पाहता पाहता अभिराम, झाला कसा मोठा,
खेळता खेळता आनंदाने, सरसरसर झाला मोठा…………
सोडत होतो शाळेमध्ये, आणायलाही जात असे,
शाळेच्या मग फाटकापाशी, वाट त्याची पहात असे……………..
पटकन मग कुठूनतरी, तो पळत पळत यायचा,
‘आबा आबा’ म्हणत मग, हात धरुन घ्यायचा………..
पाहता पाहता झाला मोठा, भरभर उंच झाला तो,
एक दिवस बाबा बरोबर, गोव्याला निघून गेला तो………
तो तिथे अन मी इथे, मोबाइलच आमचा कनेक्टर,
भेट होती आमची आता, मोबाईलच बेस्ट कंडक्टर………….
आहे म्हणतो खूप बिझी, खूप अभ्यास, नाही वेळ,
सांगतो असतो हसत हसत, ‘आबा मला नाही वेळ’……….
त्याचे देखील खरे आहे, नवीन त्याचे विश्व आहे,
नवीन शाळा मित्र नवे, सारेच तिथे नवीन आहे…………
मला मात्र आता इथे, जुनेच सारे सोने आहे,
फोटो त्याचे व्हिडिओ जुने, पाहणे हेच काम आहे………………….
टीव्ही पाहतो पुस्तके वाचतो, सदोदित मी व्यस्त असतो,
वेबसिरीज आणि संगीत, पाहुन ऐकून खुश असतो……..
आभासाची सारी दुनिया, प्रातिसाद कसा देणार हो,
माझ्या बरोबर हसणार कसे, टाळी कशी बरे देणार हो…………
अंगवारती रेलून छान, अभिरामची आता गंमत कुठे,
कांही झाले की सेल्फीची, ती गम्मत आता कुठे………..
करत असतो व्हिडिओ कॉल, ‘आणखी काय’ विचारत असतो,
‘आणखी आता काहीच नाही’, हेच उत्तर मी देत असतो………………..
तुज पंख दिले देवाने, जुने गाणे आठवत असतो,
आठवणीच्या झोपाळ्यावर, मन माझे रमवत असतो…………
वाट आता पहात आहे, गोव्याला मी जाण्याची,
दररोज त्याला शाळेमध्ये, बरोबर घेऊन जाण्याची……………
सहा दिवस शाळेमध्ये, बिझी तो खूप असेल,
शनिवार आणि रविवारी, आमची धमाल खूप असेल……….
कधी डोंगर कधी जंगल, बीचवर जाऊ खेळायला,
अभिराम बरोबर पुन्हा एकदा, गम्मत जम्मत करायला…………
मुकुंद भालेराव / छत्रपतीसंभाजी नगर / 19-01-2022 / दुपार:११:०५