Marathi

मधली सुट्टी = स्वल्पविराम

मला नक्की कल्पना नाही कि, आपल्या या समूहाच्या प्रशासकांनी या समुहाचे नाव ‘मधली सुट्टी’ नक्की का ठेवले आहे. हे शिर्षक वाचल्यानंतर माझ्या मनात ह्या शीर्षकाचे जे ‘Decoding’ आले, या सूत्राचा जो अर्थ लावण्याचा प्रयत्न मी केला व त्यातून मला जे उमगले ते इथे मांडत आहे.

‘सुट्टी’ हा शब्द उच्चारताच आपल्या आनंदाला उधाण येते नाही कां, कारण आपल्या बालपणीच्या शाळेच्या आठवणी पुन्हा जागृत होतात, ताज्या होतात; ज्या आपल्या स्मृतीपटलावर कायमच्या कोरलेल्या गेलेल्या असतात. सुट्टी म्हणजे तो हवाहवासा वाटणारा एक विशिष्ट लयीतील घंटानाद! त्याच्याइतका मधुर व आवडणारा दुसरा कुठलाही ध्वनी असूच शकत नाही जगात. खरे बोलतोय ना मी? अपवाद फक्त नाटकाच्या सुरुवातीचा व नंतर अंक सुरु होतानांचा.

साधारणत: पाचव्या वर्गाच्या पुढे, सकाळी अकरा ते पांच अशी शाळेची वेळ असायची त्यावेळी (१९५६ च्या आसपास) व त्यात पहिल्या दोन तासानंतर ५-१० मिनिटांची लघुविश्रांती (सुट्टी) व चार तासानंतर साधारण अर्ध्या तासाची मध्यान्ह भोजनाची मध्य-विश्रांती (मोठी सुट्टी) व पुन्हा १० मिनिटांची लघुविश्रांती असे वेळापत्रक असायचे. थोडक्यात सुट्टी म्हणजे अवकाश, थांबा, किंवा ज्याला इंग्रजीत Gap, Small Stop, Rest; थांबण्याकरिता थोडा विचार करण्याकरीता. हल्ली तर कुणालाच वेळ नाही थांबायला, कशाकरीताच ! Slow, मंदगती, संथगती ह्या शब्दांना आपण आपल्या शब्दकोशातून पार हद्दपारच करून टाकले आहे जणू. नुसते धावणे आणि धावत राहणे. आधी चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्याकरिता, मग अभ्यास करून उत्तम गुण मिळविण्याकरिता, मग प्रवेश परीक्षेत चांगली श्रेणी मिळण्याकरिता, मग उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्याकरिता, मग नोकरी मिळण्याकरिता, मग पदोन्नतीकरीता, पगार वाढीकरीता, विवाहाकरिता, घर घेण्याकरीता, गाडी घेण्याकरीता, हॉलिडेवर जाण्याकरिता वगैरे वगैरे; पण आपण केंव्हा थांबणार आहोत? वय वाढल्यावर असाहाय्य झाल्यावर??

आपण सदोदित ‘सुट्टी’ ची वेळ व अवकाश दुसर्याला ठरवू देणार का? कसे घेणार आपण आपल्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात? केंव्हा आपण क्षणकाल का होईना ‘Pause´चे बटण दाबणार आहोत, दीर्घ श्वास घेणार आहोत, आपल्या बरोबर कोण कोण येत आहे, किती जण मागे राहिले आहेत हे पाहणार आहोत कि नाही? वाटले तर थांबणार आहोत कि नाही!

संगीतात देखील, गायक, वाद्य वाजविण्यात देखणेपणा (नजाकत) येण्याकरिता एक किंवा दोन मात्रांचा अवकाश घेतात कधीकधी. आठवा उस्ताद पद्मभूषण राशीद खान यांचे ते गाणे, ‘आओगे जब तुम ओ साजना, अंगना फुल खिलेंगे’, पण सिनेमात गायलेले नाही तर गाण्याच्या बैठकीत, मैफिलीत गायलेलं. त्या गाण्यात घेतलेला एक स्वल्पविराम, पांच (५) मिनिटे व सत्तावीस (२७) सेकंदावर घेतलेला विराम बघा, म्हणजे लक्षात येईल मी काय म्हणतो ते:

https://www.youtube.com/watch?v=Pn4DpzggKr4. धृपद व पहिला अंतरा संपल्यावर एका मात्रेची विश्रांती कशी सौंदर्य वाढविते. हे गाणे तिलक कामोद रागातील आहे. त्यातील रागाचा संवादी स्वर आहे पंचम.

तुम्ही एक प्रयोग करून बघू शकता. हा प्रयोग मज्जासंस्थीय भाषाविज्ञानाचा (Neuro Lingusitic Programmin) चा आहे. तुमच्या मित्राला / मैत्रिणीला विचारा, “येतोस / येतेस का तू?” मग कांही निमिष जाऊ द्या व मग म्हणा, “माझ्या बरोबर”….बघा त्या छोट्याशा अवकाशाने (Pause) कसा परिणाम साधल्या जातोय. 

ह्या ‘क्षणकाल थांबण्याला’ अनेक पर्यायी शब्द आहेत, जसे, विराम, कालधारणा, विरति, शान्ति, यति, व्युपरम, अन्त, लय, पाठ्च्छेद, विश्राम, पर्वन्, आरमण, विरामण, उपरमते, आरमति, स्तोभति, विजहाति, उपारमति, स्थगयति, मन्दयति, संधि, उच्छवास. कदाचित ‘अमरकोशात’ शोधले तर अजूनही सापडतील खूप समानार्थी शब्द. असो. आपण लिहिण्यात व बोलण्यात देखील स्वल्पविराम, अर्धविराम वापरतो, मग आयुष्य जगण्यात तेवढेच कसे विसरतो!

महर्षि पतंजलीच्या योगशास्त्रात समाधीपादामध्ये एक सूत्र आहे, “विरामप्रत्ययाभ्यासपूर्व: संस्कारशेषोsन्य: ||१.१८|| विराम म्हणजे चित्तवृत्तींचा उपरम (शांत होणे, थांबणे, विश्रांती घेणे) ह्याचा जो प्रत्यय म्हणे प्रतीती किंवा साक्षात्कार, ह्याचा जो अभ्यास म्हणजे पुन: पुन: त्या साक्षात्काराचा अनुभव घेणे हा ज्याच्या पूर्वी असतो म्हणजे हा ज्याला कारण असतो आणि ज्यात चित्त केवळ संस्कारमात्र राहते तो संप्रज्ञाताहून अन्य म्हणजे असंप्रज्ञाताहून अन्य म्ह्यन्जे असंप्रज्ञाट समाधी होय. 

तुम्हाला माहित आहे कि, फक्त ‘वर्तमान’च शाश्वत असतो, कधीही. तोच तेवढा आपल्याला खर्या अर्थाने जगता येतो. तो का एकदा निघून गेला कि, मग ‘तो’ गेलेला क्षण इतिहास बनतो व पुन्हा ‘तो तसाच’ कधीच जगता येत नाही. ‘You cannot dip twice in the same water again’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे.

मला या ठिकाणी जुन्या हिंदी चित्रपटातील दोन गाणी आठवतात, जी खूप अर्थपूर्ण आहेत. ती अशी….

(१) चित्रपट: रात और दिन (१९६७), गायक लता मंगेशकर, मन्ना डे, गीतकार शैलेन्द्र, संगीत: शंकर-जयकिशन, कलाकार आहेत फिरोज खान, नर्गिस व प्रदीप कुमार

दिल की गिरह खोल दो
चुप ना बैठो, कोई गीत गाओ,

महफ़िल मे अब कौन है अजनबी
तुम मेरे पास आओ,
दिल की गिरह खोल दो
चुप ना बैठो, कोई गीत गाओ…….

मिलने दो अब दिल से दिल को
मिटने दो मजबूरियों को,
शीशे मे अपने डुबो दो
सब फ़ासलो दूरियों को,

आँखों मे मैं मुस्कुराऊं
तुम्हारी जो तुम मुस्कुराओ,

महफ़िल मे अब कौन है अजनबी
तुम मेरे पास आओ,
दिल की गिरह खोल दो
चुप ना बैठो, कोई गीत गाओ………

हम तुम ना हम तुम रहे अब,
कुछ और ही हो गये अब,
सपनो की झिलमिल नगर मे
जाने कहा खो गये अब,

हमराह पूछे किसी से ना तुम
अपनी मंज़िल बताओ,

महफ़िल मे अब कौन है अजनबी
तुम मेरे पास आओ,
दिल की गिरह खोल दो
चुप ना बैठो, कोई गीत गाओ……

कल हमसे पूछे ना कोई,
क्या हो गया था तुम्हे कल,
मुड़कर नही देखते हम
दिल मे कहा है चला चल,

जो दूर पीछे कही रह गये
अब उन्हे मत बुलाओ,

महफ़िल मे अब कौन है अजनबी
तुम मेरे पास आओ,
दिल की गिरह खोल दो
चुप ना बैठो, कोई गीत गाओ…….

दुसरे गीत आहे: चित्रपट: वक्त (१९६५), गीतकार: साहीर लुधियानवी, सुनील दत्त, साधना, राज कुमार व शशिकला, संगीत: रवी

आगे भी जाने ना तू,

पीछे भी जाने ना तू,

जो भी है, बस यही एक पल है………

अनजाने सायों का राहों में डेरा है,

अनदेखी बाहों ने हम सब को घेरा है,

ये पल उजाला है, बाकी अँधेरा है,

ये पल गँवाना ना, ये पल ही तेरा है,

जीने वाले सोच ले,

यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू……….

इस पल के जलवों ने महफ़िल सँवारी है,

इस पल की गर्मी ने धड़कन उभारी है,

इस पल के होने से दुनिया हमारी है,

ये पल जो देखो तो सदियों पे भारी है,

जीने वाले सोच ले,

यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू………

इस पल के साये में अपना ठिकाना है,

इस पल के आगे की हर शय फ़साना है,

कल किसने देखा है, कल किसने जाना है,

इस पल से पाएगा, जो तुझको पाना है,

जीने वाले सोच ले

यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू………

ही दोन गीते जवळपास ५० वर्षांपूर्वीची आहेत. त्या गीतकारांनी लिहिलेली गीते व त्या चित्रपटाच्या निर्मात्याने व दिग्दर्शकाने त्या चित्रपटात ज्या अर्थी ही गीते उपयोगात आणली त्या अर्थी ते त्या वेळच्या सामजिक मनाचे निदर्शक आहे, असे मला वाटते. खरे तर कोणतीही कला त्यावेळच्या सामजिक व इतर परिस्थितीचे प्रतिबिंब असतात. यावरून असा निष्कर्ष काढता येईल कि, तेंव्हा देखील लोक बंद (Introvert – Closed Mind) मनाने जगत होते. आतल्या आत कुढत कुढत तथाकथित आयुष्य जगात होते व आज पन्नास वर्षानंतर देखील आपण तिथेच अडकून पडलेळो आहोत, जशी ग्रामोफोनवर तबकडी अडकून पडावी. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे,

‘Past is History, Future is Mystery and Only Present is a Gift given by Gold. So, receive and accept it and enjoy it.’

थोडक्यात आत्ताच्या क्षणात जगा, वर्तमानात जगा. भूतकाळात अडकू नका व भविष्याची वाट पहात बसू नका. याचा अर्थ असा मुळीच नाही कि, मी महर्षी चार्वाकांच्या नास्तिक दर्शनाचा पुरस्कार करीत आहे, ‘यावद् जीवेत सुखं जीवेत, ऋणम् कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:|’

साधारणत: २० व्या शतकात, फ्रान्समध्ये दुसर्या महायुद्धानंतर (१९३९–१९४५) खास करून यूरोपमध्ये अत्यंत नैराश्याचे वातावरण पसरू लागले होते, युद्धाच्या विनाशकारी परिणामांमुळे. कशाला जगायचे व कसे जगायचे असे नैराश्यपूर्ण विचार तरुणांच्या मनात येत होते आणि त्या तशा दु:खाच्या सावटाखाली जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न व त्यातून स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला. याचे कारण म्हणजे तिथे त्यावेळी ते भूतकाळाच्या काळ्या दाट छायेत होते. त्यांना भूतकाळातून स्वत:ला सोडवून घेणे कठीण जात होते. खरे भारतीय तत्वज्ञान ‘ब्रम्ह सत्यम् जगम् मिथ्या’ हेच तर म्हणते. असो. तर त्या पार्श्वभूमीवर ‘अस्तित्ववादाचे’ (Existentialism) तत्वज्ञान उदयास आले, तसे ते इतर क्षेत्रातही पसरले. हा अस्तित्ववाद काय आहे.

एक तत्वज्ञानाची चळवळ आहे, जी विसाव्या शतकात उदयास आली. ह्या तत्वद्न्यानामध्ये स्वत:च्या अनुभवावर आधारित आयुष्याचा अर्थ शोधणे हे प्रमुख होते. हे तत्व सुप्रसिद्ध तत्वज्ञ जीन पॉल सात्रे, अल्बर्ट क्याम्स आणि फ्रेडरिक नित्झशे ह्यांच्या मते अस्तित्ववाद तत्वज्ञान मानवी अस्तित्व, स्वातंत्र्य आणि जबाबदारी ह्यांच्या गुंतागुंतीवर आधारलेले आहे. हे तत्वज्ञान मानवी अस्तित्वावर भर देते. ते असे म्हणते कि, प्रत्येक स्वत:चा जबाबदार आहे त्याच्या स्वत:च्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्याकरिता, त्याने बाहेरील धर्म, सामाजिक दंडक या सारखी गोष्टींवर अवलंबून न राहता आपल्या आयुष्याचा अर्थ स्वानुभवावर शोधावा. त्या तत्वज्ञानातील एक मुद्दा असाहि आहे कि, मनुष्य कुठल्याही पूर्व उद्देशाने जन्म घेत नाही आणि म्हणून त्याने स्वत:च आपल्या विचारातून व त्यानुसार कार्यामधून आपला आयुष्याचा अर्थ परिभाषित करावा. इथे मी वैयक्तिकरीत्या ह्या मताशी सहमत नाही, कारण महर्षी पतंजलींनी योगसुत्रांमध्ये विभूतीपादाम्ह्द्ये या उलट म्हटलेले आहे,

संस्कारसाक्षात्करणात्पूर्वज्ञानम् ||३.१८|| सध्याच्या जन्माच्या पूर्वी प्रत्येकाला अनेक जन्म भोगावे लागले आहेत. त्या जन्मात ज्या विषयांचे भोग घेतले असतील, ज्या क्रिया हातून घडल्या असतील आणि जे अनुभव आल असतील त्या सर्वांचे संस्कार चित्तावर घडलेले असतात. त्यातील जे संस्कार प्रकृत जन्म व त्यात प्राप्त होणारे भोग ह्यांशी अनुगुण अस्त. ते ‘उदार’ ह्या अवस्थेत येऊन त्यांच्या योगाने प्रस्तुतची देह्यात्र चाललेली असते. ह्यां व्यतिरिक्त इतर सर्व संस्कार ‘प्रसुप्त’ अवस्थेत असतात. ह्या प्रसुप्त संस्कारांवर संयम क्ल्येआने ते ज्या वासनांचे, क्रियांचे व अनुभावांचे असतील, त्या वासना, क्रियांचे व अनुभवांचे असतील. त्या वासना, क्रिया व अनुभव स्मरणरूपाने बुद्धीत आरूढ होतात, आरूढ होणे हेच संस्काराचे साक्षात्करण होऊ. असा रीतीने संस्कार शेष वासना, क्रिया अथवा अनुभव साक्षातपणे दृष्टीस पडले म्हणजे ते ज्या जन्मात घडले असतील त्या जन्माचेही स्मरण घडते. मनाचा असा एक धर्म आहे, कि त्याला जेंव्हा कोणत्याही गत गोष्टींचे स्मरण घडते, तेंव्हा केवळ त्या एकाच गोष्टींचे स्मराण होते असे नसून तिच्याशी संलग्न असलेल्या इतर अनेक गोष्टींचे स्मरण होते, ह्यालाच पाश्चात्यांच्या मानसशास्त्रात (Law of Associaiton) संनिध नियम असे म्हणतात. नियम असे म्हणतात. अर्थात प्रसंगी संस्काराचे साक्षातकरण होताच ते ज्या जन्मातले असतील त्या जन्माची सुद्धा स्मृती होते.

स्वातंत्र्याची जबाबदारी: ह्या तत्वद्न्यानामध्ये, स्वातंत्र्य व त्याची जबाबदारी यावर भर दिलेला आहे, म्हणजे एकदा का आपण आपल्या स्वांतंत्र्याचा उद्घोष केला कि, आपले स्वत:छे निर्णय आपण घेतले कि, मग ते निर्णय व त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारीसुद्धा आपलीच असते. हे वाचायला व ऐकयला खूप छान वाटते, पण हे स्वातंत्र्य व्यक्तीला त्याच्या आयुष्याला त्याला हवा तसा आकार देण्याची मुभा देतो, परंतु हे सर्व करत असतांना त्यातून मग आपोआपच चिंता (Anxiety) व अनिश्चितता (Undertaintly) निर्माण होते.     

वेदना व खरेपणा: अस्तित्ववाडी तत्वज्ञान म्हणते कि मनुष्य जन्माबरोबर चिंता येणारच. नाशिवंत शरीर, अंतत: निर्थक जीवन आणि आयुष्याचा अर्थ शोधण्याकरिता सतत सुरु असणारा संघर्ष यातून येणारे नैराश्य, हताशपणा व अस्तित्वाची भीती, काळजी, व धास्ती येतेच. हे  तत्वद्न्यान खरेपणावर खूप जोर देते. ते म्हणते कि माणसाने अआयुश्यात येणर्या परिस्थितीला स्वीकारून तिला तोंड दिले पाहिजे, ते सर्व सोडून पळून नाही जायचे किंवा ते टाळायचे सुद्धा नाही. खरेपणाची साथ स्वीकारली तरच आयुष्याचा खरा अर्थ सापडेल. आदी शंकराचार्य त्यांच्या चर्पटपंजारीका स्तोत्रात म्हणतात,

अंगं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम् ।
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुच्चत्याशा पिण्डम् ।। ६ ।।
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।। ‘आशा पिंडम्’ असे म्हणण्याचे कारण लोकांनी ऐहिक जगातून आपल्याला मुक्त करून परमेश्वराचे ध्यान करावे, परंतु याचा अर्थ आयुष्यापासून घाबरून पळून जावे असा मुळीच नाही. 

तसेच आचार्यांनी ‘निर्वाणशटकं’ मध्ये स्वत:चे वर्णन किती सुंदर केले आहे पहा. खालील फक्त एक कडवे येथे उधृत करत आहे.

मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं 
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः 
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। 1 ||

मी मन नाही, मी चित्त नाही, मी कान नाही, मी जिव्हा नाही, मी नाक नाही, मी आकाश नाही, मी तेज नाही आणि मी वायूसुद्धा नाही. मग मी काय आहे तर चिदानंद आहे, शिवस्वरूप आहे आणि शिव आहे.

आजच्या आधुनिक जगात देखील अस्तित्ववादाचे हुंकार ऐकू येतात. आजही जवळपास सर्व जण आयुष्याचा अर्थ व उद्देश आपआपल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करीतच आहेत. आताच्या धावपळीच्या जगात अस्तित्ववादी तत्वज्ञान व्यक्तीस त्याच्या आयुष्याची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करते, स्वातंत्र्य स्विकारण्यास सांगते आणि त्यातून आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करण्याचे वा निर्माण करण्याकरिता प्रोत्साहन देते. ते म्हणते कि आपण आपल्या निवडीकडे, निर्णयाकडे, मूल्यांकडे आणि वैयक्तिक वाढ, प्रगती, भरभराट व खरेपणाकरिता (Reflection on our Choices, Decisions, Values, Individual Progress and Developement and Authenticity.) विचार करावयास हवा आणि ते खरे आहे.

भगवान विष्णूंचा अकरावा अवतार भगवान गौतम बुद्ध आहे, हो मी समजून उमजून लिहित आहे. गौतम बुद्ध अकरावा अवतार आहे. ज्यांना यात शंका येत असेल त्यांनी पूजेच्या पूर्वी करावयाचा संकल्प काय आहे बघा, ‘श्रीमदभगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रम्हणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविन्शे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बुद्विपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिण तिरे बौद्धवतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे …..’, तर भगवान गौतम बुद्ध काय म्हणाले होते, “आत्म दीपो भव|” स्वत:च्या आयुष्याला स्वत:च प्रकाशमान करन्याकारिता दीप बन. या विषयावर एक खुप सुंदर पुस्तक आहे. त्याचे नांव आहे ‘If You Meet Buddha on the Road, Kill Him, The Pilgrimage of Psychotherapy Patients व त्या पुस्तकाचे लेख आहेत श्री. स्टीफन बी. कोप्प. अस्तु.

यासंबंधात श्री.एखर्त टोल (Eckhart Tolle) या लेखकाने ‘The Power of Now’  या नावाचे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्यातील कांही अंश असा,

प्रत्येक व्यक्तीच्या उर्जा क्षेत्रात साठवून राहिलेल्या जुन्या भावनिक वेदना असतात. ही एक प्रकारची अर्ध-स्वयंचलीत मानसिक स्थिती आहे. ह्या वेदनेमध्ये, त्या सर्व भावना असतात ज्याला त्या व्यक्तीनी तोंड दिलेले नसते, त्या स्विकारलेल्या नसतात व ती परिस्थिती तशीच जाऊ देतात. नकारात्मक भावना गेल्या तरी त्या मागे कांही अंश सोडतातच व त्या शरीरपेशींमध्ये राहतात. ह्या शरीरातील वेदना-पेशी सक्रीय असतात व निष्क्रिय असतात. जेंव्हा त्या पुन्हा सक्रीय बनतात, तेंव्हा त्या पुन्हा तशाच वेदनेची अपेक्षा करतात. आपण जर वर्तमानामध्ये जगत नसू तर, नात्यातील प्रश्न, नकारात्मक विचार आपल्या मनावर ताबा मिळवतात. ह्या अशा प्रकारे नकारात्मक विचार कायम राहतात. दु:खाचे व्यसन अत्यंत वाईटच. हो दु:खाचे व्यसन. (Addiction of Unhappiness).

थोडक्यात काय तर आपल्या आयुष्यात ‘आनंदाचे डोही आनंद आनंद’ आपणच निर्माण करू शकतो, कारण आपल्यला आनंद कसा मिळेल, काय केल्याने मिळेल याची सारी रासायनिक सूत्रे (Chemicla Formulas) फक्त आपल्यालाच माहित असतात व ती आपल्या मेंदुमध्ये खूप स्पष्ट असतात. जशी आपल्या स्मृतीपटलावर, आवश्यक तेंव्हा ग्रथित केलेली माहीती [Coded informaiton on the Printed Circuit Board (PCB)] तर मग वाट कशाची पाहताय? चला चला, वेळ होतोय आपल्याला. बना विश्विमित्र आपले. आपणच आपल्या मनोवांछीत आनंदमय आयुष्याची ठरवून ‘मधली सुट्टी’ आपली आपणच घ्यायची आत्ता.


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: १६ ऑगष्ट २०२३
वेळ: सायंकाळी: १८:३०

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top