दादा अशी साद देखिल
घालायचे राहुन गेले,
खूप होती स्वप्न मनात
सारे सारे राहुन गेले……..
रानातल्या कविता मनात
स्थिर घर करुन राहील्या,
रानामधल्या तुमच्या प्रतिमा
स्वप्नामध्ये अनंत झाल्या…….
वर्ष किती झाले माझी
शब्दांबरोबर प्रिती आहे,
मनात माझ्या द्रोणाचार्य
तुमचीच ती प्रतिमा आहे……..
खरे तर एकदा तरी
पायाजवळ बसायचे होते,
माझे चार शब्द साधे
चरणाजवळ ठेवायचे होते…..
आज उद्या करत करत
भेट आपली राहून गेली,
आसवे माझी पुसायला
शब्दांनी आता माघार घेतली……
बाबा माझे शिक्षक होते
त्यामुळे कदाचित ओढ असेल,
शिक्षकांचे शब्ददान
तुमच्या कडून मनी असेल……
भेट आपली दादा अशी
शेवटी बघा राहून गेली,
मोडक्या माझ्या शब्दांची
वाताहात होउन गेली……..
मनात मला वाटले होते
शब्दाविना बोलाल तुम्ही
चित्र माझ्या शब्दांचे
पाहून ऐकून स्पर्शाल तुम्ही…….
आज खूप उदास वाटे
खंत कुणाला सांगू कशी,
कविता स्पर्श न करता
प्रस्थान यात्रा आरंभ कशी….
लाज वाटे माझी मला
रानात का आलो नाही,
शेतामध्ये भूईवरती
पायी तुमच्या बसलो नाही……
अंतरिक्षात चिरनिवास
वसंत फुलो शब्दकुसुमांचा,
लाभो मला शब्द तुमचे
आशिर्वाद लाख मोलाचा…..
© मुकुंद भालेराव
४ आगस्ट २०२३
सकाळी: ०७:३९