Marathi

|| मना सावरा रे प्रयत्ने करुनी ||

मन म्हणजे मस्तवाल शक्तीपुंज,
लक्ष लक्ष रश्मीसारखा तळपणारा,
डोळे एकदम दिपवून टाकणारा,
अंतर्बाह्य सारे दृश्यमान करणारा………..

पण मी सांगतो तुम्हाला,
मन खूप खूप हट्टी आहे,
मिरासदारी कांही सोडत नाही,
एकदा आले मनात काही कि,
मग पिच्छा कांही सोडत नाही…………

मन म्हणजे नक्की काय असतं,
परिभाषा करणे फार कठीण,
लोण्याहून असतो स्पर्श मउ,
पण बघा वज्र देखील त्यास,
भेदून जाऊ शकत नाही………….

मनामध्ये नेहमीच सुप्त असतो,
निद्रिस्त प्रचंड असा ज्वालामुखी,
अतृप्त ईच्छांचा तप्त लाव्हा,
सारखा आत खदखदत असतो,
यालाच तर सिग्मंड फ्राइड ‘ईड’ म्हणतो…………

तसे तर ‘ईडचा’ पिता ‘इगो’,
आणि त्याचा पिता ‘सुपर इगो’,
एवढी मोठी उतरंड फ्राइडचा
सिध्दांत मांडत आहे…….

जुंगने प्रयत्न केला थोडा
सप्तकोश समजण्याचा,
पण नाही रुचले इतरांना,
भारतीयत्वाकडे झुकण्याचा………

पण त्याही पूर्वी कित्येक वर्षे,
आदी शंकराचार्य सांगून गेले,
एक विदारक सत्य मनाचे,
थरथर होईल वाचताच,
विदारक सत्य मनाचे………..

मनो नाम महाव्याघ्र:
विषयारण्यभूमिषु |
चरत्यत्र न गच्छन्तु
साधवो ये मुमुक्षव: || विचु-१७८ ||

ज्ञानेन्द्रीयाच्या निबिड अरण्यात,
अनिर्बंधपणे डरकाळ्या फोडत असतो,
महाभयंकर शार्दुल अनिर्बंधपणे वावरत असतो,
त्यालाच आपण ‘मन’ म्हणतो…….

मना सावरा रे प्रयत्ने करुनी,
फिरते सदा ते आसक्त जागी,
न थांबविता त्या ते करेल घात,
सर्वेन्द्रीयांचा समूळ नाश………..

विज्ञान सांगू शकत नाही,
कि मन नक्की कुठे असते,
मेंदूत असते कि हृद्यात असते,
कि अंगभर सगळीकडे असते………….

वैद्यकीय शास्त्र आणि,
मानसशास्त्र थकून गेले,
समुपदेशन कौशल्याबरोबर,
मनोविकार तज्ञ दिग्मूढ झाले………..

पण गीतेत भगवान श्रीकृष्ण,
विभूतीयोगात सांगत आहेत,
‘इन्द्रियाणाम् मनचास्मि’
इंद्रियामध्ये मनात असतो तो………….

अर्थ याचा एवढाच आहे,
महाभारत नेहमी मनात पेटत असते,
आणि पेटलेल्या मनाने मग
सारेच नष्ट होत असते………

देशांमध्ये युद्धे पेटतात,
व्यक्तीव्यक्तीत वाद होतात,
गैरसमजातूनच वादविवाद,
मनातच उत्पन्न होतात………..

ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये
कार्य यांचे सुरु असते,
दोघांचेही नियंत्रण मात्र
अंत:करणच करीत असते………….

अज्ञाताविषयी जाणून घेणे,

हीच जिज्ञासा श्रेष्ठ असते,
शोधमग्न अंत:करण,
हेच तर आपले ‘मन’ असते…………..

हे बघा ! मी नाही सांगत हे,
पातंजली स्पष्ट सांगतात,
विभूतीपाद अध्यायात ते,
हेच तर सूत्र स्पष्ट सांगतात………

सारे सारे ‘मी’ च करतो,
शरीर म्हणजेच ‘मी’ आहे,
अशी भावना निर्माण करतो,
तेंव्हा ‘अहंकार’ जन्म घेतो………..

हे काय आहे आणि ते काय आहे,
सारेच प्रश्न विचारतात की,
मिळणार्या उत्तरांची साठवण,
‘बुद्धी’ करते असतेच कि………….

वेळ येईल तेंव्हा तेंव्हा,
वाटेल गरज जेंव्हा जेंव्हा,
बुध्दीस्त ज्ञान आठवण्याचे,
‘चित्त’ काम करीत असते…….

रागावलेल्या तप्त क्षणी,
बुध्दी सारी लयास जाते,
कारण ‘मनन’ करण्याचे,
ध्यानातून निघून जाते………

‘मनन’ नाही केले म्हणून
अनेक संदेह निर्माण होतात,
समजलेल्या गोष्टी सुध्दा,
‘चिंतना’ शिवाय नष्ट होतात………

‘मनन’ नाही ‘चिंतन’ नाही,
तर ‘क्रोधा’ ला मिळते आमंत्रण,
सुटून जातो ताबा मनाचा,
त्यामुळे अशक्य होते नियंत्रण…………

एकदा कां राग आला,
कि कळतच नाही काय होते,
स्मृतीचीच मग विस्मृती होते,
आणि गोन्धळाचे तांडव सुरु होते…………..

तांडवात तर उच्छेद सारा,
सारे सारे भस्म होते,
होते नव्हते सर्व कांही,
क्षणार्धात नष्ट होते………

मूळ याचे कारण काय,
‘गुण-क्रिया-आकार –उकार’
हे तर कांही शब्द नाही,
शब्दाशिवाय ज्ञान तर,
मुळी मुळीच शक्य नाही……….

काळे गोरे उंच बुटके,
चपटे आणि वेडेवाकडे,
वाईट स्वार्थी दुष्ट अशा
शब्दांनी महाभारत सुरु होते………
देवाला शरण गेला नाही,
तर बुध्दी दिव्य होणार नाही,
मन स्थिर होणार नाही,
आणि स्थिर मनाशिवाय
‘शांती’ नक्कीच मिळणार नाही………..

राग मत्सर सोडल्याशिवाय,
इंद्रिये ताब्यात राहणार नाहीत,
परंतु दमन एकदा झाले कि,
देव पावायचा थांबणार नाही……..

देव एकदा पावला म्हणजे,
‘त्रिविध ताप’ नष्ट होतात,
आणि मन प्रसन्न झाले की,
बुध्दीन्द्रीये स्थिर होतात………

जगामधला आदिग्रंथ,
ऋग्वेद काय सांगतो आहे,
‘समानो मंत्र: समिती समानी
समानं मन: सह चित्त मेषाम |’………

मंत्र आमचा एक आहे,
स्थान आमचे एक आहे,
मन आमचे एक आहे,
चित्त आमचे एक आहे……….

संकल्प आमचा एक आहे,
हृदये आमची अभिन्न आहेत,
आनंदी आम्ही होण्यासाठी,
मने आमची संपन्न आहेत………….

अर्थ याचा एकच आहे,
सारेजण समान आहेत,
राग-द्वेश सोडले तर,
सारे जग एकच आहे………..

विश्वामधल्या अणुरेणुत,
गुणधर्म सारे समान आहे,
रंगरूप जरी भिन्न दिसले,
तरी आत्मा मात्र एकच आहे…………

‘मन’ यावर स्थिर केले कि,
सगळे चित्र स्पष्ट होते,
आत साचलेले मळभ सारे,
वावटळीसारखे उडून जाते……….

आतल्या काळोखाचा विलय झाला,
कि सारे प्रकाशमान होऊन जाते,
नित्यशुद्धबुद्धमुक्त सारेच
चैतन्यमय होऊन जाते……..


मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१३ मार्च २०२३
सकाळी: ११:५८


मार्गदर्शन: (१) सज्ञानसुक्त (ऋग्वेद: १.१९५), (२) पातंजल योगसूत्रे, (३) श्रीमदभगवदगीता, (४) पश्पशांनीकम (५) वेदांतसार आणि (६) विवेकचुडामणी

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top