Marathi

नुरले न अक्षरांचे अस्तित्व-शब्द-द्वैत

शब्दात सूर होते, हृदयात भाव होते,
मनमोहूनी पसरले, स्वरशब्द दिव्य होते……

त्या कंपनांत सार्याह, स्वर्गीय रंग फुलले,
उन्मेष भावनांचे, स्वरपुष्प ते उमलले……….

सार्या स्वरांत भरले, स्वर्गीय भाव ऐसे,
सारी रुपे ईशांची, शब्दांत भाव ऐसे…………

आवर्तनी आरोही, ते नादब्रम्ह फुलले,
मिटताच पापण्यांना, ईशरूप आत दिसले……

आपल्या स्वरास त्याने, हळूवार स्पर्श केला,
एका क्षणात सार्याा, त्या बंदिशी उमलल्या……

एका क्षणांत ऐशी, ती मुक्त ताण घेता,
मन दंग रंग झाले, मोहून त्या स्वरांना……..

आवर्त अंतरांतील, उमडुन मेघ आले,
बघता क्षणांत सारे, मन ईशरूप झाले……….

त्रिसप्तकामधुनी, प्रेमांत पंचमाच्या,
स्वर थांबला जरासा, लडीवाळ भावनांचा……..

हलकेच ताण घेता, मिटले क्षणांत द्वैत,
नुरले न अक्षरांचे अस्तित्व-शब्द-द्वैत……….

मुकुंद भालेराव
औरंगाबाद / २०-०३-२०२२/ रात्रौ २३:००
२१-०३-२०२२ / सकाळी १०:४३

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top