Marathi

अपि स्वर्णमयी लंका

श्रेष्ठ पुरोहीत दिव्य असा तो,
दशग्रंथी जो ब्राम्हण झाला,
शूरवीर तो प्रचंड ज्ञानी,
मोहाने तो विनष्ट झाला………..

देवांनाही बंदी घातले,
त्रिलोकात तो परम प्रतापी,
बुद्धी-शक्ति प्रचंड तयाची,
शिवाचा तो महाव्रती……..

अनंत युगे अशी लोटली,
परकीयांचे राज्य निमाले,
स्वतंत्र झाली श्रीलंका ती,
आशेचे ते किरण पसरले………

सिरीमाओ ती महान नेता,
देशा नेले परम वैभवी
द्विसहस्त्रएकद्विंशती,
राष्ट्र बुडाले कर्जसागरी…….

प्रमुख मंत्री अन राष्ट्रप्रमुख ते,
स्वार्थापोटी राष्ट्र विसरले,
मनमानी अन अर्थशून्यता,
प्रजातंत्र अन प्रजा विसरले………..

खते न हाती शेतकर्यां च्या,
धान्याचा लवलेश नसे,
वाहनास ती ऊर्जा नाही,
जगण्याचा आक्रोश असे………….
क्रुद्ध जाहली प्रजा सर्वही,
कषाय भिक्षु सात्विक ते,
ध्वस्त कोषागार जाहला,
जगण्याला तो अर्थ नसे……..

तरुण बालके स्त्रीया सार्यास,
पथापथाने प्रासादी,
उच्चरवाने उद्घोषाच्या,
सर्व नासले प्रासादी………….

विहार करण्या सर्व पहुचले,
मित्रमैत्रिणी मुक्त तिथे,
शयनप्रकोष्टे मुक्त नर्तनी,
तरणकुंडी ते तरती ते…………

पाकशाले कुणी प्रवेशती,
क्षुधित सारे भक्षण करती,
भ्रमणध्वनिचित्रकातुनी,
स्वयेप्रतिमा कुणी काढती……….

देशामध्ये अराजकाचे,
ऐसे हे थैमान असे,
विलाप करतो अंत:करणी,
रत्नाकर तो व्यथित असे……

शासन नाही शासनकर्ता,
विधी नसे अन राज्य कसे,
कुणी कुणाचा नसे नियंत्रिक,
उश्रुंखल सारे व्यर्थ असे…….

जगणे आता दुरापास्तही,
भक्षण करण्या मत्स्य नसे,
सागरलहरी स्पर्श कराया,
जलनौकेला समिघ नसे……..

स्वयंपाकाला द्रववायु अन,
अन शेतामध्ये धान्य नसे,
लहानथोरा जीवन जगण्या,
कसलाही आधार नसे……….

अनंत सारी राष्टसंपदा,
ध्वंसित करती क्रोधाने,
आपुले आपण भविष्य नासती,
मदांध एषा त्वेषाने……..

राष्ट्रशक्ति ती लोप पावता,
सभापतीचा दंड नसे,
न्यायाधीश ते लुप्त पावता,
राष्ट्रामध्ये न्याय नसे……..

एक कुटुंबे सत्ता सारी,
राष्टसंपदे नासविले,
उत्तरेतल्या व्याधपतङ्गे,
द्वीपसमुहा भक्षियले…….

अब्जअब्ज ते ऋण माथ्यावर,
अर्थभार तो असह्य झाला,
विनाऔषधे किती रोगांना,
वैद्य त्रासले क्षुभ्द भावना…….

मातांचे ते अश्रुपातही,
पित्याचे मग धैर्य सुटे,
कभिन्न छाया तीव्र वेदना,
राष्ट्राला भवितव्य नसे……….

श्रीरामाच्या पदस्पर्शाने,
पुनीत लंका स्वर्णमयी,
भारतभूचे वंदन करता,
भाग्य अवतरे तिथे मही……….

मुकुंद भालेराव
औरंगाबाद / ११-०७-२०२२ / रात्री २३:१२
१२-०७-२०२२ / रात्री २३:१८

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top