Marathi

डोळ्यामध्ये स्मित तुझ्या अन

डोळ्यामध्ये स्मित तुझ्या, अन ओठांवरती स्मितरेषा |
शब्दांमध्ये मधुर असावे, आनंदाचे अर्थ सदा ||१||

भाव मनीचे नेत्र सांगती, मुक्त असे ते गीत सदा |
साधे साधे शब्द फुलांचे, प्रेम दरवळे नित्य सदा ||२||

इवल्या इवल्या नयनामधुनी, पाचुंची बरसात सदा |
नादामधुनी असा बरसतसे, स्नेहाचा मधुगंध सदा ||३||

अभिरामाची नित्यनवी ती, रंगाची बरसात सदा |
सदा सुखविते माधुर्याचे, काव्य तयाचे शब्द पहा ||४||

सानुले ते शब्द गोजिरे, मोहित करती हृदयाला |
अर्थ कशाला शोधीत जावे, उगा चुकावे आनंदाला ||५||

कलाकलाने वाढत जावा, जसा नभीचा शांतशशी |
अनुपम वाटत अहर्निशी हा, मोदमनीचा रम्यहरी ||६||

असेच वाटे सदा हवासा, पौत्र मुकुंदा गंध नवा |
अक्षय त्याच्या आनंदाचा, गंध पल्लवी रंगनभा ||७||

अभिरामाच्या चित्रांमधूनी, ध्वनित होते काव्य सदा |
सदा फुलविते कविता त्यांसी, असा भासतो स्मितकृष्ण जसा ||८||

तुषार विहरती स्नेहाचे ते, दिव्य प्रीतीची निधी असे |
अवकाशाच्या अंतरातले, अभिरामाचे रुप असे ||९||

गुंफून सार्याि स्नेहफुलांना, गर्जे जयजयकार असा |
जस्मिनच्या त्या मायेने तो, अनिरुद्ध भासतो मोदअसा ||१०||

गोमंतक ते रम्य सागरी, गम्य निवासा खचित असे |
किती योजने दूर मात्र ते, जावे कैसे प्रश्न असे ||१०||

आज तयाचा जन्मदिवस तो, आनंदाने गाण्याचा |
रंगीत कपडे संगीत सारे, पयोहिम ते खाण्याचा ||१२||

बुद्धी लाभो तेज रवीचे, आरोग्याचे पर्व सदा |
प्रभा तयाच्या कर्तृत्वाची, सदा फुलाव्या दिव्यआशा ||१३||

| मुकुंद भालेराव | औरंगाबाद | २३-०६-२०२२ | सकाळी: ००:५० |

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top