आजच कळले मला असे
तुझा जन्मदिन उद्या आहे
सर्वच मोठ्या लोकांचे असे
दोन तिथीचे मतभेद आहे ..
असू देत असू देत तू
कांहीच त्याला हरकत नाही
आज सदिच्छा दिल्या म्हणून
उद्या थोडीच देता येत नाही…….
तूला सांगतो पल्लवी मी
आपण दररोज नवीन होत असतो
लक्ष लक्ष सूक्ष्मकायाकोश१
नित्य नवा होतच असतो………
कांही लोक विवाहोत्तर प्रतीमास
विवाहदिन साजरा करतात
मग तुझा जन्मदिन असाच उद्या
साजरा करू आनंदात……..
कणात वायुच्या भरून आम्ही
येऊ विहरत त्यात काय
दिसलो नाही डोळ्यांनी
त्यात एवढे फार काय……
विश्वास ठेवून हृदयावर तू
मिटून डोळे क्षणकाल पहा
दिसू तूला सर्व आम्ही
स्मिताची कविता पहा…….
राधेसारखी भक्ती असली
की कृष्ण मुकुंद जवळ असतो
स्नेहाचे तुषार देखील
आनंदघन उधळत असतो………
चित्तवृत्ती सदा प्रफुल्लित
अशाच तुझ्या राहू दे
अक्षय तुझे सदा अबाधित
सौभाग्य मंगल राहू दे……..
अखंड तुझ्या मनी रमो
हरी अभिराम निशीदिनी
यशकल्याण धनसंपदा
अविरत बरसो प्रतिदिनी……..
प्रतिपश्चन्द्रासरिखा२ बहर
आयुष्यात तूझ्या येत राहो
कलेकलेने वाढत वैभव
अविश्रांतपणे मिळत राहो………
आयुष्याचा प्रत्येक क्षण
आनंदाचा उत्सव आहे
आप्तस्वकीयांचे आशीर्वचन
मंगलपाठक३ मी आहे……..
स्वस्तिवाच्य४ काव्यार्थ रे
प्रभो ददातु प्रतिभा नवी
सदा शुद्ध चित्तात माझ्या
सत्यराधस्५ वचन पल्लवी…….
© मुकुंद भालेराव
२७ जून २०२३
सायंकाळ: १८:०८
१) सूक्ष्मकायाकोश = शरीरातील लहान पेशी
२) प्रतिपश्चन्द्रासरिखा = प्रतिपदेच्या चंद्रासारखा वाढत जाणारा / जाणारे
३) मंगलपाठक = मंगल आशिर्वाद देणारा
४) स्वस्तिवाच्य = आशीर्वादाचे उउच्चारण करणारा
५) सत्यराधस् = यथार्थ आशीर्वाद देणे