Marathi

निवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र
[Symbol – Emblem – Picture]

सध्या भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठासमोर निवडणूक चिन्ह किंवा पक्षचिन्ह ह्या विषयावर दोन राजकीय पक्षांमधील वादाचा मुद्दा आज सकाळपासून दिवसभर चर्चिला जात आहेत. त्यातील कायद्याच्या बाबींची चर्चा मी इथे करीत नाही तर, त्यानुषंगाने त्यात गुंतलेल्या नैतिक (Ethical), भावनिक (Emotional) व सामजिक (Social) मुद्यांचा ऊहापोह करणे हा उद्देश आहे. या विषयांत राजकीय पक्ष व त्याची स्वत:ची घटना, लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ (Representation of People Act, 1951, व्यावसायिक चिन्हांचा कायदा, १९३२ (Indian Trade Marks Act, 1958), राष्ट्रीय मानचिन्हांचा कायदा, १९७१ (National Emblems Act, 1971) वगैरे अनेक वेगवेगळे कायद्यांचा संदर्भ घेऊन प्रस्तुतचा मुद्दा अधिक स्पष्ट करण्याच प्रयत्न मी करणार आहे.

कुठल्याही व्यवसायाला आपल्या व्यवसायाच्या विशिष्ट चिन्हाची (Trade Mark) अधिकृत नोंदणीचा अर्ज करतांना, त्या प्रस्तावित चिन्हाचे वर्णन किंवा उद्देश लिखित स्वरुपात सादर करावे लागते, म्हणजेच खर्याी अर्थाने त्या व्यावसायिक चिन्हाचा अर्थ सुस्पष्ट होतो, व तशी नोंदणी करू इच्छिणार्याल मनांत त्या चिन्हाचा काय अर्थ, महत्व व उद्देश काय आहे हे समोर येते.

याप्रमाणेच, राष्ट्रीय मानचिन्ह अधिनियमामधील तरतुदीनुसार त्या मानचिन्हांच्या मागील महत्व व उद्देश याला देखील खूप महत्व आहे. उदाहरणार्थ, भारताचे मानचिन्ह, जे सारनाथ येथील अशोकस्तंभावरील आहे, ते भारताचे सर्वश्रेष्ठ अधिकृत मानचिन्ह आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय फूल – कमळ, राष्ट्रीय पक्षी वगैरे. आपण पाहिले असेल की, केंद्र व राज्य सरकारच्या सर्व अधिकृत दस्तऐवजांवर भारताचे मानचिन्ह असते व तसे मानचिन्ह असेल तरच ते कागदपत्र अधिकृत समजण्यात येते. ते भारताचे मानचिन्ह मिरवण्यात प्रत्येकाला कित्ती अभिमान वाटतो, वाटत असतो, आनंद असतो.

अशाच प्रकारची एक पद्धत किंवा व्यवस्था आपल्या भारताच्या सैन्यदलांतही आहे. प्रत्येक रेजिमेंटला आपला स्वत:चा एक ध्वज आहे, ज्यावर एक विशिष्ट चित्र असते. तद्वतच, त्याठिकाणी कोट ऑफ आर्म्स (Coat of Arms) अशीही एक संकल्पना असते, व ह्या दोन्ही गोष्टींचा त्या रेजिमेंटमधील प्रत्येक सैनिकाला अतिशय अभिमान असतो. त्या रेजिमेंटचे जो नेतृत्व करत असतो; मग तो ब्रिगेडियर असेल, लेफ्टनंट जनरल असेल, मेजर जनरल असेल किंवा इतर कुणीही, अगदी कर्नल, मेजर वगैरे असले, सर्वांना त्यांच्या रेजिमेंटच्या ध्वजाचा, कोट ऑफ आर्म्सचा खूप अभिमान असतो व संकटकाळी त्या रेजिमेंटच्या सैनिकांच्या मनांत चैतन्य व उत्साह निर्माण करण्याकारिता त्यांचा उपयोग केला जातो. त्याबरोबरच, वेगवेगळ्या रेजिमेंट, जसे की सातवी मराठा लाइट इनफंन्ट्री, गुरखा रेजिमेंट, सिख रेजिमेंट, महार रेजिमेंट, यांच्या स्फूर्तिदायक अशा स्वत:च्या वेगवेगळ्या घोषणा पण असतात, जशी मराठा लाइट इन्फंट्रीची घोषणा आहे, “हर हर महादेव”, सिख रेजिमेंटची ‘सतश्री अकाल’ वगैरे. याप्रमाणेच, आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांमध्ये आपण पाहतो सुरुवातीला संचलन असते, ज्यात प्रत्येक संघ आपल्या देशाचा ध्वज घेऊन चालत असतात, त्याचे कारण असते त्या ध्व्जाच्या माध्यमातून त्या चमुच्या अंत:करणात राष्ट्रप्रेम व आपल्या देशाकरिता शतप्रतिशत प्रयत्न करून दैदीप्यमान यश प्राप्त करण्याकरिता उत्साह, उर्मि, धैर्य व धारिष्ट निर्माण करणे.

वरील सर्व पार्श्वभूमीवर, आता आपण सध्याच्या निवडणूक चिन्हाच्या (Election Symbol) बहुचर्चित वादाकडे कडे वळूया. जेंव्हा केंव्हा दोन समुहांमध्ये निवडणूक चिन्हावरुन भांडण किंवा वाद निर्माण होते, मग ते दोन समूह राजकीय असो, सामजिक असो किंवा धार्मिक असो; तेंव्हा त्याचे कारण काय असते, का बरे ते दोन्ही समुह एकाच चिन्हाकरिता आग्रही असतात. चिन्ह तर काय कुठलेही घेता येऊ शकते. जसे राजकीय पक्षाच्या बाबतीत फार पूर्वी झाले होते. आत्ताच्या राष्ट्रीय कांग्रेसचे पूर्वी चिन्ह होते बैलजोडी (नेहरूच्या काळापासून), नंतर झाले गाय आणि वासरू (इंदिरा गांधींच्या वेळी) व नंतर आत्ता हाताचा पंजा. आत्ताच्या भारतीय जनता पक्षाचा मूळ पक्ष होता भारतीय जनसंघ, तेंव्हा त्याचे चिन्ह होते दिवा व आता आहे कमळ. केंव्हा केंव्हा निवडणूक आयोग (Election Commission) वादात असलेले निवडणूक चिन्ह गोठवून टाकतात, व मग ते चिन्ह कुणालाच वापरता येत नाही. [आत्ता हे लिहीत असताना मा. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने चिन्हाबाबतचे प्रकरण ऐकून घेण्यास कुठलीही स्थिगिती नाही हे स्पष्ट केले; कारणं निवडणूक आयोग ही भारतीय राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त संस्था आहे.] या लेखात सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, येथे कायदेशीर बाबींची चर्चा मला करावयाची नाही, कारण तो वाद भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणून त्यावर चर्चा करणे कायद्यातील मार्गदर्शक तत्वाना धरून होणार नाही व तसे करूही नये.

मुद्दा असा आहे की, पक्षचिन्ह किंवा निवडणूक चिन्ह आपल्यालाच पाहिजे असा आग्रह राजकीय पक्ष का धरत असतात. माझ्या मते, ते दृश्य स्वरुपातील चिन्ह (Symbol) किंवा चित्र (Picture or Emblem) हे फक्त चित्र नसते, तर त्या चिन्हाच्या पाठीमागे एक इतिहास असतो, त्या चिन्हाला एक इतिहास असतो. कित्येकांच्या त्यागाची पार्श्वभूमी असते, कित्येक लोकांचे समर्पण असते, त्याग असतो. त्यामुळे त्या चिन्हाच्या माध्यमातून राजकीय पक्षाला किंवा एखाद्या विशिष्ट समूहाला त्यांच्या अनुयायांच्या मनांत चैतन्य, उत्साह निर्माण करता येतो, त्यांना सहजपणे प्रेरीत करता येते. आपल्या सर्वांच्या जीवनातील “भारत माता की जय” ह्या वाक्यात किती शक्ति आहे, हे आपण सर्वांनी अनेक वेळा अनुभविले असेलच, जणू काय तो एक महान मंत्र आहे. खरे तर तो आपल्या राष्ट्राचा महामंत्रच आहे. अशा राष्ट्रीय मानचिन्हांचा अवमान करणार्यांच्या विरोधात भारतीय दंडविधाना अंतर्गत फोजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा होरू शकते.

यात अजून एक महत्वाची बाब आहे, ती अशी की, जेंव्हा ते चिन्ह आपलेसे करावयाचे असेल तेंव्हा त्या पाठीमागील इतिहास (History), विचार (Thoughts), तत्वज्ञान (Philosophy) व मूल्यांना (Values) आत्मसात करून त्यांचे अनुकरण करणे अत्यावश्यक ठरते, अपेक्षित असते. जर त्या समूहाची वागणूक त्या चिंन्हाशी निगडीत इतिहास, विचार, तत्वज्ञान व मुल्यांशी फारकत करणारी असले, विपरीत असेल, विरुद्ध असेल, तर मग ते चिन्ह देखिल फक्त एक चित्रच उरेल व ते चिंन्ह निर्जीव होऊन जाईल, त्यातील ऊर्जा, ताकद व हजारोंना प्रेरित करण्याची शक्तिआपोआपच समाप्त होऊन जाईल. आपण सर्वांना विदित आहेच की, जन्मल्याबरोबर पवनपुत्र हनुमान सूर्याला गिळंकृत धावला होता, तेंव्हा त्याला त्याच्या शक्तीचे विस्मरण होईल असा शाप त्याल दिला होता व कुणीतरी दुसर्या ने आठवण करून दिल्यावरच त्याला त्याच्या अमर्याद शक्तीचे स्मरण होऊन तो त्या शक्तीचा उपयोग करू शकेल असा उ:शाप प्राप्त झाला होता. पुढे जाऊन तसेच झाले. असो. अगदी ह्या उदाहरणाप्रमाणेच, विचारांशी फारकत घेतलेल्या समूहाला हवे असलेले चिन्ह मिळाले तरी ते चिन्ह काहीच उपयोगाचे ठरणार नाही. ते अर्थहीन, शक्तिहीन व उरजहिण होईल. याचा अर्थ असा की, चिन्ह व त्या मागील विचार हे कधीही कुणालाही विभक्त करता येत नाहीत, वेगळे करता येत नाही, व जर कुणी तसे प्रयत्न जाणूनबुजून किंवा अजातेपणी झाले वा घडले, तर समाज-मन ते बरोबर ओळखून ते चिन्ह जरी एखाद्या समूहाकडे असले, तरी त्या समुहास बिल्कुल महत्व देणार नाही हे निश्चित, काडीचीही किम्मत देणार नाही हे अगदी स्पष्ट आहे.

हिंदू धर्मात मूर्ती (प्रतीक) व छायाचित्राला किती महत्व देतो आपण. अगदी दरवर्षी गणपती विसर्जन करतानं देखिल आपण किती भक्तिभावाने त्या पार्थिव गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन करीत असतो. एक आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे (Prisoners of War – POWs) युद्धात जेंव्हा शत्रूचे सैनिक ताब्यात घेतल्या जातात, तेंव्हा त्यांना देखील माणुसकीची वागणूक द्यावी लागते. कधी कधी राजकीय निदर्शनांमध्ये ज्याचा विरोध करावयाचा आहे, त्या व्यक्तीच्या छायाचित्राला जोडे मारतात. ही खरी तर ते हीन प्रवृत्तीचे निदर्शक कृती आहे. निषेध जरूर करावा पण अशा प्रकारे नव्हे, त्यातसुद्धा काही तारतम्य असावे, जसे बोलण्यात देखिल आपण समाजमान्य भाषेचा वापर करत असतो. असो. राजकीय पक्षांना नैतिकतेचे धडे शिकविणे माझे काम नाही. त्यांच्या प्रत्येकाच्या अखत्यारीत एक वेगळा विचार गट (Think Tank) असतो जो अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करत असतो व त्यांच्या पक्षातील लोकांनान सल्ला व मार्गदर्शन करीत असतो. ते त्यांचे काम करतील. संकेत-चित्र, चिन्ह किंवा मानक व त्याच गर्भितअर्थ (Essence) हे अभिन्न असतात व त्यां मानचित्रात, चिन्हात खोलवर रुजलेले असतात (Deeply integrated and interwoven.) चिन्ह व मांनके व त्यांचा यथार्थ अर्थ हे अभिन्न, एकरूप व एकसंघ असतात (Inseparable, Integrated and Aligned) जेंव्हा ‘पितांबर’ म्हणतो तेंव्हा त्यातील पिवळा रंग हा विभाज्य घटक असतो, पिवळा नसेल तर मग तो पितांबर नसेल, सोंड नसेल तर मग तो गणपती नसेल, शेपूट व भंगलेली हनुवटी नसेल तर मग तो हनुमान नसेल. मनुष्य म्हटला की तो फक्त पायांवर चालणारा व हातापायांवर चालणारा म्हणजे प्राणी, सरपटणार्यान प्राण्यांना हातपाय नसतात म्हणूनच त्यांना सरपटणारे प्राणी म्हणतात (Reptiles). ही वेगळी गोष्ट आहे की, कधी कधी स्वार्थाकरिता काही लोक त्या सरपटणार्या् प्राण्यांप्रमाणे अगदी कुणासमोरही साष्टांग दंडवत घालतात (Stooping down) व अशा वेळी आशा लोकांना समाजात कणा नसलेले (Spineless) असे संबोधण्यात येते, कारण तसे लोक विचार, शिष्टसंमत संकेत व मूल्यांना पडली तूडवित असतात.

चिन्ह किंवा चित्र स्वत:हून आपला अर्थ निर्माण करीत नसते, तर त्या चिन्हाचा स्विकार केलेले समूह व त्यातील लोक त्यांत अर्थ निर्माण करत असतात, जसा एक चित्रकार त्याने काढलेल्या चित्रात रंग भारत असतो व त्या चित्राला एक अर्थ आपल्या कृतीने प्रदान करत असतो. जसे महाभारतातील युद्धात अर्जुनाच्या रथावर जो भगवा ध्वज होता त्यावर पवनपूत्र महापराक्रमी रुद्रावतार हनुमांचे चित्र (खरे तर अस्तित्व होते.) त्याचा अर्थ कृष्णावतारात आधीच्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील भक्त व सहकारी द्वापरयुगात सुद्धा आपल्या प्रभुला विसरला नाही व साथ सोडली नाही, ही अभेद्यता, साहचर्य व एकनिष्ठता अजोड व आदर्शवत आहेच. एकदा हे समजले की मग असे चिन्ह, प्रतिक किंवा संकेत आपलेसे करणे म्हणजे नक्की का हे समजणे अगदी सोपे आहे.


मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजीनगर
भ्रमणध्वनिक्रमांक : ८३०८८ ३५३१३
विद्युतसंदेशसंकेतसूत्र: bhalerao.mukund@gmail.com

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top