमुक आहे’ असे निश्चित ज्ञान ग्रहण करणे व अशी अनेक निश्चित ज्ञाने आपल्या ठिकाणी सांठवून ठेवणे हे ‘बुद्धी’ चे कार्य आहे. अज्ञात गोष्टींचे ज्ञान करून घेण्याच्या जिज्ञासावृत्तीने जेंव्हा अंत:करण त्या अज्ञात गोष्टींचा शोध घेत असते तेंव्हा त्याला ‘मन’ असे म्हणतात आणि बुद्धीला ज्ञात झालेली गोष्ट पुन: वाटेल तेंव्हा बुद्धीला स्मरावी म्हणून त्या ज्ञात गोष्टींचे वारंवार अनुसंधान करणारे ते ‘चित्त’ असते. अमुक गोष्ट कशी असेल, अशा विचाराने अनेक युक्त्याप्र्युक्त्या व शंकासमाधान ह्यांच्या साहाय्याने जेंव्हा ती अज्ञात गोष्ट समजावून घेतली जाते, तेंव्हा त्या प्रक्रियेला ‘मनन’ असे म्हणतात. मननाने एकदा कोणतीही गोष्ट त्या वेळेपुरती नि:संदेह समजली म्हणजे मग ती व्यवस्थित स्मरणात रहावी आणि पुन: तिच्याविषयी शंका उत्पन्न होऊ नये म्हणून त्या गोष्टींचा वारंवार विचार करणे म्हणजेच ‘चिंतन’.

या ही पलीकडे जाऊन, ‘ते’ अतर्क्य व अगम्य वाटणारे ज्ञान मिळवायचे असेल तर सर्वप्रथम, आपल्याला ‘देहच मी आहे’ आणि सर्व गोष्टींचा कर्ताकरविता सुद्धा मीच आहे अशी भावना दूर करावी लागेल, नष्ट करावी लागेल. जेंव्हा जेंव्हा अंत:करणात अशी भावना निर्माण होते तेंव्हा त्या वृत्तीला ‘अहंकार’ म्हणतात, व असा अहंकारच ज्ञान प्राप्तीच्या मार्गातील मोठा अडसर असतो; आणि जो पर्यन्त ह्या व अशा प्रकारच्या अहंकारावर आपण नियंत्रण मिळवत नाही तो पर्यन्त आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण त्या अतिदूर, अतर्क्य, अगम्य व महान ज्ञांनापासून वंचित राहू. सारांश असा की, ‘स्वयं-नियंत्रण’ (Self-Control) असल्याशिवाय पुढे जाणे शक्यच होणार नाही; आणि सर्वात कठीण हेच आहे ‘स्वयं नियंत्रण.’ ह्या स्वयं नियंत्रणाकरिता अंतर्मुख होणे अत्यंत आवश्यक आहे. खरे तर बाह्य सृष्टीतून ज्ञांनेंद्रियांच्या माध्यमातून मिळविलेल्या प्रत्येक माहितीचे पृथ:करण व विश्लेषण करण्याचे कार्य, संसाधन आपला मेंदू करत असतो, जसे संगणकाचे मध्यवर्ती कार्यकेंद्र [Central Processing Unit] करत असते.

याचाच अर्थ असा की, जो पर्यन्त आपण ‘आत्म दिपो भव’ ह्या उक्तीप्रमाणे स्वत: स्वत:चा मार्गदर्शक बनत नाही तोपर्यंत, काहीच होऊ शकत नाही. प्रश्न मनात येईल की असे शक्य आहे का? आणि शक्य असेल तर मग कसे शक्य आहे? दोनहीचे उत्तर ‘होय’ असेच आहे. एकलव्य नाही का स्वत: स्वत:चा मार्गदर्शक बनला. प्रत्यक्ष द्रोणाचार्या्नी धनुर्विद्या न शिकवताही जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला. याचा अर्थ हे शक्य आहे. अगदी शक्य आहे. काय हवे असे साध्य करण्याकरिता…..‘कृत्वा नवदृढ सङ्क्ल्पं’. असा संकल्प हा अर्थातच ‘सत्त्यसंकल्प’ असावा लागेल व त्याच बरोबर तो ‘शिवसंकल्प’ ही असावा लागेल.

यज्जाग्रतो दूरमुदैति दैवं तदु सुप्तस्य तथैवैति |
दूरङ्गमं ज्योतिशां ज्योतिरेकं तन्मे मन: शिवसंकंल्पमस्तु ||१||
येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषू धीरा: |
यदपूर्व्मं यक्षमंत: प्रजानां तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु ||२||
यत्प्रज्ञानमुत चेतो धृतिश्च यsज्योतिरन्तरमृतं प्रजासु |
यस्मान्न ऋते किंचन कर्म क्रियते तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु ||३||
(शुक्लयजुर्वेद वाजसणेय संहिता- शिवसंकल्पसूक्त-३४)

मनुष्याच्या जागृत अवस्थेत, व्यवहारकालात बाह्यविषयांशी सलग्न असताना, जे अतिशय दूर जाते, एकाच वेळी अनेक ठिकाणी जाऊ शकते आणि पुन: सुप्तावस्थेत जागृत मनाचे व्यवहार थांबले असताना परत येते, जागृतावस्थेत अजागृत मन निद्रितावस्थेत जागृत होते. असे हे दूरसंचारीआणि सर्व इंद्रियना प्रकाश देणारे, विषय ग्रहणाचे सामर्थ्य देणारे, श्रेष्ठ मन नेहमी शिवसंकल्प सर्वांचे निरपेक्ष कल्याण चिंतिणारे होवो. आंतरिक ईच्छाअंत:करणात निर्माण झाली की मग आपोआप तदनुषंगाने माणसाचे मन सर्व शरीराला कार्यान्वित करते, करवून घेते; आणि मला वाटते हे कळले तर ‘तत्वज्ञान’ उमगले असे म्हणावयास हरकत नाही.


संदर्भ ग्रंथ:
०१) तत्वज्ञान म्हणजे काय? लेखक: मार्टिन हायडेग्गर, अनुवाद: श्री. एन. व्ही. जोशी, कांटीनेन्टल प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती-१९७२
०२) The Nyaya Sutras of Gautam, Translated & English Commentary by M. M. Satish Candra Vidyabhushan, Edited with a Sanskrit Preface by Dr. Sukharam, Parimal Publications, First Edition-2018, New Delhi, ISBN-978-81-7110-629-5
०३) भारतीय नऊ दर्शनांचे अभिनव प्रसन्न दर्शन – वैशेषिक दर्शन – डॉ. उदय कुमठेकर, प्रसाद प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती – २००७, ISBN- 978-93-85759-18-5
०४) भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन – योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, आदित्य प्रकाशन, पुणे, ISBN-81-86879-19-6
०४) भारतीय तत्वज्ञान – प्रा. श्रीनिवास दिक्षित, कांटीनेन्टल प्रकाशन, पुणे, पाचवी आवृत्ती-1990

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top