Marathi

दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति?

दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति?

(दक्षिणा म्हणजे काय? दक्षिणा का द्यायची?)

आज मी एका वेगळ्या विषयावर लिहिण्याचे ठरविले आहे. म्हटले तर तो विषय दररोजचा आहे आणि म्हटले तर नाही. विषयाचे स्वरूप सामाजिक तर आहेच, पण एक दृष्टीने धार्मिक पण आहे. आपण आपल्या घरी कित्येक धार्मिक कार्यक्रम करत असतो. मग तो साधा सत्यनारायण असो की नवीन घराची वास्तुशांती, वा विवाह सोहळा. ह्या पैकी प्रत्येक विधीकरिता पूरोहित तर लागतोच, पौरोहित्य करायला. संपूर्ण विधी संपन्न झाल्यावर एक महत्वाची गोष्ट शिल्लक राहते, व ती म्हणजे पुरोहिताला दक्षिणा प्रदान करणे. 

आपण कधी याचा सखोल विचार केला आहे का की ही दक्षिणा का द्यायची. कुणी म्हणेल त्या पूरोहिताने आपल्याला मार्गदर्शन व सहाय्य केले म्हणून. हे तुमचे उत्तर असेल तर ते शंभर टक्के बरोबर नाही. मला कल्पना आहे की, माझे म्हणणे वाचल्यानंतर तुमच्यापैकी जवळपास सर्वांना माझे उत्तर चूक वाटेल, कारण आपण सर्व जे चालत आले आहे ते अत्यंत विश्वासाने पुढे, जसेच्या तसे पालन करतो, चालवत राहतो.  ते चांगलेही आहे व बरोबरसुद्धा आहे, परंतु जेव्हा तुम्ही वडील व्हाल, पुढे जाऊन आजोबा व्हाल; तेव्हा तुमच्या मुलाने / मुलीने किंवा नातवाने जर विचारले की, “दक्षिणा म्हणजे पुरोहितचा एक प्रकारे मेहनताना किवा मोबदला आहे का ?”; तर चुकून आपण म्हणू हो. थांबा ! संस्कृती ही कुटुंबाद्वारे व समाजाद्वारेच पुढच्या पिढ्यांना हस्तांतरित होत असते हे लक्षात ठेवा. तेंव्हा, आधी योग्य व अचूक उत्तर समजावून घ्या, ‘दक्षिणा’ म्हणजे काय व तिला दक्षिणा का म्हणतात.

संध्यावन्दन तर सर्वांना माहीतच असेल. संध्यावंदनाचा व फक्त ब्राम्हणाचाच संबंध आहे असे नाही, कारण संध्यावंदन म्हणजे संध्याकाली (संध्याकाळी किंवा फक्त सायंकाळी नव्हे.) करण्याची परमेश्वराची प्रार्थना. मग अशी प्रार्थना कुणीही करू शकतो, त्याला ब्राम्हणच असण्याची काही एक गरज नाही. असो तर त्या संध्यावंदनात सर्वात शेवटी एक मंत्र आहे, “यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषू | न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम् ||” याचा अर्थ असा की, ‘ज्याचे स्मरण केले असता व नाम उच्चारले असता तप आणि यज्ञकर्मादिकांतील न्यूनता दूर होऊन संपूर्णता येते, त्या अच्युतास मी तात्काळ वंदन करतो.’ हे का म्हणावयाचे तर कितीही प्रयत्न केले व काळजी घेतली तरीही अनवधानाने चुका होऊ शकतात आणि अशा चुकांचे दोष लागू नये म्हणून हा मंत्र संध्येच्या शेवटी म्हटला जातो. तसाच आणखी एक मंत्र आहे, जो गायत्रीची क्षमायाचना करण्याकरिता आहे, “यदक्षरंपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत | तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्वरि ||” याचा अर्थ असा आहे की, “हे देवी! मी जप करीत असतांना मंत्रांचे जी अक्षरे, पदे व मात्रा चुकल्या असतील त्या सर्वांबद्दल, हे देवी गायत्री, मला क्षमा कर व हे परमेश्वरी तु मजवर प्रसन्न हो ||”  ह्या उल्लेखिलेल्या दोन मंत्रावरून हे तुमच्या लक्षात आले असेल की, आपण चुकू शकतो (हे विनम्रतेने) मान्य करतो व त्याबद्द्ल उशीर होण्यापूर्वीच जिथल्या तिथे क्षमायाचना करून मोकळे होतो आणि ते चांगलेही आहे. आपला आजचा विषय समजण्यास व समजल्यावर समजलेले मान्य करण्यास सोपे जावे म्हणून वरील पार्श्वभूमी विशद केली आहे. आता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळू.

दक्षिणा ह्या शब्दाचे निर्वचन म्हणजे अर्थ मिळतो तो ‘निरुक्तात’. आता प्रश्न उभा राहील की ‘निरुक्त’ म्हणजे काय? तर निरुक्त म्हणजे ‘निघंटु’चे केलेले सुलभीकरण. मग निघंटु म्हणजे काय? तर निघंटू म्हणजे वेदातील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारा शब्दकोश.

“छन्द: पादौ तु वेदस्य, हस्तौ कल्पौsथ  पठ्यते |

ज्योतिषामयनं चक्षुर्निरुक्तं श्रोत्रमुच्यते |

शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम् |

तस्मात् साङ्गमधीत्यैव ब्रम्हलोके महीयते || पाणिणीय शिक्षा: ४१-४२ ||

संस्कृत दोन प्रकारचे आहे, वैदिक संस्कृत व लौकिक संस्कृत. आपले दररोजच्या व्यवहारातील ते लौकिक व वेदमंत्राविषयी ते वैदिक. महर्षि यास्काचार्‍यांनी (इसवी सन पूर्व ५०० च्या आधी निरुक्त हा ग्रंथ लिहिला. त्या निरुक्त ग्रंथात पहील्या अध्यायात महर्षि यास्क) म्हणतात,

“नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयदिन्द्र दक्षिणा मघोनी |

शिक्षा स्तोतृभ्यो माति धग्मगो नो बृहद्वदेम विदथे सुवीरा: ||१.६||

याचा अर्थ, “हे इंद्रा ! ती धनयुक्त दक्षिणा तुझ्या स्तोत्यांना (जारित्रे) इच्छेप्रमाणे दे प्रशंसकांना (स्तोतृभ्य: ) प्रदान कर. आम्हाला वगळून इतरांना देऊ नकोस. ऐश्वर्य आमचे असो. चांगल्या वीरपुत्रांसह यज्ञामध्ये आम्ही उच्चस्वरात तुझी स्तुती करू.”  दक्षिणा हा शब्द दक्ष् (समृद्ध करणे) या धातुपासून बनला आहे. यज्ञात जे काही न्यून (कमी) आहे ते दक्षिणा पूर्ण करीत असते. हा शब्द, दक्षिण दिशेकडून (उजवीकडून) ती आणली जात असल्याने तिला दक्षिणा म्हणतात. दक्षिण हा शब्द दिशेला अनुलक्षून वापरलेला आहे. यज्ञामध्ये ऋत्विजांना दक्षिणा स्वरुपात ज्या गायी द्यायच्या आहेत, त्या गाई यज्ञवेदीच्या उजव्या बाजूने आणल्या जातात म्हणून गायींना दक्षिणा म्हटले जाते. दक्षिण दिशेला दक्षिणा हे नाव पडले ते उजव्या हाताला उद्देशून. दक्षिण: हस्त: | उजव्या हाताला दक्षिण हे नाव आहे. त्याला ते नाव का पडेल तर दक्ष् या उत्साहवाचक धातुपासून हा शब्द बनला असावा.     

सारांश, कोणतेही कर्म (धार्मिक) करते वेळी आपण किंवा आपल्याकडून वा आपल्याकरवी पूरोहित करून घेत असताना अनवधानाने नकळत ज्या चुका चुकून घडत असतात, त्यांच्याबद्दल एक प्रकारे परिमार्जन म्हणून पुरोहिताला देतो ती ‘दक्षिणा’; मग ती दक्षिणा पैशाच्या स्वरुपात असेल किंवा वस्तूच्या स्वरूपात  असेल किंवा अन्नधान्याच्या स्वरुपात असेल किंवा गाई वा तत्सम इतर पशूधन असेल. हे झाले यजमानाकडून होणार्‍या चुकांबाबत. खरे तर चुका तर पुरोहितांकडून मंत्रोच्चार करताना सुद्धा होऊ  शकतात व तशा चुका झाल्या तर त्या पूरोहिताने ‘सारस्वती यज्ञ’ करणे अपेक्षित आहे, नव्हे तसा शास्त्राचा  आदेश आहे. व्याकरणमहाभाष्याचे पस्पशान्हिक अध्याय १ ला  (महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर), “सारस्वतीम् | याज्ञिका: पठन्ति |

आहिताग्निरपशब्दं प्रयुज्य प्रायश्चित्तीयां |

सारस्वतीमिष्टीम् निर्वपेदिति |

प्रायश्चित्तीया मा भुमेत्यध्येयं व्याकरणम् | सारस्वतीम् |

“ज्याने गृह्याग्नि पाळला आहे (म्हणजे ज्याने अग्निहोत्रव्रत स्विकारलेले / धारण केले आहे.) त्याच्याकडून जर अपशब्दांचा प्रयोग झाला, तर त्याने प्रायश्चित्तादाखल सारस्वती इष्टी करावी. आपणाला प्रायश्चित्ताची जरूर न लागावी म्हणून त्याने व्याकरणशास्त्राचे व्यवस्थित अध्ययन करावे. 

थोडक्यात काय तर, यजमानाने (म्हणजे आपल्या सारख्या कर्म करणाराने) किंवा पूरोहिताने यज्ञादि कर्मात अहेतुक होणार्‍या चुकांचे दोषपरिमार्जन करण्याकरिता जे त्यागायचे असते किंवा द्यायचे असते त्याला दक्षिणा असे म्हणतात. याचा दूसरा अर्थ असा की, दक्षिणा स्विकार करून तो पूरोहित आपल्या चुकांचे दोष स्वत:च्या अंगावर घेत असतो. अशा पुरोहिताला, अशा दोषांपासून स्वत:चे संरक्षण करावयाचे असेल तर त्याला एकच उपाय आहे तो म्हणजे, आजच्या संदर्भात जसे डॉक्टर जंतूंची लागण स्वत:ला होऊ नये म्हणून काळजी घेतो, उदा. करोंना काळात सर्व डॉक्टर संरक्षणात्मक नखशिखांत पोशाख घालत होते, हातात वैद्यकीय हस्तकोश घालत होते, तसेच रोग्यापासून ठराविक अंतर ठेवत होते; त्याप्रमाणे पुरोहितानी मंत्र व विधिद्वारा स्वत:चे संरक्षण करायला हवे. कारण पौरोहित्य केल्यानंतर ‘दक्षिणा’ तर घ्यावीच लागेल ना, ती थोडीच टाळता येणार आहे आणि टाळू पण नव्हे. तर दक्षिणा देऊन आपण सर्वजण आपले दोष त्या पुरोहितावर टाकत असतो व तो पूरोहित विनातक्रार ते दोष स्विकारत असतो. एवढ्याकरिता तरी, सर्व पुरोहितांना वंदन करायला हवे. भो आचार्यत्वां अभिवादयामि |

|| मुकुंद: भालेराव: || 

संपर्कार्थ mukundayan@yahoo.co.in

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top