हिरवी दिसतात सारी शेते,
काळी दिसते रानमाती,
आकाशातल्या निळ्या नभात,
अडकून राहतात सारीच नाती………
जमीन नांगरून तयार आहे,
बी-बियाणे भरपूर आहे,
वाट केंव्हाची पहात आहे,
पाउस कधी पडणार आहे…….
पावसाचे नक्षत्र होऊन गेले,
जीव कासावीस होत आहे,
केंव्हा होईल पेरणी माझी,
जीव खालीवर होत आहे………
कर्ज काढून आणले पैसे,
फी मुलांची भरली नाही,
फटके कपडे अंगावर,
जेवायला दोन वेळ भाकर नाही……..
आज अचानक पाउस आला,
रपरप चांगला पडून गेला,
पेरण्या सार्या उरकून घेतल्या,
जीवात आता भांड्यात पडला………
पण हाय दैवाने घात केला,
पुन्हा अवकाळी पाउस आला,
आली होती छान पिके,
उरले सुरले धुवून गेला…..
पैसे कर्जाचे देऊ कुठून,
पिक नाही अन कांही नाही,
उपाशी पोराबाळांना,
पोटाला अर्धी भाकर नाही……
किती दिवस चालणार असे,
कांहीच मला कळत नाही,
दरवर्षी तेच रडणे माझे,
देव सुध्दा आता ऐकत नाही……..
बंड्या आला धावत पळत,
‘बाबा लिडर आले आहे,
खाकीवाले काका सुध्दा,
त्यांच्या बरोबर आले आहे’……….
बंड्या एवढे सांगून गेला,
टकटक झाली दारावर,
समोर ठाकले पंचमंडळ,
सरपंच तात्या दारावर………
म्हणाले मला बांधावर जाऊ,
तुमचे पंचनामे करून घेऊ,
झालेले नुकसान पाहून घेऊ,
सरकारला पटकन कळवून देऊ……..
जीव माझा हरकून गेला,
जीवात माझा भांड्यात पडला,
पैसा अडका घरात येईल,
सावकाराचे कर्ज फिटून जाईल…..
महिना एक उलटून गेला,
कांहीच कसे झाले नाही,
पंचनामे सरकारला पाठवून,
अडका खात्यात आला नाही……..
लगबग करत धावत गेलो,
ग्रामपंचायत तिकडे भरली होती,
सांगून टाकले एका दमात,
‘पैसे माझे आले नाही,
नुकसान भरपाई मिळाली नाही’………
सरपंच म्हणाले ‘असे कसे?,
पैसे तर येऊन गेले,
खात्यामध्ये जमा होऊन,
खर्च सुध्दा होऊन गेले’…….
मला कांहीच कळले नाही,
ब्यांकेत तर मी गेलोच नाही,
केंव्हां आले पैसे माझे,
अन खर्च कसे होऊन गेले?’…….
प्रश्न माझ्या चेहऱ्यावरचा,
पाहून अक्काबाई बोलून गेल्या,
‘भाऊराव, कळले कसे नाही?
पैसा अडका निघून गेला’………..
विचारले मी, ‘अक्काबाई,
तालुक्याला तर मी गेलोच नाही,
काढला एकही दमडा नाही, आणि
नुकसान भरपाई पाहिलीच नाही’……..
‘असे कसे भाऊराव!’
ग्रामसेवक पुढे आला,
खांद्यावर हात ठेवून म्हणाला,
‘भाऊराव, पैसे तुमचे होते कां?’……
‘नाही नाही माझे नाही,
सरकारने ते दिले होते,
पण खात्यामधून माझ्या,
पाय कसे फुटून गेले?’……….
‘तसे नाही हो भाऊराव,
कर्ज तुम्ही काढले होते,
पैसे परत द्यायचे होते,
भरपाईमधुन सरकारने,
वळते ते करून घेतले.’……
‘मग सांगा तुम्ही भाऊराव,
इमानाला जागणार नाही?
कर्जाची परतफेड करणार नाही?’……..
प्रश्न एकदम बरोबर होता,
गणिताचा फटका मोठा,
शंभर आले, शंभर गेले,
खाली फक्त शून्य राहिले……….
सरपंच म्हणाले, ‘अहो राव !
समजू घ्या हो भाऊराव,
दिले त्यांनी घेतले त्यांनी,
तुमचे त्यात आहे काय?’…….
एकदम खरे बोलून गेले,
ग्रामसेवक अक्काबाई,
सरपंचाच्या साथीने,
साऱ्यांचीच वरकमाई……….
टीव्ही वरती फाडफाड,
बोलत होते दिमाखदार,
‘पैसे तुम्ही दिले नाही,
खोटे तुम्ही सांगता फार’……….
कर्ज दिले पेरायला,
आणि खत टाकायला,
पावसाने वाहून सारे गेले,
भरपाई कर्ज भरायला………
‘झाले सारे फिट्टमफाट,
कशाला मांडता नवा डाव,
दिले त्यांनी घेतले कापून,
व्यवहार सारा झालाय राव’………
मला कांही कळलेच नाही,
पंचनाम्याचे झाले काय,
पैसे खात्यात आले आणि,
परत कसे गेले राव?’
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
२४ मार्च २०२३ / सकाळ: ०८:४८