दिनांक २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केल्या जातो. सर्वप्रथम इसवी सन १९६१ मध्ये ‘युनेस्कोच्या इंटरन्याशनल थियेटर इंस्टीटयूटने हा दिवस जाहीर केला. त्याप्रमाणे पाहिला जागतिक रंगभूमी दिन इसवी सन १९६२ मध्ये साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने १९६२ साली ज्यो कॉक्वूच यांना संदेश देण्याचा पहीला मान मिळाला. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला, यातून सामुदायिक कलावविष्काराला इंग्रजीत ‘थियेटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ असे म्हणतो. नाट्यसंहीता, रंगभूमी, रंगमंच, रंगभूषा वगैरे शब्द याच्याशीच निगडीत आहेत. पूर्वी आजच्या सारखी नाट्यगृहे नव्हती. नंतर हळूहळू बंदिस्त नाट्यगृहे निर्माण होऊ लागली. आज सुद्धा बाली बेटावर (इण्डोनेशिया) स्टेडीयम सारख्या आकाराच्या उघड्या नाट्यगृहात रामायण सादर केले जाते.
‘नाटक’ शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर अनेक शब्द व नावे येतात, संगीत सौभद्र, मृच्छकटिक, मानापमान, अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेंव्हा जाग येते, काळे बेट लाल बत्ती, अंधार माझा सोबती, एखादी तरी स्मितरेषा, ब्यारीस्टर, ती फुलराणी, तो मी नव्हेच, हयवदन, नटसम्राट, वर्हाड निघालय लंडनला, वाडाचिरेबंदी, घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, मी नथुराम गोडसे बोलतोय.
त्याच बरोबर प्रथितयश नाटकारांची नामनिर्देश पट्टीकासुद्धा सरकू लागते, पुरुषोत्तम दारव्हेकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, वसंत कानेटकर, प्रा. विजय तेन्डूलकर, प्रा. मधुकर तोरडमल, अजित दळवी वगैरे.
ह्या सुंदर सुंदर व प्रभावशाली नाटकांना आपल्या अभिनय संपन्नेतेने अजरामर करणारे प्रभाकर पणशीकर, डा वसंतराव देशपांडे, डॉ श्रीराम लागू, डा गीरीस्श कर्नाड, निळू फुले, सतीश दुभाषी, विक्रम गोखले, विमल करनाटकी, डॉ काशिनाथ घाणेकर, बाल कोल्हटकर, फैयाज, रमेश भटकर, रमेश देव, सीमा देव, छोटा गंधर्व, भक्त बर्वे इनामदार, शफी इनामदार, डॉ मोहन आगाशे, शरद पोन्ग्शे, डा गिरीश कर्नाड, रमेश भटकर वगैरे.
तसेच, गायकांच्या परंपरेत छोटा गंधर्व, डा. वसंतराव देशपांडे, फैयाज, शंकर महादेवन, जयमाला शिलेदार, अण्णासाहेब फाटक, जयराम शिलेदार वगैरे. ह्या सर्वांबरोबर महत्वाची बाजू सांभाळणारे डा जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी सारखे अनेक दिग्गज दिग्दर्शक आहेत.
येथे एक महत्वपूर्ण बाब मांडणे अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे अगदी सत्तरच्या दशकात (१९६८ ते १९७३ च्या दरम्यान) जर्मनीमध्ये घाशीराम कोतवाल सादर करणाऱ्या ग्रेट डा जब्बार पटेल व डा मोहन आगाशे हे संपूर्ण मराठी नाटकाच्या इतिहासात एक मनाचा दगड ठरणाऱ्या ह्या घटनेचे शिल्पकार आहेत. सखाराम बाईंडरने तर त्या काळात महाराष्ट्रात प्रचंड मोठे वादळ निर्माण केले होते, नैतिकता व अनैतिकता, कायदेशीर व बेकायदेशीर वगैरे. तसेच मी नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकाच्या निमित्ताने देखील बराच गदारोळ माजला होता. ह्या अशा अनेक सुप्रसिद्ध नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध बनविणाऱ्या अनेक नाटकांबरोबर अभिजात संस्कृत नाटकांच्या महान परंपरेकडे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.
वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच, कोकणातील दशावतारी नाटके, तमाशा, बहुरूपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या माध्यमातून आजची आधुनिक नाट्यकला उदयास आली. ‘नाटयंभिन्नरुचैरजनस्य बहुधाप्येकं समाराधनम् |’ [मालविकाग्नीमित्र-१.४] अशी नाटकाची परिभाषा कालिदासांनी केली आहे. अनेक रुची असणार्या वेगवेगळ्या लोकांचे एकसमयावछेदेकरून (Simultaneously) मनोरंजन करते ते ‘नाटक’. हे वाक्य पुण्याला असणाऱ्या प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात रंगमंचाच्या वरती लिहिले आहे.
नाटकाबाबत भरतमुनी म्हणतात,
‘नानाभावोपसंपन्नं नानावस्थान्तरात्मकम् |
लोक्वृत्तानुकरणं नाट्यधमेतन्मयाकृतम् || [नाट्यशास्त्र: १/१०९]
त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावानुकीर्तनं |
असे कालिदासाने म्हटले आहे.
वैदिक काळात मनोरंजनाची कुठली साधने होती याचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर लक्ष जाते ते वेगवेगळ्या संवाद सुक्तांकडे. अशी जवळपास पंधरा संवादसुक्ते ऋग्वेदात आहेत. इंद्र आणि मरुत्, विश्वामित्र व नदी संवाद, इंद्र आणि वरूण, सरमा आणि पणि सुक्त, यम व यमी सुक्त, वसिष्ठ व त्यांचे पुत्र, पुररवस व उर्वशी सुक्त इत्यादी.
ऋग्वेदातील मंत्रांना सामवेदात “गान” बनविले आहे. सामवेद व अथर्ववेदात नृत्यगीतांचे उल्लेख आहेत.
‘यस्यां गायन्ति नृत्यन्ति भूम्यां मर्त्या व्यैsलवा: |
युध्यन्ते यस्यामाक्रन्दो यस्यां वदति दुंदुभि: || [अथर्ववेद:१२.१.४१]
यावरून, गायन, वादन, नृत्य या सर्व कलांचा उपयोग त्याकाळी मनोरंजनासाठी करत असत. यजुर्वेदात बहुरूप्याच्या कलेचा व ‘शैलूष’ (नट) या संज्ञेचा उल्लेख आहे. महर्षी पाणिनीच्या काळात (इसवीसन पूर्व सातवे शतक) नटाची कला व शास्त्र निश्चितपणे अस्तित्वात होते. याचा अर्थ नाट्याचा उगम पाणिनीपूर्व म्हणजे वैदिक काळाच्या उत्तरार्धात झाला असावा.
संस्कृत भाषेमध्ये ‘काव्य’ ही संज्ञा सर्व प्रकारच्या ललित वांगमयाकारिता वापरली जात असे. काव्याचे प्रमुख दोन प्रकार मानले जातात, ‘श्रव्यकाव्य व दृश्यकाव्य’. महाकाव्य, खंडकाव्य व कथा अशा प्रकारचे ललित वांग्मय जे केवळ ऐकले किंवा वाचले जाते ते ‘श्रव्यकाव्य’ व ज्याचा आस्वाद डोळ्यांनी व कानांनी घेता येतो ‘दृश्यकाव्य’ होय. नाट्य हे दृश्यकाव्य आहे, म्हणून कालिदासाने नाटकाला ‘चाक्षुष क्रतु’ मालविकाग्नीमित्रात म्हटले आहे.[मालविकाग्नीमित्र: १.४].
नाट्यशास्त्राची रचना इसवीसन पूर्व २०० ते इसवीसन २०० या काळात झाली असावी. या ग्रंथाची श्लोकसंख्या ७,००० त्यात नाटकाच्या सर्व अंगांचा सांगोपांग विचार केलेला आहे. ब्रम्हदेवाने रुग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून गीति आणि अथर्ववेदातून रस घेऊन नाट्यवेद तयार केला व भारतास दिला. नाट्यवेदात एकूण सदतीस अध्याय आहेत, परंतु त्या सर्वांचे विस्तृत विवेचन करण्याचा येथे प्रयोजन नाही व विचार नाही.
भरतमुनींनी नाट्यशास्त्रात ‘रूपक’ हा शब्द नाटकाकरिता वापरलेला आहे. ‘रूप’ या संसकृत धातुचा अर्थ ‘पाहणे’ असा आहे. ‘रूप’ याचा दुसरा अर्थ ‘अभिनय’ असा होतो. ‘नाट्य’ ही संज्ञा ‘नट’ धातूपासून उत्पन्न झालेली आहे.
योsयं स्वभावो लोकस्य सुखदु:खमन्वित: |
सोंsगाद्यभिनयोपेत: नाट्यमित्यभिधीयते || [नाट्यशास्त्र:१.१२१]
कवि व नाटककार यांच्या दृष्टीने नाट्य ही कलात्मक पुनर्निमिती असते, तर प्रेक्षकांच्या दृष्टीने तो कलात्मक पुन:प्रत्यय असतो.
‘नेता’ म्हणजे नायक (Hero). नायक हा ‘धीर’ म्हणजे श्रेष्ठ, प्रज्ञावंत, सद्गुंणसंपन्न, सदाचारी, असावा असे संकेत आहेत. धीरोदात्त, धीरललित, धीरशांत आणि धीरोध्दट असे नायकांचे चार प्रकार वर्णिलेले आहेत. नायिका ‘स्वीया’ (नायकाची स्वत:ची पत्नी), ‘अन्या’ (कुमारी), किंवा ‘साधारणस्त्री’ (गणिका) अशा असू शकतात.
रस हा नाटकाचा आत्मा आहे. (प्रा. नरहर कुरुंदकर – रसचर्चा) नाटकाच्या आस्वादातून जो आनंद मिळतो तो मुख्यत: रसामुळेच मिळतो. शृंगार, हास्य, रौद्र, भयंक, बीभत्स आणि अद्भुत असे आठ रस भरतमुनींनी विषद केले आहेत. नववा शांतरस मात्र भारत मुनींना मान्य केलेला नाही.
नाट्यप्रयोगाशी संबंधित अशा एकूण चार वृत्तींचे वर्णन भरतमुनींनी केलेले आहे. त्या वृत्ती आहेत, भारती (पाठ्यप्रधान) सात्वती (अभिनयप्रधान), आरभटी (रसप्रधान) व कैशिकी (संगीतप्रधान) आहेत.
भारत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या अठराव्या अध्यायात सुरुवातीलाच,
वर्तयिष्याम्यहं विप्रा दशरूपविकल्पनम् |
नामत: कर्मतश्चैव तथा चैव प्रयोगत: ||१||
मी आता दहा प्रकारांचे विविध स्वरूप (त्यांची) नावे, व्याख्या आणि त्याचप्रमाणे प्रयोग ह्यांचे द्वारा स्पष्ट करून दाखविणार आहे असे वरील श्लोकात ते म्हणतात.
नाटकं सप्रकरणमंगो यायोग एव च |
भाण: समावकारश्च वीथी प्रहसनं डीम: ||२||
ईहामृगश्च विज्ञेयो दशमो नाट्यलक्षणे |
एतेषां लक्षणमहं व्याख्यास्याम्यनुपूर्वश: ||३|| [नाट्यशास्त्र]
नाट्याच्या लक्षणात नाटक, प्रकरण, अंक, त्याचप्रमाणे व्यायोग, भाण व समयकार, वीथी, प्रहसन, डीम आणि ईहाम्रुग हे दहा प्रकार अंतर्भूत आहेत.
हा निबंध संपविण्यापूर्वी सामान्य वाचकांकरिता भारतातील सुप्रसिद्ध एकूण १३ सुप्रसिद्ध संकृत नाटकांविषयी थोडीशी माहिती येथे नमूद करणे महत्वाचे ठरेल.
०१) भास (ई.स.पू.५वे शतक): प्रतिमानाटक, अभिषेक, दूतवाक्य, दूतघातोत्कच, मध्यम्व्यायोग, पंचरात्र, कर्णभर, उरुभंग, बालचरित, अविमारक, चारुदत्त, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्त,
०२) शूद्रक (इ.स.पू.२रे – १ले शतक): मृच्छकटिक,
०३) अश्वघोष (इ.स.१ले शतक): शारिपुत्रप्रकरण,
०४) कालिदास (इ.स.४थे-५वे शतक): मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय, अभिज्ञानशाकुंतल,
०५) विशाखा दत्त (इ.स.४ थे– ६वे शतक): मुद्राराक्षस,
०६) भट्टनारायण (इस.. ७वे शतक): वेणीसंहार,
०७) श्रीहर्ष (इ.स. ७वे शतक):रत्नावली, प्रियदर्शिका, नागानन्द,
०८) भवभूती (इ.स. ८वे शतक): महावीरचरित, मालतीमाधव, उत्तररामचरित,
०९) मधुसूदन / दामोदर भट्ट (इ.स.९वे शतक): हनुमन्नाटक / महानाटक,
१०) मुरारी (इ.स. ९ वे शतक अनर्घराघव,
११) राजशेखर (इ.स.१०वे शतक):बालरामायण, बालभारत, विद्धशालभन्जीका,
१२) कृष्णमिश्र (इ.स.११वे -१२ वे शतक):प्रबोधचन्द्रोदय
१३) जयदेव (इ.स.१३वे शतक): प्रसन्नराघव
न तज्ज्ञानं न तछिल्पं न सा विद्या न सा कला |
न सत्कर्म न वा योगो नाट्येsस्मिन्न दृश्यते ||
असे ज्ञान नाही, असे शिल्प नाही, अशी विद्या नाही, अशी कला नाही किंवा असा योग नाही की ज्याचे ह्या / नाटकात दर्शन होत नाही.
अभिनवगुप्ताने रचलेल्या नाट्यवेदाच्या ‘अभिनव भारती’ ह्या ग्रंथात अतिशय विस्तृत स्वरूपात नाटकाविषयी माहिती दिलेली आहे. आज जागतिक नाट्य दिनाच्या निमित्ताने हा निबंध एक छोटासा प्रयत्न आहे, आपल्या समृद्ध भारतीय नाट्य संपदेविषयी जाणून घेण्याचा. संदर्भग्रंथ: (१) दशरूपक विधान: प्रा. र. पं. कंगले, महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृत मंडळ, मुबई, प्रथम आवृत्ती- १९७४, (२) भारतीय साहित्यशास्त्र : गं. त्र्यं. देशपांडे, पाप्युलर प्रकाशन, मुंबई, तिसरी आवृत्ती- १९८०, (३) अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास: गोखले वैद्य माहुलीकर, ऋतायन संस्था, मुंबई, द्वितीय आवृत्ती-२०११, (४) संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास: डॉ. विनायक वामन करंबेळकर, श्री. शारदा प्रकाशन, नागपूर, द्वितीय आवृत्ती- १९६३