उभी ती तिथे त्या दरीच्या किनारी,
तशी वाकलेली न्याहाळीत खाली,
उगवत्या रवीचा पसरे प्रकाश,
फुलवीत होता तिच्या मनास…………….
तिथे कोकिळेचे असे मुग्ध गान,
तिचे चित्त हर्षे हरवीत भान,
काळ्या ढगांची श्वेतरंगी किनारी,
हसर्या जलाची बरसात सारी………….
मनी दु:ख सारे जसे ते निखारे,
किती घोर शंका अन ते शहारे,
प्रतिमा प्रियाच्या अशा त्या मनात,
अनामिका ती स्मरते मनांत……………………
तशा आणभाका झाल्या बहुत,
किती स्वप्नकाव्ये तिच्या मनात,
चढण्यास वरती अती कष्ट त्याला,
तसे पाहता त्या ती विचारी मनाला…………….
उभी डोंगराची निसरडी ती वाट,
अविश्रांत त्याची कशी ती पहाट,
विरहा भयाने तिच्या अश्रु गाली,
पाहता तयाची चढण्यास घाई……………..
थकला तरी तो मनी निश्चयास,
सोडे न यत्ने परी पोहचण्यास,
त्याच्या जीवाला तिची आस होती,
त्याचीच प्रतिमा तिची साथ होती…………….
जिवाच्या आकांते तिला भेटण्याला,
किती श्वास कोंडून आला असा,
अती कष्ट त्याचे पाहून तेथे,
तिच्या मनाचे अवसान जाते………………….
कष्टात त्याच्या नसे ती निराशा,
अविश्रांत यत्नात दिसे सुप्त आशा,
नयनात त्याच्या जशा दिव्यज्योती,
किती स्नेह त्यांचा तशा चांदराती………………
प्रयत्नान्ती तो त्या कड्याच्या किनारी,
उभा ठाकला हर्ष नि:शब्द पाही,
त्याच्या कराला तिचा स्पर्श झाला,
बरसल्या नभीच्या संतृप्त धारा……………
प्रभाती प्रकाशी आभा निराळी,
नेत्रांत त्यांच्या प्रीतीची दिवाळी,
हळुवार त्याचा असा स्पर्श झाला,
जणू चांदण्याचा फुलला पिसारा……………
आता हर्ष मावे न त्यांच्या मनांत,
ती मुद्रिका जी त्याच्या हातात,
सरकताच हळुवार अनामिकेशी,
दिसे मुग्ध लाली गाली उषेची………..
नयनात नाचे पिसारा मनाचा,
वसन्तोत्सव तो त्यांच्या मनाचा,
सहस्त्रधारा जशा आसमंती,
बरसात हृदयी तशी अमृताची……….
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
०६-१२-२०२२ | दुपारी १४:४७ |