Marathi

मनात माझ्या दीप फुलावे………

जावे ऐसे वनात हिरव्या
रिमझिम पाऊस येतांना,
डोंगरमाथा सचैल ओला
पायी निर्झर वाहताना………

जिकडे तिकडे पाउस यावा
टपटप गाणे थेंबांचे
गर्जत यावा मेघ नभीचा
गाणे गावे मेघाचे…………

चमकत यावी प्रकाश किरणे
बरसत पाणी मेघाचे
लख्ख प्रकाशी चहुबाजुनी
मंगल गाणे वायूचे…………

खळखळ खळखळ वाहत जावो
निर्झर ऐसा बाजूने
हळूच पसरो मोर पिसारा
पावा वाजो वायुने…………

लयास जावो चिंता सार्या
आनंदाचे मळे फुलावे
कवेत घेउनी निसर्ग सारा
नभात सारे रंग भरावे……….

तिथल्या पर्वत काताळावरी
योग्या सरिसे शांत बसावे
मूकपणाने मूक मनाने
अवनीचे ते रूप बघावे………..

बरसत याव्या सरी तरीही
चिंब भिजावे धारांनी
पृथ्वीचा तो गंध मनोहर
भरून घ्यावा गात्रांनी…………

आकाशी मग रंग मुलायम
मावळतीचा रंग भरावा,
गोधुल विहरत आकाशी मग
मंगल बरवा मेघ दिसावा………..

हळूच इवले चंद्रबिंब ते
आकाशी ते उदित व्हावे,
क्षणात अगणित नभी तारका
मनात माझ्या दीप फुलावे………


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१२ जुलै २०२३
दुपार: १६:४६

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top