आई माझी आई होती, प्रेमस्वरूप ती माई होती,
गेली आता दिव्य पदाशी, सहस्त्र योजने दूर आता ती….
शिक्षण तिचे झाले चार, पण होते तिचे ज्ञान अपार,
इंग्रजी कधी शिकली नाही, पण शब्दांचे भव्य अगार ……
स्मरण तिचे फारच भारी, इत्थंभूत स्मरणात राही,
माहिती अथवा जेवण सारे, स्वयंपाक तिचा खूप भारी……
प्रेम करी गंगे इतके, घरचे दारचे पुरे पुरते,
हळवी होती थोडी फार, माया करी खूप अपार……..
एकदा पडली खूप आजारी, श्वास मंद प्राणावरी,
शर्थीचे ते प्रयत्न केले, ओढून आणले मग माघारी……..
माहिती नाही शेवटी तिच्या, मनात काय राहून गेले,
भेट शेवटी झाली नाही, बोलायचे काही राहून गेले…….
दूरच्या गेली प्रवासाला, धैर्य तिचे फारच भारी,
जीवन जगली आनंदाने, जगण्याची तिची रितच भारी………
माइचे ते प्रेम अपार, अशी आमची माई होती,
खूप होती समाधानी, अपरंपार माया होती……….
डोळ्यामध्ये पाणी येते, माई तुझी आठवण येते,
डोके तुझ्या अंकावरती, ठेवण्या आता तू नाही येथे………..
तरी हासरा तूझा चेहरा, आशीष सस्मित ध्वनि इथे,
अनंत माया तुझी व्यापली, सप्तभुवनी तरि इथे………..
आकाशाच्या दिव्य पटावर, सहस्त्र तारा दिव्य जशा,
तिथे चमकती एक चाँदनी, माईच्या त्या सख्या जशा…….
लक्ष नभी त्या दिव्य चांदण्या, अनंत त्यांच्या दिव्य कथा,
प्रेमाचे ते परमस्वरूप ते, माई दिसते भव्य रथा…….
पंचभूतांचे दिव्य स्वरूप ते, कल्पवृक्ष तो ममतेचा,
मातृत्वाचे अपार सोहळे, किरण मायेच्या प्रेमाचा………
आसमंत तो प्रकाश सारा, तेज पसरले चहुकडे,
माईच्या त्या दिव्य स्वरांचे, गीत विहरते चहूकडे……….
मनी प्रार्थना सदाच तिची, आशिर्वचने मागाया,
विमलेन्दू हा तिला प्रार्थतो, प्रिती भावे अर्पाया……..
|| मुकुंद भालेराव ||
| औरंगाबाद | १६-०१-२०२२ / १९-०१-२०२२ |
Back To Top