पाहता वरती गवाक्षात त्या,
दिसला ना अभिराम तिथे,
ऐसे आता घडले कैसे,
अभिराम आहे आता कुठे…….
हसरा त्याचा चेहरा सुंदर
हलवीत त्याचा हात असे,
‘येतो येतो’ शब्द बोबडे,
सुंदर मोहक रूप असे……..
गोव्यामध्ये तिथे कसा तो,
दंगा-मस्ती करत असेल,
रिमझिम पाउस नभामधुनी,
‘येरे येरे पावसा’ म्हणत असेल……
वाटे मजला पुन्हा फिरुनी,
बरसत याव्या जलधारा,
सवे घेउनी अभिरामाला,
अभिषेक तो पुन्हा हवा……
क्षणात रिमझिम क्षणात किरणे,
सर्व विसरुनी मन मोहरले,
अचपळ उधळीत फुले वायुनी,
आनंदाने मन रमले…….
हातामध्ये हात घेउनी,
पाउस बरसत यावा तो,
नाचू आम्ही मिळूनी दोघे,
मेघा राग तो गावा तो……..
आनंदाचा उत्सव ऐसा,
मनी फुलावा रंग असा,
माधुर्याने अळवीत अवघा,
जीवनाचा तो राग नवा…….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
११ जुलै २०२३
दुपारी: १४:१९