अभिराम चालला गोव्याला, सागर लाटा खेळायला,
हिरव्या वेली हिरवी झाडे, गम्मत जम्मत करायला……………
अरसामध्ये उंच किती ते, नारळ आंबे वृक्ष किती,
परसामधल्या फणसांची ती, रेलचेल ही छान किती………..
लांब किनारी वाळूमध्ये, बांधी किल्ले रोज पहा,
येती लाटा तोडी किल्ले, फिरुनी बांधे नित्य नवा………..
प्रभात काळी वाडीमध्ये, प्रभाकराची दिव्य प्रभा,
काजुच्या त्या बागेमध्ये, निसर्ग भासे नित्य नवा……….
चंद्रप्रकाशी अभिरामाला, लाटांवरती चंद्र दिसे,
पक्षांच्या त्या मुक्त थव्याला, हात हलवुनी मूक्त हसे…………..
स्वप्नकथेतील जलराणीला, शोधीत जातो अभिराम,
लाटांवरती नर्तन करती, जलकन्या नि अभिराम…..
नभोमंडपी आनंदाने, सर्व तारका लुकलुकती,
जलकन्येची सुरम्य स्तवने, नर्तन करती दिव्य गती…………
पाचुंची ती रम्य प्रभा ती, मावळतीचे रंग नवे,
संध्याकाळी अभिरामाला, आकाशीचे सर्व हवे…………….
इवल्या इवल्या पाऊलवाटा, बागा सुंदर कुसुमांच्या,
रम्य प्रभाती शुद्ध स्वरांच्या, सरगम श्रवती वेदांच्या…………
तिथे सानुला आश्रम वाटे, वेदरुचांचे शब्द जसे,
अरसामध्ये तिथे आश्रमी, मांगल्याचे रूप दिसे………
देवमंदिरी स्वर्णऊर्ध्वही, तळपत कलशी रम्य वसे
शिरोधार्यही रवीकिरणांने अभिरामाला दिव्य दिसे………
इतके सारे सहज गवसले, स्वप्न कशाला हवे आता,
नकोच आता सदा सभोवती, कृत्रिमतेचे भास आता………..
आता कशाला शाळेला ती, सुट्टी फिरण्या हवी आता,
सप्ताहाच्या दर रविवारी, अभिरामाची मजा आता………..
प्रभात काळी सिंधुसागरी, सूर्य तळपतो नित्यनवा,
धमाल आता अभिरामाची, गोव्यामध्ये नित्य सदा……..
मुकुंद भालेराव
औरंगाबाद / २० जानेवारी २०२२ / दुपारी ४ वाजता
२ एप्रिल २०२२ / शनिवार / चैत्र पाडवा
Back To Top