Marathi

दशोदिशांना मंगल सूक्ते

आज नवी, सकाळ झाली,
आशेची, पहाट झाली,
वार्यावरती, आनंदाने,
भरलेली, वरात आली……

जयच्या, जयजयकाराने त्या,
दशोदिशा त्या, रंगीत झाल्या,
अनंत साऱ्या, बालपणीच्या
स्मृती पुन्हा त्या, जागृत झाल्या ……..

विद्याभ्यास, तो करतो छान,
असे बुद्धीचे, चातुर्य महान,
आता कुळाच्या, किर्तीलाही,
प्रज्वलित तो करेल महान……

पाहता पाहता, झाला मोठा,
बोल बोबडे, बोलत होता,
अस्खलित तो बोलतो असतो,
विचार आपले मांडतो असतो……..

कलाकृति ती, अंगामध्ये,
अशी रुजविली, परिश्रमाने,
संगीताशी, सोयरिक ती,
केली आहे, दिव्य मनाने………

शिकायचे अजून, खूप आहे,
अंतरीक्ष त्याचे, लक्ष आहे,
गवसणी ऐशी, आकाशाला,
निश्चित तो, घालणार आहे……….

कृत्रिम यांत्रिक, मनुष्य याचे,
वेड त्याला, लागले आहे,
बुद्धी आणि, कलेची त्याला,
उपजतच, ओढ आहे……..

जान्हवीच्या, किनार्यावर,
आश्रम त्याचा, स्थिर आहे,
आय आय टी, रुरकी,
हेच त्याच्या, गुरुकुलाचे नाव आहे……..

स्वप्न त्याची, अनेक आहेत,
ध्यास मात्र, एकच आहे,
विचार आहेत, तर्कसुसंगत,
आशेचा एक, प्रवाह आहे………

देवभूमीच्या, सान्निध्यात
विद्यार्जन, करणार आहे,
पवित्र, गंगामाई जैसे,
मन प्रवाही, होणार आहे………

नगाधिराज, हिमालयाच्या,
छायेमध्ये, राहणार आहे,
धवल त्याच्या, रुपासारखा,
तेज:पुंज, होणार आहे………

संकल्प तो, मनात त्याच्या,
आता दृढ, झाला आहे,
ध्येय-लक्ष ते, एकच आहे,
सुवर्णपदक, नक्की आहे…….

आशिर्वाद, त्याच्या पाठीशी,
पिता प्रपिता, पितामहीचे,
माता मातामह, मातामहीचे,
त्याच्यासाठी, एक उर्जा आहे…….

उचै:श्रवा तो, ज्ञानकणांचा
मिळेल त्याला, भाग्याने,
अश्वमेध तो, ज्ञानाचा मग,
अवकाशाच्या, वाटेने…….

वेग मनाचा, अफाट घेउनी,
निघेल आता, अश्वमेध तो,
जिंकून घेईल, अनंत शिखरे,
यशोकीर्तीची, स्वाध्याये…………

भगीरथाच्या, अथक प्रयत्ने,
पापहरिणी, अवतरली,
पूर्वजांच्या, पुण्यात्म्यांना,
पवित्र केले, कर्मांनी ……..

असेच घडवील, प्रयत्न करुनी,
जयजय होईल, ज्ञानाचा,
मन:शक्तीच्या, साक्षात्कारी,
जय नामाची, ध्वजापताका…….

‘जय’ नावाचा, इतिहास जसा तो,
विश्वामध्ये, अमर असे,
कलीयुगातील, जय आमचाही
विज्ञानाचे, स्वप्न असे……

लक्ष त्याच्या, मनामधे ते,
दिव्य असे, चैतन्य दिसे,
लक्षलक्ष ते, ज्ञान सूर्यही,
अखंड ज्योती, दिप जसे……..

पृथ्वीचा, गंध मिळो अन,
वायूचा तो, स्पर्श मिळो,
अवकाशाच्या, आधारासह,
अग्निचे, आशिर्वाद मिळो………

नभामध्ये, तारका करतील,
एक मनोहर, संगीतिका,
गंधर्वांचे, सामगान आणि
ऋत्विजांच्या, मंत्रऋचा………..

अप्सरांना देखिल मोह होईल,
नृत्यनाट्य ते करण्याचा,
पृथ्वीतलावर मोह्वील तो,
जयचा जयजय करण्याचा………

आनंदाची, पहाट ऐशी,
एक दीपावली, तेजाची,
अवकाशाला, अशी गवसणी,
‘जय’च्या, स्वप्नील यानाची………..

कुसुमे हाती, घेतील सारे,
देवदेवता, ऋषीमुनी,
प्रसन्न होतील, योगिनीही त्या
मंगलतेची, नवी पर्वणी……….

दशोदिशांना, मंगल सूक्ते,
होतारांच्या, साक्षीने,
ज्ञानवेदीवर, उच्चरवाने
तपज्ञानाचे, मंत्र नवे……..

प्रसन्न चित्ती, हर्ष मानसी,
आनंदाचे, सुक्त नवे,
दोन कुलांच्या, प्रतिभेचे मग,
फुलतील अगणित, दीप नवे………


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१६ जुलाई २०२३
सकाळ: ०७:४६ / संध्याकाळ: ०७:५७

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top