असे कधी होते का
आशा सगळ्या संपतात का?
‘मुळीच नाही’ उत्तर आहे
जीवन यालाच म्हणतात का?
चेतनेचा शरीरामध्ये
निवास कायम असतो का?
‘हवे मज’ हाच अट्टाहास
असाच कायम राहणार कां?
हे बरे कि हे खरे
शाश्वत जीवनाचा प्रश्न आहे,
जीवनाच्या प्रत्येक आश्रमामधील
हाच अनुत्तरीत प्रश्न आहे?
उपरती नक्की काय असते?
आशा जगण्याची सोडायची असते?
इतिकर्तव्ये सोडून सारी
पळून आपण जायचे असते?
शास्त्रांनी मार्ग ठरविलेला आहे
चार आश्रम सांगितले आहेत,
कुठला तरी सोडून मधेच
पळून आपण जायचे असते?
तत्वज्ञान सांगते कि,
जग सारे मिथ्या आहे,
पण श्वासोश्वास तर निरंतर
हे देखील तर एक सत्य आहे…….
वारंवार फिरणे नको
जन्म चौर्यांशी घेणे नको,
वेद उपनिषद पुराने सारी
उपदेश एकच ‘नको नको’………
नसण्यामध्ये असणे कसले
असण्यामध्ये नसणे का?
प्रश्न अतर्क्य हा गुढ जगाचा
उत्तर कुणी देईल का?
प्रश्न अनंत हे विश्वामध्ये
कित्ती उत्तरे शोधावी?
अनंत आहे शास्त्रवेद ही
गाथा आहे जगण्याची……..
वानप्रस्थ अन संन्यासाचा
मार्ग खचित हा सांगितला,
‘गृहस्थ’ मध्ये विश्रांतीचा
सत्य नसे का सांगितला?
ईश प्राप्तीचा मार्ग एकला
‘संन्यास’ हा सोपान असे?
विश्व निरंतर पुढे चालण्या
काय करावे कुणी बरे?
वंश वृध्दी हि एक निरंतर
विश्वाचा आधार नसे जर,
विमुक्त करण्या आत्म्याला ते
मार्ग कोणता अन्य बरे?
संन्यासाला नकोच वाटे
वंशाची ती ओढ नसे,
एक जीवाला ध्यास असे तो
हरी वलयाचे स्वप्न असे………
धारण करतो जीवसृष्टीला
‘धर्म’ तयाचे नाव असे,
समाजकार्ये अविरत करण्याला
‘गृहस्थ’ आश्रम नाव असे………
तर्कसुसंगत शास्त्र मार्ग ते
चार सुसंगत आश्रम ते,
मध्येच नाही सोडून जाणे
कर्तव्याला सोडून ते………..
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१७ जुलाई २०२३
सकाळी: ०७:४१