Marathi

एक नवीन साहित्य प्रयोग

मी यापूर्वी लेख, कविता, कथा, अति लघुकथा (अलक) हे साहीत्य प्रकार इंग्रजी, मराठी, हिन्दी व उर्दू भाषेत हाताळलेत. कांही उर्दू / हिन्दी गाण्यांचा इंग्रजीत अनुवाद पण केला. आज यापलीकडे जाऊन एकाच विषायावर एकाच वेळी तीन भाषांमध्ये तीन कविता लिहिल्या आहेत. [संदर्भ: “मराठीत: “जणू चांदण्याचा फुलला पिसारा”, इंग्रजीत: On the Edge of a Cliff”, आणि हिंदीमध्ये: “इरादों का संदल” |]

आता थोडेसे या नवीन प्रयोगाबाबत. काल अचानक तीन शब्द डोळ्यांसमोर तरळू लागले…….डोंगरकडा, तरुणी व मुद्रिका…झाले, बस्स ! ह्या तीन शब्दांतून दृश्यध्वनिचलचित्रपट्टीका (Audio Visual Movie Film) सरसर सरकू लागली व एका चित्रकथाकाव्याचा जन्म झाला. ह्या तीन कविता संस्कृतातील “काव्यप्रकाश” ह्या जगप्रसिद्ध ग्रंथाचे कर्ते मम्मटांची क्षमा मागून प्रस्तुत करीत आहे. त्यांची क्षमा एवढ्याकरिता मागायची की, त्यांचा मते चमत्कृतीजन्य काव्यच उत्तम काव्य असते. एका अर्थाने माझ्या ह्या तीन कविता थोड्या फार प्रमाणात चमत्कृतीजन्य आहेत असे मला वाटते, परंतु थोड्याशा चित्रकाव्य ह्या प्रकारात देखील मोडतात; त्यामुळे त्यांची क्षमा मागणे आवश्यक आहे; म्हणजे अर्धनारीनटेश्वरासारखे. त्यातील मुख्य काय आणि गौण काय ठरविणे जरा कठीणच आहे.

आता हे तीन शब्द का व कोठून आले असे कुणी विचारले तर कदाचित ‘डोंगरकडा’ हा शब्द निसर्गाच्या  ओढीतून आला असावा, ‘मुदिक्रा’ एका मी अनुवादीत केलेय कवितेतून आला असावा, मात्र ‘तरुणी’ हा शब्द, ‘वह कौन थी?’ चित्रपटातील पांढर्‍या शुभ्र कपड्यातील धुक्यातून येऊन धुक्यात विरणार्‍या तरुणी सारखी She emerged from nowhere, एवढेच सांगता येईल ‘तरुणी’ शब्दाबाबत.  त्रिकोणाचे तीन बिन्दु गवसल्यावर काहीही निर्माण होऊ शकते असे मला वाटते.

जशा वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या भाषेत कवितांची रचना केली, तसेच एका कवितेत एकच विषय तीन भाषांमध्ये पण एकाच वेळी या पूर्वी मांडला आहे. त्या कवितेत, एक कडवे मराठीत, दुसरे कडवे इंग्रजीत तर तिसरे कडवे हिंदीत व पुन्हा त्याच क्रमाने पुढे रचना केली. (www.mukundbhalerao.com/blog/2020/12/18/मक्केकी-रोटी-pizza-और-कढी/).

हयापूर्वी कधीही अशा प्रकारे एकाच कथा बिजावर तीन भाषांमध्ये एकसमायावच्छेदेकरून काव्यरचना मात्र पहिल्यांदाच करीत आहे. यात एका भाषेतील कविता दुसर्‍या भाषेत अनुवादीत केलेली नसून, स्वतंत्रपणे लिहिली आहे. त्यामुळे सहाजिकच एका कवितेतील एखाद्या शब्दाला प्रतिशब्द दुसर्‍या कवितेत आढळून येणार नाही हे नक्की.

वर म्हटल्याप्रमाणे, तीन शब्दांवरून एक लघुकथा एखाद्या ‘क्युआर’ कोडप्रमाणे माझ्या मन:पटलावर आकारली व त्यापाठोपाठ एखाद्या निष्णात नर्तकीप्रमाणे पदण्यास करीत अवतीर्ण झाली, ह्या तीन कवितांच्या स्वरूपामध्ये. आता त्या नर्तकीचे काव्यरूप नर्तन कसे आहे हे सुविद्य वाचकच ठरवू शकतील.

जणू चांदण्यांचा फुलला पिसारा On the Edge of a Cliff इरादों का संदल

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top