कमला नेहमीप्रमाणे तिच्या कार्यालयात वेळेपूर्वी पोहचली. प्रसाधन गृहात जाऊन आली. तितक्यात हरीसुद्धा पोहचला. दोघांच्या बसण्याच्या जागा शेजारी शेजारीच होत्या, कारण दोघांचा वृत्तपत्र विभाग एकच होता, ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’. हरी प्रसाधन गृहाकडे जातांना नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचे पैशाचे पाकीट त्याच्या टेबलाच्या पहिल्या कप्प्यात ठेवले.
कमला क्षणभर थांबून त्याच्या टेबलाकडे गेली व क्षणार्धात तिने त्याच्या पाकीटाच्या मागच्या कप्प्यात एक छोटी चिठ्ठी ठेवली व आपल्या जागेवर येऊन बसली. थोड्यावेळाने, कमला व हरीला त्यांच्या संपादकाने बोलविले. दोघेही बरोबरच गेले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सपादकाने अचानक विचारले, “काय कमला, मग लाडू कधी खाऊ घालणार? रशिया युक्रेनचे युद्ध संपल्यावर का?” तसे सर्वानाच हसू फुटले. कमला उत्तरली, “निरोप पाठवला आहे.” हरी, “मग उत्तर नाही मिळाले कां अजुन?”
“लोकांना स्वत:च्या अवतीभोवती पहायला वेळ कुठे असतो. सगळ्यांना दूरदृष्टीमध्येच रस असतो.” कमला सहजपणे बोलून गेली.
तितक्यात संपादक म्हणाले “हरी, ते काल मी ठेवायला दिलेले व्हिजिटिंग कार्ड दे बर मला.” हरीने बोलताबोलता आपले पाकीट काढले व नेहमीप्रमाणे पाकीटाच्या मागच्या कप्प्यात हात घालून कार्ड संपादकासमोर ठेवले. संपादकांनी समोरील चिठ्ठीवर सुवाच्च्य हस्ताक्षरात लिहिलेले वाक्य वाचले……”हरी, माझ्याशी लग्न करशील कां? कमला.”