हातात हात घेता, स्मरले मलाच सारे,
त्या सप्त पावलात, मम स्वप्न रम्य झाले………
नव्हते मनात पूर्वी, काहीच पाहिलेले,
अवचित गवसले जे, स्वप्नी न पाहिलेले……….
सारेच रंग ऐसे, मेघात चिंब झाले,
मनी धुंद मुक्त ऐसे, सारेच गीत झाले………….
जणू तारका नभीच्या, उतरून येथ आल्या,
कैफात मुक्त सार्याऐ, नयनात तृप्त झाल्या……….
गंधर्व अप्सरांच्या, कमनीय देह रचना,
आमच्या मनास सुखवी, स्वर्गिय शब्द रचना……..
नुरले न शब्द काही, सारेच दिव्य झाले,
अवघ्या क्षणात सारे, सारेच आप्त झाले……………..
मनी भासतो अपूर्व, ऐसा विवाह सारा,
किती दिप ही उजळले, अवघा प्रकाश झाला…………..
सारेच स्वप्नमय हे, हे नृत्य तारकांचे,
बरसून मेघ सारे, अवघेच स्वप्न झाले………….
आता मनात अवघा, आनंद साठवावा,
प्रिती विनम्रतेने, आनंद वाढवावा…….
कुसुमात रंगलेले, सारेच शब्द गहिरे,
सार्यात स्वरास्वरात, स्त्रवती ते शब्द ‘हरि रे’……..
ह्या वैष्णवीस अपुरे भासेच विश्व सारे,
शंका आता कशाला, शशांक विश्व सारे…….
त्या सप्त पावलात, इत्यर्थ मिळूनी आला,
त्या दिव्य अंतरीक्षी, शशांक विश्व झाला………
सारेच रम्य स्वप्नी, गंधर्व गीत गाती,
रमणीय त्या श्रुतींच्या, दैदीप्य दिव्य लहरी…….
उन्मुक्त तारकांचे, जल्लोष भावनांचे,
गाती विवाहसूक्त, वेदोक्त त्या ऋचांचे………
हा सोहळा मनीचा, स्वर्गीय रूप याचे,
देवास का कधीही , हे लाभले असे हे……….
तिच्या मनात आता, त्याचाच रंग आहे,
त्याच्याही अंतरला , तिचाच गंध आहे…….
सार्यायच स्नेहलहरी, शिवनाद अंतरात,
लाभो सदैव त्यांना, द्यूलोक आसमंत…….
मुकुंद भालेराव
औरंगाबाद | २२ डिसेंबर २०२१ / १५ फेब्रुवारी २०२२
Back To Top