घेऊ दे त्याला भरारी
वावरू दे त्या नभांतरी,
उमलू दे वंशास आता
मुक्तपणे विश्वातही……..
दिधलेस तू संस्कार त्याला
अभेद्य मन ते घडविले,
चिंता नको आता तुला
आशिर्वाद जाण्या प्रगतीकडे……..
सुप्त शक्ती मन अंतरी
केलीस जागी तु व्रते,
जिंकू दे अवकाश त्याला
विस्तीर्ण विहरण्या लक्षाकडे……..
वात्सल्य तव हृदयातले
रक्तात त्याच्या गुण पेरिले
मन:चक्षु धैर्य तैसे
शतगुण मनी संप्रेरिले……..
यशकीर्ती आता ये स्वये
भेटण्या त्याला अशी,
जणू वैभवाची ती सखी
भेटेल त्याला ती जशी………
ज्ञानी म्हणती द्वय कुलांचे
सुप्तधन अन ज्ञान सारे,
पिंडी येते निश्चयासी
धनकिर्ती विद्या त्या सवे……..
उद्घोष आता फक्त ऐसा
कुलस्वामिनी नमोस्तुते !
नित्य यावे नाम मूखा
नित्य हृदयी नाम ते……….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ११ आगस्ट २०२३ / वेळ: सकाळी: ०५:५६