Marathi

जय नावाचा इतिहास…….

सायंकाळ म्हणजे दिवसाला रात्रीशी भेटण्याची वेळ, म्हटले तर रात्र वाटते म्हटले तर दिवसही वाटतो. पण खरे तर दोन्हीही नसतात. असतात फक्त आभास, असण्याचे. बर्याेच वेळा आयुष्यात देखील असेच काही क्षण येतात, जेंव्हा की, नक्की कळतच नाही की ती वेळ कुठली आहे. त्यात छाया असते आनंदाची, पण विनाकारण आपण त्यात दू:खाची छाया आहे असे समजून वागतो व स्वत:च दू:खी होतो. म्हणजे काय तर साप समजून दोरीला बडवत बसतो. चूक कुणाची असते? आपलीच. मग दोष कशाला दुसर्याजला द्यायचा बरे. जरा आपल्या अंत:करणात डोकावून पाहिले की, लगेच उमजेल व उमगेल की, आपणच विनाकारण दू:ख शोधत आहोत. दु:ख नसतेच, असतो तो फक्त आपला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोण स्वत:विषयीचा. एकदा का आपण स्वच्छपणे व प्रामाणिकपणे स्वत: पाहण्याची सवय लावली, ओयवून घेतली नं घाबरता की, सगळे प्रश्न कसे पटापट सुटतात व आपण मोकळे होतो. मग का बरे आपण दु:ख कुरवाळत बसतो, कारण तसे करण्यात चांगले वाटते, ज्याला इंग्रजीत कम्फर्ट झोन (Comfort Zone) असे म्हणतात. त्या झोनमध्ये राहिले की मग अन्य कांही करण्याची गरजच उरत नाही, शिल्लक राहते काम ते फक्त इतरांना, देवाला व दैवाला दोष देण्याचे; आणि तसे केले की, थोडीशी का होईना सहानुभूती मिळते इतरांकडून आपल्याला आपोआप. हल्ली ‘व्हिक्टीम कार्ड’चा (Victim Card Game) खेळ खेळणे एकदम सोईस्कर असते. ‘बघा नं मी किती बिचारा आहे, मला सहानुभूतीची किती गरज आहे, मी दु:खी आहे हो.’ बस असेच सांगत राहायचे म्हणजे मग कुणी आपल्याला दोष देत नाही, नांवे ठेवत नाही. मिळते फक्त ती सहानुभूती. मिळते काय तर काहीही न करता आपण सुरक्षित राहतो, लोक निंदेपासून, दोषारोपांपासून; पण असे केल्याने आयूष्य कधीच समृद्ध होत नाही, होऊ शकत नाही, कारण प्रयत्नच नसतात.

शोको नाशयते धैर्य, शोको नाशयते शृतम् |
शोको नाशयते सर्वंम नास्ति शोकसमो रिपु: ||

शोक धैर्याचा नाश करते. शोक ज्ञान नष्ट करते. शोक सर्वस्वाचा नास्ग करते. यामुळे शोका सारखा दूसरा भयंकर शत्रू नाही. शहाणे लोक दु:खाला कुरवाळत बसत नाही व आपल्या दु:खाचा उत्सव पण करत नाहीत तर ते त्या दु:खावर नियंत्रण मिळवतात वं पूढे जातात. आपण फक्त शाळेत निबंधात गुण मिळविण्याकरीता तेवढे एक वाक्य हमखास लिहितो, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’. एकदा का शाळा संपली की, त्या वाक्याचा उपयोग संपला असे समजतो, कारण मग निबंध लिहावयाचा नसतो ना. स्वत:चीच फसवणूक करीत राहतो आपण मूर्खाच्या दुनियेत राहून. भागवान श्रीकृष्णाने श्रीमदभगवदगीतेत तिसर्यान अध्यायांत ‘कर्मयोगात’ एकूण ४३ श्लोकांच्या माध्यमातून अर्जुनाला कर्माचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्या अध्यायच्या सुरुवातीलाच अर्जुन भगवान श्रीकृष्णाशी वादविवाद (Argument) करतो,

अर्जुन उवाच, “ज्यायसी चेतकर्मणस्ते मता बुद्धिर्जनादर्न |
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ||३.१||

हे जनार्दना ! तूच आधी संगितलेस की, ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून आणि तरीही तू मला कर्म करण्यास बाध्य करीत आहेस, आग्रह करीत आहेस. का बरे केशवा? केशव हा अर्जुनाचा नुसताच मित्र नव्हता आजच्या मित्रांसारखा उपहारगृहात जाण्याकरिता किंवा चित्रपट गृहात जाण्याकरीता, मित्राला खुष करण्याकरिता. तो खरा मित्र होता, उपदेशक (Advisor) होता, समुपदेशक (Counselor)होता, हितकर्ता (Well Wisher) होता. श्रीकृष्णाने अर्जुनाला वाईट वाटेल म्हणून त्याला आवडणारे तेवढेच नाही सांगितले, तर जे खर्याd अर्थाने योग्य व त्या परिस्थितीत आवश्यक होते तेच सांगितले. खरे तर जे भागवान श्रीकृष्णाने सांगितले ते सर्वकाळाकरिता मित्र कसा असावा व त्याने कसे वागावे याचा वस्तूपाठच आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितल्या दोन गोष्टी. पहिली कर्म करणे का आवश्यक आहे.

न कर्मणारम्भानैष्कर्म्य पुरुषोs श्नूते |
न च सन्ञसनादेव सिद्धिं समधिगच्छति ||३.४||

हे अर्जुना ! कर्मापासून दूर पळाल्याने किंवा कर्माचा त्याग केल्याने कर्मापासून अलिप्त राहता येत नाही आणि म्हणून अर्जुना ! आणि, मग दुसरी वास्तविकता त्याच्या लक्षात आणून दिली.

न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् |
कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणे: || ३.५ ||

अर्जुना ! कुणीही कर्मांपासून मुक्त नाही. कुणाला आवडो वा न आवडो, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला कर्म कारावेच लागते, आणि हा गुणाचा परिणाम आहे.

अर्जुनाने हे फक्त ऐकूण नाही घेतले तर त्यावर विचार करून त्या प्रमाणे, नंतर का होईना अर्जुनाला ते पटले व हताश व निराश झालेल्या अर्जुनाने रणांगणावर खाली ठेवलेले धनुष्य उचलून आवेशाने त्याच्या बाणाची प्रत्यंचा ओढली व पुढील महाभारताचा इतिहास आपल्या सर्वांनी अनेक वेळा एकला व वाचला सुद्धा, व म्हणूनच त्याला ‘जय नावाचा इतिहास’ म्हणतात. तेथूनच प्रसिद्ध ‘यतो धर्मस्ततो जय:|’ हे वाक्य पुढे आले. आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य देखील हेच आहे, ‘जिथे धर्म तिथे जय !’

सारांश, कर्म न करण्याचे कारण शोधत बसण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्याच्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करून त्या दिशेने अथक प्रयत्न करणे हाच शहाणपणा आहे. रात्रीशिवाय दिवस नाही अन दु:खाशिवाय सुख नाही हे का एकदा समजुज घेतले की, मग काहीच शंका रहात नाही व आपण आपल्या ध्येयाकडे अढळपणे वाटचाल करू शकतो.


मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजीनगर / १३ नोव्हेंबर २०२२ / रात्री २०:३५

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top