My Stories

ब्रम्हदेवाचा मला फोन आला

अहो खरच सांगतो, मला ब्रम्हदेवाचा फोन कॉल आला काल.

“ह्यालो ! नमो नम: मुकुंद महोदय: |”

“नमो नम: |” मी

“भवत: कथं अस्ति?” पलीकडून आवाज.

“अहं कुशलं|” मी

“अहं संस्कृतं किंचीतम् जानामि| तुम्ही मराठीत बोला नां” मी म्हणालो.

“बर मला सांगा..” तिकडून आवाज आला.

“अहो, पण तुम्ही कोण बोलता व कुठून बोलता?” माझा प्रश्न.

“मी अंतरिक्षातून बोलतो” उत्तर आले.

“अंतरीक्ष ! पण असे कोणते शहर किंवा गांव नाही….”

“हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझा दूरध्वनी क्रमांक पहा म्हणजे कळेल तुम्हाला” मला उत्तर मिळाले.

मी पाहिले तर क्रमांक दिसला पण तो क्रमांक विचित्र होता. विचित्र म्हणजे कल्पनातीत व वेगळा होता.

तो क्रमांक होता…..”ओम ++०० ००० ००० ००”

मी बुचकळ्यात पडलो. कुठला व हा असा कसा क्रमांक आहे हा! खूप शोध घेतला गुगलवर, अगदी नवीन च्याट जीपीटीला पण विचारले, पण कुठेच उत्तर मिळाले नाही. तितक्यात पलीकडून प्रश्न आला.

“पाहिलास का माझा क्रमांक?”

“हो, पण असा क्रमांक कुठल्याही देशाचा व शहराचा नाही प्रभो” मी.

“अगदी बरोबर आहे. मी आधीच सांगितले नां कि मी अंतरिक्षातून बोलत आहे म्हणून.”

मी त्यांना मध्येच थांबवीत विचारले, “म्हणजे विश्वनियंते ब्रम्हाजी तुम्हीच आहात तर?”

“हो वत्सा, तोच तो मी आहे.”

आता मात्र माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. का बरे त्या जगद्नियन्त्या परमपरमेश्वराने माझ्यासारख्या सामान्य पामराला फोन केला असेल बरे !

“अरे खरच सांगतो. हवे तर हा कॉल कट करून तू मला व्हिडीओ कॉल कर म्हणजे तुझी खात्री पटेल, कारण तू तुझ्या भ्रमणध्वनीच्या पडद्यावर मला पाहू शकशील. अरे खरच कर तू कॉल.”

मी तो क्रमांक पुन्हा एकदा पाहिला व मनात म्हटले चला खरच करून बघू व्हिडीओ कॉल. पण मनात विचार आला कि, जर क्रमांक चूक असेल तर? कारण कोणत्याच मोबाईल क्रमांकामध्ये ओम व सर्व शुन्य नसतात. मी तो क्रमांक फिरविला (म्हणजे माझ्या मोबाईल वर ओम टाइप करून सर्व शून्य स्पर्श केले…….अन काय आश्चर्य ! माझ्या फोनच्या स्क्रीनवर चक्क ब्रम्हदेव दिसू लागले.

“आता पटली का खात्री?” त्यांनी प्रश्न विचारला. नाही म्हणायला कांही कारणच नव्हते मला.

“प्रभू! ही कसली लिला? तुमच्या हातात तर फोन नाही. तुम्ही अंतरिक्षात आहात, तुमचा क्रमांक पृथ्वीवरील क्रमांकासारखा दहा आकडी पण सगळे शून्यच, फक्त सुरुवातीला ओम आहे?” मी बोलून गेलो.

“हो वत्सा ! ते सगळे सोड. तू एक पुण्यात्मा आहेस म्हणून मी तुला दूरध्वनी केला रे. माझे एक काम आहे तुझ्याकडे. करशील कां?”

“माझ्याकडे?” मला धक्काच बसला ते ऐकून. ब्रम्हदेवाचे माझ्याकडे काय बरे काम असेल असा मी विचार करत होतो….

“मला एक प्रश्न पडलाय वत्सा. मला माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून असे कळले आहे कि, भारत देशात महाराष्ट्र प्रांतात फारच अशांती व घोर अन्याय होत आहे, विरोधी पक्षांवर. काय हे खरे आहे कां?”

“प्रभू, तुमचे विश्वसनीय सूत्र म्हणजे महर्षी नारदच असणार, पण ते असे कांहीही सांगणार नाही हे नक्की. बहुधा नारदांनी ते मर्यांदित प्रति छापत असलेले व अल्प वितरीत होत असलेले संघर्श अशा अर्थाचे हास्यवृत्तपत्र वाचले असणार. तिथे एक महर्षी नारदाची भ्रष्ट नक्कल करणारे आहेत.” मी सांगितले.

“वत्सा, ते दशग्रंथीब्राम्हण वगैरे आहेत कां?” ब्रम्हदेवाने विचारले .

“नाही हो प्रभू, ‘ब्रम्ह जाणणारा ब्राम्हण’ या अर्थाने तर मुळीच नाही.” मी उत्तर दिले.

“बरे त्यांनी वेद, उपनिषदे, पुराने, षडदर्शने यांचा अभ्यास तरी केलेला असेल ना?” ब्रम्हदेवाने विचारले. त्यांना खोटे कसे काय सांगणार ना.

“नाही हो प्रभू. मला तसे वाटत नाही.”

“अरे हो, तू उत्तर देत असतांनाच महर्षी नारदाने मला एक संदेश पाठविला कि त्यांनी ते हास्यवृत्तपत्र वाचूनच मला माहिती दिली आहे. वत्सा तुझा कयास खरा ठरला आहे.”

“प्रभू, मला वाटलेच होते. सावध व्हा. ते कादाचित एखादी वृत्तवाहिनी तिकडे अंतरिक्षात सुरु करतील तुमच्या नकळत…..” मी माझी भीती व्यक्त केली.

“पण ते इकडे अंतरिक्षात कसे पोहचतील?” ब्रम्हदेवाने प्रश्न केला. त्यांचा प्रश्न संयुक्तिक होता.

“प्रभो, एक अमेरिका नावाचा देश आहे. तिथे एक धवलरंगी इलोन मस्क नावाचा गृहस्थ आहे. त्याच्याकडे अवकाशयान आहे. त्याच्या मदतीने ते येऊ शकतात.” मी मोठ्या विश्वासाने सांगितले.

“कोण आहे तो संपादक? नाव काय?” ब्रम्हदेवाला आता फारच उत्सुकता लागली होती जाणूण घेण्याची.

“प्रभो, आपल्या सनातन धर्माप्रमाणे, ‘अवहकडा’ चक्राप्रमाणे, त्यांचा जन्म पूर्वभाद्रपदा नक्ष्त्रामधील द्वितीय चरणावर झला असावा असे मला वाटते. त्यामुळे कदाचित त्यांचा स्वभाव उग्र व गुण क्रूर आहे. हे सर्व मी अंदाजाने सांगत आहे, कारण, नक्षत्र चरणाक्षर “सो” आहे.”

“म्हणजे संजय, सोमनाथ, असे कांहीसे असणार नाव त्यांचे.” ब्रम्हदेवाने कयास बांधला.

“हो प्रभू, बरोबर आहे तुमचा कयास……पण हा तुमच कयास आहे. मी पण वर जे सांगितले आहे, तो देखील माझा अंदाजच आहे.” मी म्हणालो.

“वत्सा, पण दिव्यदृष्टीचा संजय तर द्वापार युगात होऊन गेला.” ब्रम्हदेवांचे म्हणणे बरोबर होते.

“हो प्रभू, ते तर खरेच आहे. पण म्हणून काय कलियुगात तशा नावाचा अन्य कुणी होऊ शकत नाही काय?”

“नाही तसे नाही, पण मी कलियुगात तर कुणाला अशी दिव्यदृष्टी देण्याचे नियोजन केलेलेच नव्हते…..” ते विचार करू लागले.

“पण प्रभू ! महर्षी व्यासांनी, श्रीमदभागवत या महान ग्रंथात १२व्या स्कंधात २ र्या अध्यायात असे लिहून ठेवले आहे कि, कलियुगांत…..” मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण ब्रम्हदेवाने मला मध्येच थांबविले.

“ते सर्व मला माहित आहे रे……..पण माझ्या नकळत असा कसा काय कुणी दिव्यदृष्टी असण्याचा दावा करीत आहे?” ब्रम्हदेवाला शंका आली. ते मला म्हणाले, “थांब जरा मी त्या एसीपी प्रद्युम्नला सांगतो तपास करायला, मला वेळ नाही म्हणून, नाही तर मी शोध घेतला असता रे.”

“प्रभो तुम्ही एसीपी प्रद्यूम्न म्हणालात?” मी भाबडेपणाने प्रश्न विचारला.

“हो रे, ते सीआयडीवाले……तेच ते….ते नाही का म्हणत, ‘दया कुछ तो गडबड है|’ अरे व्वा! ब्रम्हदेवाचा जीके फारच अपडेटेड आहे. मला कौतुक वाटले व स्वत:चीच लाज वाटली कि, ब्रम्हदेव अंतरिक्षात असून पृथ्वीवरील सर्व गोष्टी त्यांना अद्ययावत माहिती आहेत व मी पृथ्वीवर रहात असून मला मात्र माहिती नाही.

“प्रभू, कुठे ते द्वापारयुग अन कुठे हे कलियुग! मी विचार करतोय कि कसे काय महर्षी व्यासांना पुढच्या ५००० वर्षानंतरचे आधीच कळले कि, कलियुगात असे होणार आहे म्हणून. “प्रभो, मला एक प्रश्न पडला आहे. विचारू का?”

“विचार वत्सा, जरूर विचार.” “त्या सप्तचिरंजीवांपैकी महर्षी व्यास कुठे आहेत व कोणत्या स्वरूपात आहेत आता? भारतात आहेत कि अन्य कुठे वा अन्य कोणत्या ग्रहावर आहेत?”

“का बर? तुला महर्षी व्यासांचा ठावठिकाणा कशाकरिता हवा आहे?”

“मला त्यांना विचारायचे आहे कि, त्यांच्या दिव्यदृष्टीप्रमाणे हा ‘महाविकाससमूह’ टिकणार कां व किती दिवस टिकेल?”

“ही काय समस्या आहे वत्सा?” ब्रम्हदेवाने विचारले.

“प्रभो, तुम्हाला माहीत नाही! असे कसे काय शक्य आहे!” मी.

“वत्सा, मी तर कलियुगाचे कोन्फिगरेशन वेगळे केले होते. त्याचे आर्किटेक्चर  कुणी बदलले? कलीने माझा चोरला कि काय…” ते विचारमग्न झाले.

“प्रभो, त्या कलीच्या घरी रेड करा तुम्ही…….” मी माझे दिव्यज्ञान पाजळले.

“रेड म्हणजे काय असते वत्सा?” ब्रम्हदेवाने विचारलेच .

“म्हणजे अचानक घरात घुसून घराची तपासणी करणे.” मी आनंदाने माहिती पुरविली.

“त्याने काय होईल?” ब्रम्हदेवाला प्रश्न पडला.

“कलीला जर का त्या आधुनिक संजयाने सुवर्ण मोहरा आर्किटेक्चर बदलण्याकरिता दिल्या असतील तर कळेल, पण आधी तुम्ही तुमचा पासवर्ड बदला.” मी अगदी ज्ञानवंताप्रमाणे आत्मविश्वासाने सल्ला दिला.

“बर बर…चल मीच देतो तुझ्या प्रश्नाचे उत्तर…..नाही टिकणार फार काळ” त्यांचे उत्तर.

“पण असे कसे काय म्हणता तुम्ही? त्यात तर दिव्यज्ञानी व जाणते पंडित आहेत?” मी भाबडेपणाने प्रश्न केला.

“अरे बाळा, तुला नाही कळणार दैवाची गती…….अरे शुभ ग्रह असले तरी, जर का ते पापग्रहांच्या कात्रीत सापडले तर ते शुभग्रह सुद्धा अशुभ फळ देतात…हे त्या शुभ ग्रहांना माहित नसते बऱ्याच वेळा.” ब्रम्हदेव.

“ओके ओके….कळले आता…..प्रभो, आता शेवटचा प्रश्न विचारतो. देवेंद्र तुमच्याकडे इतर देवांना घेऊन ‘त्राहीमां त्राहीमां’ असे म्हणत आले होते का?”

“नाही रे, मग तुम्ही कशाला टेन्शन घेता प्रभो? तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यातच आहे…..सगळीकडे शांतता आहे व राहील.” मी

“असे आहे होय….चल मी जातो….मला भगवान विष्णूची प्रार्थना करायची वेळ झाली. पुनर्मिलाम: |” असे म्हणून ब्रम्हदेवाने तो कॉल थांबविला.

इति युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जंबूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे द्वारकापीठस्यआग्नेयदिशे सिंधूसागरस्यपूर्वतटाके  महाराष्ट्रप्रदेशे वाचालवाणीपुरुषस्य अगाधलिला अध्याय समाप्त: | 

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top