दूर पर्वती अंधाराचे
कृष्ण वलयं दाट तिथे
मिनमिनता तो एकच होता
दिवा सानुला असे तिथे……..
पहाट झाली रवी उदेला
सर्व पसरला प्रकाश तो
छोट्याशा त्या गुफेमाजी
एक अवलिया निश्चिल तो……..
भगवे त्याचे उत्तरीय ते,
वस्त्रे ती ही कषाय ती,
कृष दिसें तो असा तपस्वी,
दिव्य प्रभावी काया ती………..
लहानशा त्या गुन्फेमाजी,
काहीच नव्हते असे तिथे,
केवळ होते मृगाजीन ते,
असे तपस्वी वलयं तिथे……….
तिथे पहुचलो औसूक्याची,
मनी प्रश्नांची माळ असे,
ध्यान तपस्वी कसे साधती ,
प्रमेय अवघड मनी असे……..
नतमस्तक मग तयापुढे मी,
अगणित असती प्रश्न मनी,
तेजाच्या त्या दिव्य तपस्वी,
पुढे थांबली मूढ मती……..
कुठे निमाले प्रश्न मनीचे,
उत्तर ज्यांचे शोधत होतो,
दिव्य तपसव्या सन्नीध जाता,
प्रश्न मनीचे शोधत होतो………
सूर्य निघाला मावळतीला,
संध्येची ती शाल तिथे,
रवी किरणांची मोहक माया,
मना करविले शांत असे……….
अंतरात तरी शांती नव्हती,
शोध कशाचा अथक जसा,
अवचित माझ्या माथ्यावरती,
हस्तस्पर्श तो जादूचा………..
सरसर भरभर अंतरात मग,
चक्रे फिरली अतिगती,
कुंठीत झाली माझी सारी,
दिव्यत्वाची तीच प्रचिती……..
विश्वरूप ते दर्शन सरीसे,
मला पावले दिव्य तिथे,
एक तपस्वी दिव्य विभूती,
तेजाचे निजरूप तिथे……….
पर्वत तारे वृक्ष पल्लवी,
क्षणात विरले सर्व असे,
तोच तपस्वी अंतरात मम,
मीच हरीचे रूप जसे…………
मुकुंद भालेराव
पोंडा – गोंय
दिनांक: 16 जानेवारी 2023
सकाळी: 08:48