हिंदू आहे स्पष्ट सांगतो, नाही कुणाची भिती मला,
नाही कुणाच्या बापाचीही, काही नाही भिती मला………
चार वेद अन् उपनिषदांचे, अष्टादश ती पुराणमाला,
प्रिय असे मज वेदांताचे , जीवन जगणे मुक्त मला………..
कशास भिती असे कुणाची, धर्म असा हा माझा हो,
आयुष्याचे अर्थ समजण्या, प्राणप्रिय हा माझा हो…………….
कुणास का हो भिती माझी, आणि माझ्या धर्माची ,
सदैव बोलेन माय मराठी, भाषा माझ्या आईची…………….
युगायुगातुनी दृढ जाहला, धर्म असा हा माझा हो,
रक्षण त्याचे करण्यासाठी, निश्चय माझा झाला हो……………
कुणास केंव्हा कधी न दंडीले, धर्म रक्षिण्या साठी हो,
माय मराठी भाषा माझी, अमृत वाणी माझी हो………….
वेदपुराणी सदैव स्त्रवल्या, दिव्य रुचा त्या कल्याणा,
सदाच कथल्या शुद्ध भावना, विश्वशांतिच्या कल्याणा………
सत्य सदाचे एकच आहे, कधी न दूजा भाव मनी,
समरसतेतूनी मंगल सारे, हाच सदाचा भाव मनी…………
दुष्ट विचारी, क्रुद्ध भाव ते, आता दिसती सर्व सदा,
रक्षण करण्या धर्मकर्म अन्, भाषा जननी असे सदा……….
माय मराठी थोर असे ही, ज्ञानेशाची दिव्य प्रभा,
मुकुंदराजाची ती वाणी, चक्रधराची तशी आभा…………
भा रा तांबे, कुसुमाग्रजही, केशवसूता नाव पहा,
विविध वेगळे भाव समर्पित, भाषा नटली असे पहा………
अभंगवाणी तुकयाची अन्, चोखोबांचे शब्द महा,
नामामध्ये दंग होतसे, नामाचा तो संत महा……….
एकनाथही सदा विशुद्ध ते, सहनशील ते श्रेष्ठ महा,
प्रभू रामाची प्रचंड भक्ति, समर्थ करण्या राष्ट्र पहा……..,
वचन पाळण्या रामदासगुरु, शिवरायाची शपथ महा,
जिजाऊच्या संस्कारातूनी, राष्ट्र निर्मिले हेच महा…………
भगवद् महिमा जनसामान्या, नाथचे ते शब्द असे,
श्लोक मनाचे, गाथा, भारुड श्रेष्ठ किती हे भाष्य असे………
उगा कशाला वैगुण्याचे , भाव मनी ते भाषेचे,
मुक्त मनाने बोलू या तर, शब्द मराठी भाषेचे……..
शब्द मुखी अन संवादाचे, शुद्ध मराठी शब्द सदा,
आपुली भाषा माय मराठी, सुंदर आहे नित्य सदा……
मुकुंद भालेराव
औरंगाबाद / २७ फेब्रुवारी २०२२
मराठी भाषादिन
Back To Top