Marathi

एक असावे नयनरम्य घर…..

एक असावे नयनरम्य घर,
नकोत पंचवीस खोल्या त्या,
परी असावे सुबक आपले,
वास्तूसुसंगत रचना त्या…….

छोटे असतील प्रकोष्ट सारे,
गवाक्ष सुंदर विशाल ते,
मुक्त असावे वायुवीजन,
मने प्रफुल्लित करतील ते………

प्रांगणात ती डौलत राही,
तुलसी माता नित्य तिथे,
परसामध्ये सुंदर चाले,
कुसुमांचे ते नृत्य तिथे………..

गृहा निनादे मंगल वादन,
हरिनामाचा घोष सदा,
प्रसन्नतेचा सदा प्रफुल्लित,
हृदयातील उदघोष असा……….

मुकुंद भालेराव
दिनांक: ११-०७-२०२२ / सकाळी- 00:३३

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top