आनंदी व्हायला कारण कशाला असावे लागते,
जमिनीवरून झेपावयाला कारण कशाला असावे लागते…….
नवीन कांही शिकायला कारण कशाला असावे लागते,
आकर्षक सुंदर दिसायला कारण कशाला असावे लागते…………
सहजपणे ‘धन्यवाद’ म्हणायला मन मोकळे असावे लागते,
नसली चूक तरीही ‘क्षमस्व’ म्हणायला मन मोठे असावे लागते…..
रुसून कुणी बसेल तेंव्हा स्वत:हून बोलायला लागते,
आनंद कशातही शोधायला मन आनंदी असावे लागते………
दु:खी होण्याकरिता काहीच करावे लागत नाही,
मन दुखविण्याकरीता प्रयत्न करावे लागत नाहीत……..
कुणाला परकं करायला एक क्षणही लागत नाही,
धरलेला हात सोडायला, एक श्वासही लागत नाही………
जोडलेली मने दुभंगण्याला क्षणाचाही अवकाश लागत नाही,
सहवासातून विजनवासाला काहीच वेळ लागत नाही………
शब्दांसारखे शस्त्र नाही सार्यांचनाच माहीत असते,
असीमित भावनांनी सगळीच राखरांगोळी होऊन जाते……..
शब्द खूप महाग आहेत प्ल्याटीनम देखिल स्वस्त आहे,
आताच्या गाइडेड मिझाईलपेक्षा शब्द लक्षवेधी शस्त्र आहे……..
परिणाम अनुस्फोटाचे नंतर नंतर होत राहतात,
पारिणाम शब्दस्फोटाचे क्षणात नाश करून जातात……….
शब्दांमध्ये दडलेली शक्ति खूप अपार आहे,
तरीही शब्द उच्चारणारा स्वत:च अनभिज्ञ आहे……..
आपण सहज बोलून जातो मनांत कधी काहीच नसते,
ऐकणार्याचे अंतरंग आत जाळून जात असते…….
प्रेमाने हळुवारपणे शब्दांशी मैत्री करून पहा,
फुलांच्या कोमलतेने प्रत्येक शब्द बोलून पहा………
सन्निध प्रेमळ व्यक्तीच्या मन तुमचे मोकळे करा,
मधात मिसळून प्रत्येक आर्ततेने बोलून पहा………
मन प्रांजळ असले की अंतरंग स्थिर होते,
गोंधळ सारा संपून मग मन एकदम स्वच्छ होते………
अंतरातली शांतता शब्दांना मधुर करून जाते,
हलकेच सुंदर सारे शब्द भावगीत बनून जाते………
प्रेमाने ओलावलेला शब्द मृदु कसा बनून जातो,
साध्या साध्या शब्दानांही सुमधुर तो बनवून जातो……….
प्रत्येक क्षण आनंदाचा महोत्सव मग बनून जातो,
अगदी साध्या गोष्टींमध्ये आनंद सारा फुलून जातो………
हवे कशाला मग आनंदी व्हायला कारण दुसरे,
आनंदे भरीन विश्वासही हेच कारण आहे पुरे………..
बस मग ठरले आता आपल्याला आनंदी व्हायचे आहे,
काहीही कारण नसतांना आनंदी नक्की बनायचे आहे………..
अगदी सहज वाटले म्हणून आवडते माझे कपडे घालीन,
वाटले माझ्या मनास म्हणून नवीन काही करून पाहीन………
मनामध्ये येताच माझ्या आवडते गाणे गाउन पाहीन,
नर्तक जरी नसलो तरी ‘सालसा’ देखील करून पाहीन……….
नसेल करीत कुणी चित्रमुद्रण तरीही अभिनय करून पाहीन,
सर्वांबरोबर माझ्याकरिता आनंद मी बनून राहील………..
मुकुंद भालेराव छत्रपती संभाजीनगर / २९-११-२०२२ / ००:२५