गेल्या कांही वर्षांत अनंत प्रकारची समाज माध्यमे अस्तित्वात आली. अर्कुट, टिंडर, टिकटॉक, फेसबुक, व्हाटस याप, इनस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, युट्यूब, कु वगैरे. यांतील कांही काळाच्या ओघांत लुप्त देखील झाले आहेत एव्हाना. युट्यूबवर तर घरबसल्या पैसे कामावण्याचे उत्तम साधन झाले आहे.
माझा बराच काळपर्यन्त असा समाज होता की, “फॉलो” करणारे तुमच्याशी ‘संवाद’ करू इच्छितात, संवाद साधू इच्छितात, पण तसे नाही. कांही लोकांना तर ‘मला किती लोक फॉलो करतात’ हे सांगण्यातच खूप मोठेपणा वाटतो. कांहीजण तर अशा तोर्यां त असतात की, ते त्यांच्या वागणुकीतून इतरांना ‘गौण’ दर्जाचे समजतात. कांही तर इतरांच्या ‘कॉमेंट्स’, देखील प्रतिबंधित करतात.. त्यातून असा संदेश एकावयाला येतो की, “आम्ही सांगतो ते तुम्ही गप्पपाने वाचा, ऐका व पहा, बस्स! तुम्ही आम्हाला कांही सांगू नका. आम्हाला तुमचे काहीही ऐकायचे नाही. कांही दिवसांपूर्वी मी व्हाट्स आपवर एका व्यक्तीबरोबर कांही शेअर केले व प्रतिसादाची विनंती केली त्यांना. त्यांवर त्यांचा अर्थहीन प्रतिसाद, “काय प्रतिसाद देऊ?” आता हे वाचल्यावर मला असे वाटले की, त्यांना एक तर मी लिहिलेले कळलेच नसावे किंवा ते स्वत:ला अति विद्वान तरी समजत असावेत. मुद्दा असा की, सामाजिक माध्यमे संवादाची {सुसंवाद तर फारच दूर राहीला.] साधने किंवा माध्यमे राहिलेली नाहीत, कारण त्यांत सर्वकाही एकतर्फी (One Way Traffic) होत चाललय. ‘संवाद’ हा दोन व्यक्तींमध्ये होत असतो याचाच विसर बहुतेकांना पडलेला दिसतोय. यांत सामाजिक मानसशास्त्राचा (Social Psychology) पण संबंध आहे. वैविध्यपूर्ण बुद्धिमान विद्युत उपकरणांनी दोन व्यक्तींमाधील संवादाची पातळी (Level), वारंवारता (Frequency), गुणवत्ता (Quality), समीपता (Affinity) वाढावी अशी ईच्छा व अपेक्षा असतांना घडते ते मात्र नेमके उलटेच ! एकाच घरात वरच्या मजल्यावर असणार्याे मुलाला किंवा मुलीला आई किंवा बाबा मोबाईवरुन कॉल करतात, पण सरळ सरळ नावाने हाक मारत नाही; किंवा स्वत: तेथे जाऊन त्याच्या हाताला धरून आग्रहाने घेऊन येत नाही हाताला धरून. का बरे ! भावाला दादा किंवा त्याच्या नावाने हाक न मारता ‘ब्रो’ ह्या अर्थहीन, बेढब नीरस शब्दाने बोलावतात बहिणी. भाऊ देखील ‘ताई’ सारख्या प्रेमळ शब्दाने हाक न मारता ‘सिस’ सारख्या फालतू शब्दाने बोलावतात. भाषा ही वरवर जरी एकमेकांशी संपर्क करण्याचे साधन असले तरी प्रत्येक भाषा आपल्याबरोबर सामाजिक व संस्कृतिक घेऊन येत असतात, वाहून आणत असतात, प्रतिध्वनीत करत असतात. त्या भाषेतील प्रत्येक शब्द हा अनुभवसिद्ध व समृद्ध झालेला असतो; अर्थवाही बनेला असतो. मराठी असो, हिन्दी असो, उर्दू असो वा इंग्रजी, त्या प्रत्येक भाषेतील शब्द एक विशिष्ट रंग (Colour), रंगछ्टा (Colour-Shade), नाद (Sound), गंध (Fragrance) व लययुक्त (Rhythmic) असतात. जसे मराठीत ‘भारदस्त’, उर्दूत ‘नजाकत’, हिंदीत ‘आप’, इंग्रजीत (Mellifluous), संस्कृतमध्ये ‘अमृतवर्षिनि वगैरे. या शब्दांकरिता अगदी समर्पक किंवा ह्या शब्दांचा नेमका अर्थ ध्वनित करणारा शब्द दुसर्याश भाषेत शोधणे दुरापास्तचा. प्रत्येक शब्दाला समानार्थी (Synonym) शब्द असतात, परंतु, त्यातील प्रत्येक शब्दाची अर्थछटा निराळी असते. असे बघा, आई, आईसाहेब, मातोश्री, माई हे सगळेच शब्द चांगले व श्रवणीय वाटतात, परंतु ते एकमेकांचे पर्यायवाचक होऊ शक्त नाही किंवा असू शकत नाही; कारण त्या शब्दांचा इतिहास वेगवेगळा आहे. त्यांची जडणघडण वेगवेगळी झालेली आहे.
मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास व भाषाशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. ह्या सर्वांचा एकमेकांशी होणार्याज क्रियाप्रक्रियांमधून भाषेची जडणघडण होत असते. [संदर्भ: भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी, लेखक श्री. म. माटे] त्याचे ‘पानिपत’ झाले किंवा तिचा ‘क्लिनबोल्ड’ झाला हे वाक्प्रचार दररोजच्या जगण्यातून साकारलेत. खोके, बोके, ओके हे तर एकदम ताजे उदाहरण आहे. असो. कांही शब्दांचे अर्थ काळानुसार बदलत जातात, तर कांही शब्दांचे सामाजिक स्तर व अर्थ प्रदेशानुसार बदलतात . [संदर्भ: वैदर्भिय बोली – एक भाषाशास्त्रीय अभ्यास, लेखक: प्रा. डॉ. सौ. इरावती कर्वे]. आपला मुद्दा असा आहे की, कितीही प्रगत वैज्ञानिक – विद्युत – बुद्धिमान’ साधने उपलब्ध झाली तरी त्या सर्वांचा वापर करणार्याा मानवाच्या भावनिक बांधणीवर (Emotional Architecture) सर्व अवलंबून आहे. आज जर कुणाल पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र लिहावयास सांगितले तर कित्येकांना कदाचित लिहिताही येणार नाही, कारण, त्यांच्या बाबतीत शब्द व भावनांची केंव्हाच फारकत झालेली आहे. शब्द व भावनांची सुसंगतता उरली नसते, एवढेच काय पण शब्द संपत्ति पण देवसेदिवस कमी होत चाललीय, आटत चाललीय. कदाचित यामुळेच ‘संवाद’ करण्याएवजी ‘संदेश’ पाठविणेच शिल्लक राहिलीले आहे.
असे होण्याचे अंतस्थ कारण हजारो वर्षांपूर्वी महर्षि पाणिनींनी, ‘पाणिनीयशिक्षा’ ह्या ग्रंथांत बोलण्याच्या आंतरिक प्रेरणेविषयी असे म्हटले आहे.
आत्मा बुद्ध्यासमेत्यर्थान् मनोयुङ्ग्क्ते विवक्षाया |
मन:कायाग्निमाहन्ति सप्रेरयति मारूतम् ||६||
जीव (Soul) बुद्धिद्वारा (Intelligence) विषयांना योग्यप्रकारे जाणून त्याविषयी बोलण्याच्या ईच्छेने मनाला (Mind) प्रेरणा देतो. मन शारीरिक शक्तीला (जठराग्नीला) (Physical Energy) उद्युक्त करण्यासाठी प्रेरणा देते. जठराग्नी फुफ्फुसामधील (Lungs) प्राणवायूला प्रेरित करते.
म्हणजे सर्वोच्चस्थानी जीव किंवा आत्मा आहे. आपण सर्वसामान्यपणे बुद्धी (Intelligence) व मन (Mind) हे वारंवार एकतो, संदर्भित करतो आणि जीव किंवा आत्मा ह्यांना आधिभौतिक (Metaphysical) किंवा अध्यात्मवादी (Spiritual) म्हणून बाजूला ठेऊन देतो व दुर्लक्षित करत असतो, जे की एकदम चुकीचे व आत्मघातकी आहे असे मला वाटते.
दुसर्या बरोबर जोडून घेण्याची मूळ प्रवृत्ती (Basic Attitude to Connect with Others.) कदाचित शिल्लक राहिलेली नाही. मला वाटते सर्वात मूलगामी प्रश्न तर असा आहे की, व्यक्ति स्वत:बरोबर तरी जोडलेला (Connected) आहे का? स्वत:शी स्वगत (Self Talk) करणे कांही प्रमाणात स्वत:च्या व स्वत:विषयीच्या कल्पनांना स्वच्छ व स्पष्ट स्वरुपांत पाहण्याची संधि उपलब्ध करून देते, पण आवाजवी व अवास्तवपणे (स्वत:त) गुंतून राहणे याला मानसशास्त्रात ‘स्वमग्नता’ (Autism) म्हणतात, जे की चांगले नाही. स्वत:च्या स्वरुपाच्या प्रेमांत पडून स्वत:ला स्वत:त कैद करुन घेणे याला इंग्रजीत ‘Narcissism’ (The habit of admiring yourself too much especially your appearance.) Narcissism personality disorder is one of several types of personality disorders. It is a mental condition in which people has an inflated sense of their own importance, a deep need for excessive attention and admiration, troubled relationship, and a lack of empathy for others, but behind this mask of extreme confidence lays a fragile self-esteem that is vulnerable to the slightest criticism. [Reference: http://www.mayoclinic.org/diseases-conditions/narcissistic perrsonality-disorders/symptoms-causes/sys-203 66662]. मूलत: बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. मूल श्रवण केलेल्या ‘स्वनिम’ च हुबेहूब उच्चार करण्याचा प्रयत्न करते, कारण त्याच्या बुद्धीला इतके जरूर कळते की, तशा ‘स्वनिम’ उच्चाराने आपण समोरच्या व्यक्तिपर्यंत पोहचू शकतो, संवाद साधू शकतो. अर्थात जन्मत: मुकबधिरांमध्ये असे करण्यात अडथळा येतो. [पहा जुना हिन्दी चित्रपट ’कोशिश’: संजीव कुमार, जया भादुरी व पिंचू कपूर].
सहवास, सहसंवेदना, सहअनुभव या सर्वांवर संवाद अवलंबून असतो. याचे एक उत्कृष्ट उदाहरण मला आठवते. बहुधा ते वर्ष १९७० असावे. त्यावेळी मी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. पदमश्री वीर मोहन रानडे हे गोवामुक्ति संग्रामातील एक प्रमुख नेते होते. त्यांना १९५५ साली पोर्तुगिजांनी अटक करून तब्बल २६ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. पोर्तुगालच्या लिस्बन येथील तुरुंगात त्यांनी १४ वर्षे तुरुंगवास भोगला. त्यांचे भाषण जेंव्हा मी एकले तेंव्हा त्यांना मराठी शब्द लवकर सुचत नव्हते, आठवत नव्हते. वाक्य उच्चारण्यास खूप त्रास होत होता. याचे कारण म्हणजे त्यांना लिस्बनच्या तुरुंगात इतर दुसर्यार कुणाशी मराठीत संवाद साधता आलेला नव्हता. आपण जर स्वत:मध्येच मश्गुल होऊन राहिलो तर आपली अवस्था देखील तशीच होऊ शकते. त्यांना तर फक्त मराठीतच बोलणे अवघड जात होते, आपल्याला तर काही एक बोलता येणार नाही; कारण आपली संवाद साधण्याची इच्छाच नष्ट होऊन गेलेली असेल. कान, नाक, डोळे, तोंड व मेंदू असला म्हणजे बोलता येईलच असे नाही; कारण ह्या सर्वांचा उपयोग करण्याकरिता बुद्धी, क्षमता, कौशल्य व त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरीक प्रवृत्ती, इच्छा व उर्मि असायला हवी नां. ध्वनिमुद्रणाची साधने असली तरी बोलणारा बोललाच नाही किंवा गाणार्यादने गायलेच नाही, तर ते ध्वनिमुद्रण यंत्र काय करणार! याबाबत संस्कृतमध्ये एक श्लोक आहे. ‘यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रं तस्य करोती किं, लोचनाभ्यां विहीनस्य दर्पण: किं करिष्यती |’ शास्त्र स्मजण्याकरिता स्वत: जवळ प्र्ज्ञाच नसेल तर त्याला शास्त्र काय करणार, जसे डोळे नसलेल्या (दृष्टी नसलेल्या) व्यक्तीला आरशात दिसले नाही तर त्याला आरसा काय करणार! जीव हीच प्राणशक्ती मुळस्थान व प्राथमिक प्रेरणा व उर्जास्थान आहे. गणपतीअथर्वशिर्षात ‘मूलाधारस्थितोसीनित्यं |’ अशी एक ओळ आहे. ती गणपतीला उद्देशून आहे. गणपती ही विद्येची मूळ देवता, ज्ञानदायक देवता आहे. त्या मुळरेणू (Atom) लाच विसरून कसे चालेल. संवाद न साधणार्यांञना बहुधा प्राथमिक (Fundamental) गोष्टीचा विसर पडत असावा व म्हणून परिणाम स्वरूप संवाद साधण्याची ईच्छाच निर्माण होत नसावी, तर मग ऊर्जा येणार कुठून?
यावर उपाय म्हणजे, शालेय स्तरापासून, कुटुंबांत, समाजात, शाळेत, व्यावसायिक संस्थांमध्ये, धार्मिक संस्थांमध्ये, भाषणांपेक्षा संभाषणाला, संदेशापेक्षा संवादाला व संवादापेक्षा सुसंवादाला महत्व द्यायला शिकविले पाहिजे. त्यात आत्मसन्मानाबरोबर दुसर्यामलाही मान देण्याचा मूळपाठ शिकविणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या ‘मनीचे त्या मनी’ कसे प्रस्फुटीत होईल, पोहचेल, उमगेल याचे ‘तंत्र व मंत्र’ स्वत: अंगीकृत करून त्याचा सहज व स्वाभाविकपणे अंगीकार, पुरस्कार, प्रचार व प्रसार केल्यास समाज खर्याा अर्थाने आंतरिक ओढीने भावनिक पातळीवर एकमेकांशी जोडला जाईल व दिखाऊ व टाकाऊ संबंधांपेक्षा टिकाऊ व सर्वांना अंतर्बाह्य सुशोभित, सुसंगत, सुमंगल व आनंददायी बनवेल यात मुळीच शंका नाही.
मुकुंद भालेराव
दिनांक: ८ नोव्हेंबर २०२२ | संध्याकाळी – १९:५३