Marathi

संकेताची भाषा आणि भाषेचे संकेत

मला कल्पना आहे कि हे शिर्षक एकदम जाहिरातीसारखे वाटेल, पण तसे कांहीही नाही. मला कशाचीही जाहीरात करावयाची नाही, कारण माझे कुठलेही प्राड्क्ट नाही. सेवा आहे, पण त्याची जाहिरात करण्याची ही जागा नाही.

हा विषय मनात येण्याचे कारण, परवा ‘एक्रोब्याटीक बनाल प्रोप्रायटर’ [Acrobatic Banal Proprietor (बोरिंग करणाऱ्या कसरती करणारे)] म्हणजे एबीपी माझा या वाहिनीवर एक कार्यक्रम पहात होतो. नाही कुणी असेही म्हणतात कि, ऑल बट पवार (ABP) असे आहे. असेलही कारण, त्या यशवंतराव चव्हाण सभाग्रुहात एका चांगल्या कार्यक्रमात श्री. शरदचंद्रजी पवार व त्यांच्या सुकन्या खा. सौ. सुप्रियाताई पवार सुळे उपस्थित होते. तसेही त्या सभागृहात त्यांच्याविना कर्यक्रम होऊच कसा शकेल म्हणा ! अर्थातच, कार्यक्रम एबीपी माझाचाच होता, त्यामुळे, श्री राजीव खांडेकर असणारच! हं, पण इतर तिघेजण खरोखरच ग्रेट होते हं ! सुप्रसिद्ध सिनेनाट्य कलाकार डॉ मोहन आगाशे, यशस्वी दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल व लोकप्रिय अभिनेते पद्मश्री श्री नाना पाटेकर. निमित्त होते सुप्रासिध्द ‘सिंहासन’ या चित्रपटाला ४४ वर्ष पूर्ण झाल्याचे. ‘मुंबई दिनांक’ ह्या श्री. अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे तो. त्यात मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत. सर्वश्री. स्व. अरुण सरनाईक, सतीश दुभाषी, निळू फुले, नाना पाटेकर, इत्यादी. तर त्या कार्यक्रमा दरम्यान श्री. शरदचंद्रजी पवार यांनी ‘हल्ली राजकारणातील भाषेचा दर्जा खूपच घसरला आहे’ असे फारच विषादपूर्ण उद्गार काढले. ते खरे काय तेच बोलले आहेत यात मुळीच शंका नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे कि, खरे तर राजकारणाचाच दर्जा पार म्हणजे पार रसातळाला पोहचला आहे, खास करून तथाकथित महाविकास आघाडी (मविआ) अस्तित्वात आल्यापासून. कदाचित त्या आघाडीचा जन्म पाप ग्रहांच्या युतीकाळात झाला असेल. ज्योतिषशास्त्र असे म्हणते कि, जेंव्हा दोन किंवा अधिक पापग्रह, जसे राहू, केतू, शनी तीस अंश किंवा त्याहून कमी जवळ येतात, तेंव्हा पापयुती होते व त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतात; असेच काहीसे मविआचे झाले असावे. अभ्यासुनी मविआची कुंडली मांडून पडताळणी जरूर करावी. कदाचित फार मजेशीर निष्कर्ष दिसतील. असो.

आता राजकारणाची व राजकारणातील भाषेचा दर्जा घसरविण्यातील बिन्नीचे सरदार कोण आहेत महाराष्ट्रात हे ही पाहणे आवश्यक आहे. (बिन्नीचे सरदार म्हणजे सैन्यात पूर्वी जे सरदार सगळ्यात पुढे असायचे त्यांना बिन्नीचे सरदार म्हणत असत. त्यावरून कांही लोकांचे आडनाव ‘बिनीवाले’ पडलेले आहे.) सामनाचे संपादक खा. संजय राउत व त्यांचे मित्रवर्य व मालक (मालक याकरिता कि, श्री उद्धव ठाकरे हे सामनाचे मालक आहेत व श्री राउत त्यांचे पगारी संपादक-नोकर आहेत.) मी नावात मुद्दामच स्व. श्री. बाळासाहेव ठाकरे यांचे पवित्र नाव घातलेले नाही कारण, इतक्या ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तीच्या नावाला देखिल अमांगल्याचा विटाळ (अपवित्र स्पर्श) व्हायला नको. असो.

तर श्री. शरदचंद्रजी पवार यांचे अनधिकृत प्रवक्ते खा. संजय राउत व त्यांच्या तोडीस तोड स्पर्धा करणाऱ्या उबाठाच्या उपनेत्या ज्या आधी राकांप मध्येच होत्या, त्यांची भाषा काय दर्शविते? सुसंकृतपणा??!! आणि हो, या दोघांपेक्षाही वरचढ व दोघांवरही कडी करणारे अजून एक आहेत कि, श्री. उबाठा, जे स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे यांच्या नावावर, पितृत्वार, पक्षावर, पक्षचिन्हावर व तथाकथित ‘ठाकरी’ भाषेवर मालकी हक्क सांगतात ! स्व. बाळासाहेब झोम्बणारी, टोचणारी, बोचणारी, खुपणारी अशी वक्रोक्तीयुक्त भाषा जरूर वापरत असत, पण त्यांच्या भाषेला अश्लिल, अपमानकारक व कमरेखाली वार करणाऱ्या भाषेचा गंधही नव्हता. आता त्या ‘ठाकरी’ भाषेच्या नावाखाली ग्राम्य, अश्लिल व अपमानजनक अशी भाषा सर्रास वापरू लागले आहेत महाशय. श्री संजयन राउत यांनी तर भाषेच्या सगळ्या मर्यादा व पातळ्या पार केल्या आहेत. साहित्यात श्लिल व अश्लिल साहित्य असतेच कि. घरात शौचालय असते व आपण सगळेच प्रातर्विधीकरीता त्याचा उपयोग करतो, म्हणून कांही आपण ते शौचालय आपल्या घराच्या बैठकीच्या खोलीत बांधत नाही. ते नेहमी पाठीमागे असते व त्यावरूनच ‘अरसदार’ व ‘परसदार’ हे शब्द रूढ झालेत. अरसात तुळशी वृंदावन असते व शौचालय परसाकडेच असते. ‘उत्तरीय’ पायात नसते घालायचे, ते अंगावर परिधान करायचे असते. नेसण्याचे सोडून डोक्यावर घेतले कि मग लोकलज्जाच रहात नाही. मग ‘मन:पूतम् समाचरेत’ असे होते.

सगळीकडे साथीच्या रोगासारखा पसरलेला तो श्रीमती स्वप्ना पाटकर बरोबरच्या संभाषणाचा ऑडीओ तर निर्लज्जपणाची परिसीमाच आहे. काय म्हणत असतील श्री. राउत यांच्या सुकन्या ती ऑडीओ क्लिप ऐकल्यावर? तोंडात शेण घालत असतील. बाहेर पडल्यावर सर्वांच्या नजरा टाळत असतील. मला माहिती नाही कि श्रीमती स्वप्ना पाटकर यांनी श्री. संजय राउत यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४-अ, ३५५, ४९९ व ५०० अंतर्गत फौजदारी गुन्ह्याची तक्रार दाखल केली किंवा नाही आणि नसेल केली तर मग त्या सदाजागृत महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी स्वत:हून का नाही घेतली त्याची दाखल घेतली व कारवाई केली??? असो.

सांकेतिक भाषा म्हणजे मूक व बधीरांकरिता तयार केलेली भाषा. बरेच वेळा कांही भारतीय व इतर दुसर्या देशातील वाहिन्यावर मूख्य बातमी सांगणाऱ्या किंवा भाषण करणाऱ्या वक्त्याच्या बाजूला सांकेतिक भाषेत मूकबधिराकरीता अनुवाद करणारे आपण पाहिले असतीलच. असल्या घाणेरड्या भाषेत मुक्ताफळे उधळणाऱ्या लोकांची बातमी सांगतांना त्या बिचार्या लोकांची काय अवस्था होत असेल बरे!!! संसकृतमध्ये एक सुभाषित आहे.

अर्थातुराणाम् न सुखं न निद्रा,

कामातुराणाम् न भयं न लज्जा|

विद्यातुराणाम् न सुखं न निद्रा,

क्षुधातुराणाम् न रुचिम् न बेला||

पैशाची हाव असणार्यांना सुखाने झोप लागत नाही, कामातूर झालेल्यांना भीती वाटत नाही व लाज पण वाटत नाही, विद्याप्राप्तीने प्रेरित झालेल्यांना सुखाने झोप येत नाही आणि भुकेने व्याकुळ झालेल्यांना चवीची पर्वा वाटत नाही. याचप्रमाणे, सत्तेला हपापलेल्या लोकांना, ‘सत्तातुराणाम् न भयं न धर्म: |’ हे लागू पडते.

लुटून गेली सत्ता जयांची |

आसने तशी ही गेली तयांची ||

सुख वाहने अन रक्षकांची |||

आता नसे चित्रकांची चकाकी ||१||

तुटले बंध यांचे भाषा विखारी |

झडे का न यांची ललना विषारी ||

अनिर्बंध ललना सुसाटे कशी ही |||

परि भय न लज्जा मिरवी समाजी ||२||

असो. नेहमी सुसंकृत महाराष्ट्राचे दाखले देणार्या यांच्यासारख्या तथाकथित नेत्यांनी नितीमत्ता, सुसंकृत्पणा व संस्कृतीचे एक उदाहरण जरूर लक्षात ठेवावे. ते उदाहरण आहे महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक स्व. पु. ल. देशपांडे यांचे. एकदा पुल व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुनितीताई वस्त्र प्रावरणाच्या दुकानासमोरून जाते होते. तेंव्हा त्या दुकानातील शोकेसमध्ये एका पुतळ्याला नेसविलेली साडी श्रीमती सुनितीताईंना खुप आवडली म्हणून ते दुकानात गेले व दुकानदाराला ती साडी दाखविण्यास सांगितली. दुकानदार म्हणाला, “तुम्हाला पांच–दहा मिनिटे थांबायला लागेल.” पुलनी विचारले, “इतका वेळ कशाला लागतो त्या पुतळ्याची साडी काढून घेऊन दाखवायला?” दुकानदार म्हणाला, “कारण, मला एखाद्या मुलीला ती साडी बदलून आणण्याकरिता पाठवावे लागेल.”

पुल म्हणाले, “बर” व स्वस्थपणे काय होतेय ते पहात राहिले. एक मुलगी त्या पुतळ्याकडे गेली व तिने त्या पुतळ्यासमोरील लोखंडाचे रोलिंग शटर खाली ओढले. नंतर पुतळ्या समोरचा पडदा पसरविला व त्यानंतर दुसर्या साडीचा पदर त्या पुतळ्याभोवती लपेटला व हळूहळू मग आधीची साडी, एक स्त्री बदलते तशी हळुवारपणे बाजूला केली. पुल पहातच राहिले. त्यांनी न राहवून त्या दुकानदाराला विचारले, “हे असे का?”

दुकानदाराने दिलेले उत्तर ऐकून पुल विचारमग्न झाले. तो म्हणाला, “पुतळा असला म्हणून काय झाले? तो स्त्रीचाच पुतळा आहे नं! असे कसे नग्न स्त्रीला पहावे? शोभते का आपल्याला?”

पुल नी विचारले, “ते ठीक आहे, पण ते शटर व पडदा?”

दुकानदाराने दिलेले उत्तर तर खूपच लक्षणीय होते, “सगळ्यांसमोर कोणती स्त्री साडी बदलेल का?” पुलंनी हात जोडले.

कुठे तो तो सुसंकृत दुकानदार अन कुठे त्या श्रीमती स्वप्ना पाटकरला अर्वाच्य, अश्लिल व घाणेरड्या भाषेत शिव्यांची लाखोली वाहणारे बेशरम महाभाग ! जब शर्मकि सभी हदे पार हो जाती है तो शर्मभी शर्माजाती है|  

पुढे जाण्यापूर्वी महाराष्ट्रातील महान संत व छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांनी ‘दासबोध’ या ग्रंथात दुसर्या दशकात पहिल्या समासात असे म्हणतात,

आदरेविण बोलणे | न पुसता साक्ष देणे | निंद्य वस्तु अंगिकारणे | तो एक मूर्ख ||४६||

तुक तोडून बोले | मार्ग सोडून चाले | कुकर्मी मित्र केले | तो एक मूर्ख ||४७||

पत्य राखो नेणे कदा | विनोद करी सर्वदा | हासता खिजे पेटे द्वंद्वा | तो एक मूर्ख ||४८||

होड घाली अवघड | काजेविण करी बडबड | बोलोचि नेणे सुखजड | तो एक मूर्ख ||४९||

हे वर्णन कुणाला लागू पडते हे पुन्हा नव्याने सांगण्याची ह्गाराज आहे का खरोखर??!!! तरीही लक्षत न आल्यास सकाळी सकाळी कुठल्या न कुठल्या वाहिनीवर न चुकता आपले दिव्यज्ञान पाजळणारे महान नेते कोण हे तुम्हाला माहित आहेच की.

कांही लोक तथाकथीत उच्च पद्व्या विभूषित असतात, पण त्यांची अवस्था कशी असते ह्याकरिता पुन्हा एकदा समर्थ रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ याकडे (दशक दुसरा, समास दहावा) वळूया.

आपलेन ज्ञातेपणे | सकळास शब्द ठेवणे | प्राणीमात्रांचे पाहे उणे | तो एक पढतमूर्ख ||७||  

वक्ता अधिकारेवीणे | वगतृत्वाचा करी सीण | वचन जयाचे कठीण | तो एक पढतमूर्ख ||८||

आदर देखोनी मन धरी | कीर्तीविण स्तुति करी | सवेचि निंदी अनादरी | तो एक पढतमूर्ख ||९||

येथार्थ सोडून वचन | जो रक्षून बोले मन | ज्याचे जिणे पराधेन | तो एक पढतमुर्ख ||२८||

ह्या ओळीं कुणाला तंतोतंत लागू पडतात ह्याकरिता स्पर्धा ठेवण्याची काय गरज? कदाचित समर्तांना भविष्य सातशे वर्षानंतर जन्म घेणाऱ्या महाभागाविषयी दुरदृष्टीने दिसले असावे.

एक दोन अजून प्रसंग जे श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या कारकिर्दीतील आहेत. एक आहे महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री श्री. बाबासाहेब भोसले व दुसरे आहेत श्री. रामराव आदिक यांच्या बाबतचे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. स्व. श्री. बाबासाहेब भोसले यांची मानहानी करणारी खोटी बातमी त्यावेळच्या प्रसारमाध्यमांनी पसरविली होती (पुन्हा इथे त्या दोन्ही घटना विस्ताराने लिहिणे म्हणजे हल्लीच्या वृत्तपत्र वाहिन्यांप्रमाणे वारंवार क्जुणाचा अपमान करणे होय. म्हणून ते लिहिले नाही.) नंतर मा. उच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले पण त्या घटनेचा त्यांना किती मनस्ताप झाला. त्यावेळी काय राजकारणाचा व भाषेचा दर्जा उत्तम होता काय? स्व. रामराव आदिकांच्या बाबतीत देखील खोटी बदनामकारक बातमी वर्तमानपत्रात कुणी छापून आणली? या बाबतच्या विस्तृत माहितीकरिता तुम्ही युट्यूबवर जाऊन श्री. अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचा ‘अधोरेखांकित’ या सदरातील १२ एप्रिल २०२३ चा व्हिडीओ पाहू शकता. मी फक्त येथे त्याच सारांश सांगितला आहे.   

मला वाटते ह्या लोकांना असे वाटत असावे कि, कोण इतक्या पाठीमागच्या गोष्टी लक्षात ठेवतो. Afterall public memory is too short. लोकांच्या कुठे इतक्या जुन्या गोष्टी लक्षात  राहतात? असे लक्षात राहिले असते तर मग निवडणूक जाहीरनाम्यातील न पूर्ण केलेली वचने लोकांनी लक्षात ठेवून ढोंग करणाऱ्या खोटारडया तथाकथित लोकांना मतदान केलेच नसते व तसे झाले असते तर केंद्रात व राज्यात कान्ग्रेस्ची सत्ता आलीच नसती; परंतु लोकांची ‘ह्रस्वस्मृती’ (Short Memory) हा कमकुवतपणा ओळखूनच वर्षानुवर्षे यांचे फावत आहे. Public memory is like a personal computer’s Random Access Memory (RAM), which is a temporary memory. It disapperas after a very short time. The selfish leaders understood this weakness of people and exploited it for their own selfish ultimate aim of grabing the power to continue misleading, cheating, duping and exploiting people’s wealth.

मुद्दा असा आहे कि, उगाच त्या एबीपी माझाच्या कार्यक्रमात डॉ. जब्बार पटेल व डॉ. मोहन आगाशे सारख्या मातब्बर लोकांना प्रभावित करण्याकरिता व त्याचबरोबर तो कार्यक्रम पाहणाऱ्या व नंतर त्याची वर्तमान पत्रातील बातमी वाचणार्या वाचकांना भुरळ पाडण्याचा अयशस्वी व केविलवाणा प्रयत्न करणार्यांनी असे मुळीच समजू नये कि, लोक मुर्ख आहेत व त्यांना कांहीच कळत नाही. लोक व मतदार अत्यंत चाणाक्ष, बुद्धीमान व हुशार आहेत. ते कांहीही विसरत नाहीत व आजकाल डिजिटल युगामुळे तर कुठलीही माहिती एका क्षणात उपलब्ध होते, मिळू शकते. त्यामुळे ज्या लोकांचा जन्मही झालेला नव्हता त्यांना पूर्वीच्या घटनांचे संदर्भ सहजपणे उपलब्ध होणे खूप सोपे झालेले आहे. तेंव्हा उगाच सुसंकृतपणाचा खोटा आव आणू नये. ‘ये जो पल्बिक है, सब जाणती है, ये जो पल्बिक है| अंदर क्या है, बाहर क्या है, ये सबकुछ जाणती है|” शेवटी एकच सांगावेसे वाटते कि, त्या महाप्रवक्त्यांनी  त्यांच्या जिभेवर जरा नियंत्रण ठेवावे. तसे झाले नाही तर मग ते यशवंतराव चव्हाण सभागृहातील उद्गार मातीमोल व कवडीमोल ठरतील हे नक्की, आणि जाणत्या नेत्यांना तर ‘त म्हटले की तपेले कळते’, तेंव्हा त्यानं तर विस्ताराने सांगण्याची गरजच नाही.  

जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, वैज्ञानिक भाषा संस्कृतमध्ये महर्षी पाणिनीनी अभद्र व चुकीची भाषा बोलण्याने काय होते हे ‘पाणिनीयशिक्षा’ यामध्ये सांगितलेले आहे.

अवक्षरमनायुष्यं विस्वरं व्याधिपीडितम् |

अक्षता शास्त्रूपेण वज्रं पतति मस्तके ||५३||

दोषयुक्त अक्षर आयुष्याचा नाश करते. स्वररहित शब्दब्रम्ह पाठककर्त्याला रोग्युक्त करते. दोषयुक्त वेदाचा पाठ अक्षय शस्त्र वज्र बनून पाठककर्त्याच्या मस्तकावर पडतो. आता कुणी असा प्रश्न विचारेल कि, महर्षी पाणिनी हे खूप पूर्वी होऊन गेले, आता त्यांचे का ऐकायचे……वरकरणी ऐकायला छान वाटते हे. कधीही जे विपरीत व प्रस्थापित असणार्या विरुद्ध बोलतात, ते चटकन लोकप्रिय होतात व त्यांच्याकरिता लोक टाळ्याही वाजवतात. त्या टाळ्या ऐकल्यावर बोलणार्याला तर अजून स्फुरण चढते व तो मग पूर्वीपेक्षा दुप्पट जोमाने बोलू लागतो. अशा अर्धवटरावांकरिता हा घ्या आणखी एक आधार (अर्थात मानला तर).

जागतिक साहित्यात केवळ ३०० श्लोक व इतर थोडेसे साहित्य निर्माण केलेल्या राजा भर्तृहारीला (इसवी सन पूर्व ५५०) कोण विसरू शकतो. तर भर्तृहारी सुप्रसिद्ध ‘वाक्यपदीय ब्रम्हकांड’ या ग्रंथात म्हणतात,

इदं पुण्यमिदं पापमित्येतस्मिन्पदद्धये |

आचडालं मनुष्याणामल्पं शास्त्रप्रयोजनम् ||४०||

सामान्यपणे माणसाचे रोजचे बहुतेक व्यवहार श्रद्धेने, विश्वासाने चाललेले असतात. खरे बोलणे, दुसर्यास मदत करणे, ती ती धार्मिक अनुष्ठाने करणे हे पुण्यकारक आहे व त्याच्या विरुद्ध म्हणजे खोटे बोलणे, दुसर्यास उपद्रव देणे, ठरलेली धार्मिक कृत्ये न करणे हे पाप आहे. ह्या सर्व गोष्टी अगदी नीचातल्या नीच माणसालाही कळलेल्या व बर्याच अंशी पटलेल्यासुद्धा असतात. आता त्याप्रमाणे प्रत्यक्ष वागणे ज्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे व प्रवृत्तीप्रमाणे होईल. पण पुण्य पापाची कल्पना सर्वांना असती खास. ही कल्पना सर्व लोकांना कशी येते. अपौरुषेय वेद व ऋषींनी तयार केलेले आगम त्यांच्या अभ्यासानेच ते ज्ञान मिळते; पण तो अभ्यास करणारे लोक तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके. ग्रन्थकाराचे म्हणणे असे कि, हा सर्व श्रद्धेचा, विश्वासाचा महिमा आहे. त्याकरिता आपली कुणावर, कशावर श्रद्धा ठेवण्याची तयारी असावी लागते; कुणावर तरी विश्वास ठेवायला लागतो.     

श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना

नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम् |

धर्मस्य तत्वं निहितं गुहायां

महाजनो येन गत: स पन्था: ||

थोडक्यात काय तर, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकहितार्थ खर्ची घातले व आपल्या अथक प्रयत्नातून ज्ञानाची भांडारे उपलब्ध करून दिली,  त्यांच्या त्या ज्ञानाच्या आधारे सर्वसामान्य लोकांनी वागावे अशी अपेक्षा आहे. त्या करिता, जे लोकविपरीत वागतात त्या सर्वाना देव मंगल, सुसंकृत व सभ्य भाषा वापरण्याची सद्बुद्धी देवो व क्षमा करो.     


(c) मुकुंद भालेराव,
छत्रपती संभाजी नगर
२५ एप्रिल २०२३
सायंकाळी: १८:२५

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top