नयनात नीर माझ्या, दाटून राहिलेले,
हृदयात क्षीर ऐसे, स्नेहांत उमललेले…….
लडिवाळ शब्द त्याचे, सर्वत्र साठलेले,
विश्वात फिरून ते ही, आसमंत दाटलेले…….
इवलेच बोल त्याचे, मोहीत ते मनाला,
आत्मीयता सुखाची, ती देतसे जीवाला……
जे शैशवात त्याचे, उन्मुक्त गीत होते,
आता तसेच त्याचे, चित्तात गीत आहे……..
मोहून घे मनाला, स्वप्नील शब्द त्याचे,
साधेच ते तरीही, किती मुग्ध वाटताहे………
गेला इथून दूर, त्या सिंधुसागराशी,
वृक्षात मंडीलेले, गिरीकंदरा घराशी……..
हिरव्या प्रसन्न वेली, सर्वत्र नांदती त्या,
मोहीत करत असतो, अभिराम तो मनाला……
आसमंत तो प्रकाशी, शशी रम्य सागरांत,
आकाश सागरांत, परि अभिराम तो मनात……..
किती लक्ष तारकांचे, पक्षी नभात दिसती,
त्या अर्णवांत मजला, सारेच दिव्य दिसती……..
माझ्या मनांत त्याचे, जे बालरूप आहे,
भासे सदाच मजला, आनंदरुप त्याचे……..
ह्या अंतरात माझ्या, दीप्ति भरुन आहे,
अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..
मुकुंद भालेराव
दिनांक ०३-०४-२०२२ / ०८-०४-२०२२
One thought on “अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..”
Comments are closed.
फारच सुरेख