Marathi

|| तमसो मा ज्योतिर्गमय ||

अंधारातून उजेडाकडे, निराशेतून आशेकडे,
तिमिरातून प्रकाशाकडे, स्वत:पासून कुटुंबाकडे,
एकाकडून सर्वांकडे, कोलाहलातून शांततेकडे,
व्यक्तिकडून समष्टिकडे, आत्म्याकडून परमात्म्याकडे…….

ध्वनिपासून संगीताकडे, संगीतापासून शब्दाकडे,
शब्दाकडून अर्थाकडे, अर्थाकडून भावनेकडे,
भावनेकडून अणुकडे, अणुपासून विश्वाकडे,
विश्वापासून मानवाकडे, शरीराकडून विदेहाकडे…….

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यन्त, द्वारकेपासून त्रिपुरेश्वरीपर्यंत,
बालकापासून वृद्धाँपर्यंत, माझ्याकडून तुझ्याकडे,
कुटुंबाकडून समाजाकडे, घराकडून देशाकडे,
दु:खाकडून आनंदाकडे, वेदनेकडून निरामयाकडे……..

एकाकडून अनेकाकडे, आत्मज्योतीकडून विश्वज्योतीकडे,
उच्चारांकडून निस्तब्धतेकडे, शब्दांपासून निशब्दतेकडे,
ध्वनिपासून तरंगाकडे, तरंगातून श्रीरंगाकडे,
आपत्तीतून आशिर्वादाकडे, आशिर्वादातून उन्मेशाकडे……

उन्मेशातून रचनेकडे, रचनेकडून ब्रम्हांडाकडे,
भास्कराच्या स्वदिनी, निशेच्या रात्रमनी,
अभूतपूर्व शांतक्षणी, नवपल प्रकाशवर्ष,
जागऊ असे आम्ही, मनामनास हर्षस्पर्श………..

आसमंत हो प्रकाश, वेदनांचा हो विनाश,
व्याधीं हो समूळ नष्ट, नाशवंत हो अरिष्ट,
सर्व हो शतायुषी, मंगलमय सर्व विश्व,
दु:ख जाओ विलयास, आरोग्य लाभो भारतास…….

मुकुंद भालेराव
औरंगाबाद / महाराष्ट्र / भारत
एप्रिल ३, २०२०

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top