सुचले न कांही मजला
रुचले न कांही मजला
का वाटले तसे ते
कळले मला न तेंव्हा……….
रानात वाट गेली
वाटेवरी निघालो
गेली कुठे ती वाट
न कळले तरीही गेलो………..
होते निबिड अरण्य
नाही कुठे कवडसा
रानात वाकडी ती
दिसली न वाट तेंव्हा…………
दिसली पलाशपुष्पे
त्या गर्द उंच रानी
परि दिसला रवि न तेथे
भय वाटले मनीही……..
दिसली दुरून छाया
त्या क्रूर श्वापदांच्या
थरकाप तो उडाला
आक्रोश मुक्या जीवांचा………..
कळले न काही मजला
आधार ना कुणाचा
धावत तसा निघालो
शोधा आधार तेंव्हा…………..
तितक्यात ते चमकले
ते क्रूर क्रुद्ध डोळे
तेंव्हा कुठे लपावे
कळले मला न कांही……….
मुखी नाम मग हरीचे
आळवीत त्या हरीला
झ्रुद्यात कंप झाला
नव्हता मुळी भरवसा…………
मिटले तसे मी डोळे
भीती मनात येता
झेपावला तो व्याघ्र
माझ्याच त्या दिशेला…………
आकांत तो करुनी
अंतास पाहिले मी
एका क्षणात आले
कांहीतरी कुठूनी…………
कानात धुमसला तो
चित्कार शार्दूलाचा
कळले मला न कांही
‘वत्सा!’ आवाज आला……..
मृदू शब्द फक्त दोन
प्रेमात भिजुनी आले
एका क्षणात चित्त
मम शांतशांत झाले………
‘आता उघड डोळे!’
आले कुठूनी शब्द
कळले न तेधवा ते
मी जाहलो नि:शब्द………
नयनास उघडता मी
दिसले प्रसन्न रूप
स्मितहास्य ते हरीचे
केले मलाच विमुक्त………..
झुकवून शीश माझे
मी वंदिले हरीस
उघडून नेत्र युगला
पाहण्या सगुण रूप…….
परि उघडताच डोळे
कोठे निघून गेला
मम ओंजळीत दिसले
ते तुलसीपत्र तेंव्हा………
मुकुंद भालेराव
दिनांक: ०७-०६-२०२३
सकाळी: १०:४६