संध्येमध्ये लाली असते,
विरहाची वेदना असते,
बदलाची जाणीव असते,
परत येण्याची शाश्वती असते……
एक काळ सरला म्हणून,
दु:ख करत बसू नये,
येणाऱ्या क्षणाना पाहून,
विचार करत बसू नये……….
उषेच्या लाली सारखीच,
संध्याही न्यारी असते,
आपली आपली वेगळी अशी,
गहरी एक छटा असते……..
उषा आगमनाचा सतत,
संदेश ती आणत असते,
आनंदाचे वातावरण ती,
क्षणार्धात करत असते……….
संध्येच्या आगमनाने,
तारकांची बरसात होते,
स्नेहाची सुरुवात होते, आणि
मनोमनी आळवण्या होतात………..
आवेग असतो नी लगबग असते,
उत्कंठा असते आणि उत्सुकता असते,
हृदयातल्या कुपीमधल्या बंदिस्त स्मृती,
अचानक मग प्रफुल्लीत होतात………..
आठवणी साऱ्या एकदम,
आवेगाने येत असतात,
कोणती आधी कोणती नंतर,
खूप धमाल उडवून देतात………….
मनाला वाटते संध्या अदृश्य झाली,
पण त्याला हे कळत नाही,
कि जाणूनबुजून ओढीकरीता,
कांही काळाकरिता ती निघून गेली…………
चंद्राचा हात धरून ती,
फेर तर धरत असते,
दिसत जरी नसली तरी,
अंत:करणात लुप्त असते……..
संध्येची लाली जरी निवळून गेली,
दिसणारी ती प्रतिमा थोडीशी क्षीण झाली,
तरी आतमध्ये लपलेली ओढ खोल,
अस्वस्थ खूप करत असते………..
वरवरचे दिसणारे गुलाबी रंग,
आतमध्ये काळवंडलेले असतात,
चेहर्यावरचे फसवे भाव मात्र,
वेगळीच गोष्ट सांगून जातात……….
संध्येला भाष्कराला,
सोडण्याचे दु:ख असते,
क्षणकाल का होईना,
विरहाचे दु:ख असते,
मनाला पक्के माहित असते,
परतून ती येणार आहे,
पण तेवढीही ताटातुटीची,
वेदना नको असते………
आयुष्य देखील असेच असते,
गुंत्यामध्ये गुंतलेले,
घट्ट पकडून ठेबावे,
असे सारखे वाटत असते……..
पण सगळे क्षण असेच,
पकडून ठेवता येत नाहीत,
निसटून जो गेला तो,
परत आणता येत नाही……….
भूतकाळ ओढून ताणून,
माघारी आणता येत नाही,
वेळ एकदा निघून गेली,
कि परत बोलावता येत नाही………
जे जगलो ते क्षण आपले होते,
हेच सांगता येत असते
,
निसटलेल्या क्षणांना पुन्हा,
आपल्याला जगता येत नसते………….
भविष्य असेल फार सुंदर,
असे समजण्यात अर्थ नाही,
भूतकाळाला दोष ठेवण्यात,
नंतर कांहीच अर्थ नाही,
वर्तमान खरा सखा आहे,
घट्ट छातीशी धरू घ्या,
शाश्वत आनंद तोच आहे,
क्षण आताचा मनसोक्त जगून घ्या……….
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
२३-०३-२०२३
रात्री: ००:३४