चिंब होती रात्र तेंव्हा
चंद्र नव्हता साक्षीला
घनदाट होती रात्र सारी
श्वापदांची घनगर्जना……..
कुणीच ते नव्हते तिथे
आवाज ही ना ऐकला
घनगर्जनाच तितुक्या
होत्या तिथे त्या म्हणाया……..
चाललो किती मी तिथे
ना उमगले मला ते
पावलागणिक दिसल्या
जातीच वासुकींच्या…….
भय दाटले मम मानसी
पायात कंप जाहला
झालाच कंठ शुष्क ऐसा
आठवे हरी मनाला…….
वाचेवारी तयाचे
ते नाम सतत येऊ लागले
आत्मबळ एकवटुनी
पाय चालू लागले………
प्रगटला प्रकाश इतका
लख्ख माझ्या भोवती
वलय सभोवती प्रगटले ते
दिव्य सारे वनांतरी……
दिसली तिथे गौर युवती
तेज तळपे मुखावरी
आभूषणाची प्रभा विलसली
नयनात माया दाटली…….
मुग्ध झालो स्तब्ध झालो
शब्द विरले अंतरी
‘मीच येथील रातराणी
नेईन तुजला दिशांतरी’……..
स्पर्शता तो हस्त माझा
कांहीच ना कळले मला
जाहले जे अगम्य सारे
काय सांगू मी तुम्हा………
स्वप्न होते वा सत्य ते
थांग ना मज लागला
दिव्य होते लावण्य कैसे
मती कुंठली पण तेधवा…..
© मुकुंद भालेराव
16-05-2023 / सकाळ : 11:3