अस्तित्व जीवनाचे
सूस्थिर मूळ आहे,
ते स्थान अमृताचे
आहे विनायकाचे…..
बुद्धीची देवता तो
आपल्यात स्थिर आहे,
चिंता नको जीवाला
सान्निध नित्य आहे…….
जे मूळ चक्र आहे
तेथे निवास त्याचा,
अस्तित्व मानवाचे
त्याचेच फलितरूप आहे…….
सारेच विघ्न हरतो
आरंभ सदगुणांचा,
त्याच्या कृपेत सारे
आयुष्य तत्त्व आहे…….
आरंभ तो जगाचा
आहे अनंत ऐसा,
ते रुप गणेशाचे
प्रत्यक्ष ते शिवाचे…
तो मार्ग मुक्तीचाही
दावी गणेश सर्वा,
प्रत्यक्ष रूप निर्गुण
आरंभ कौतुकाचा……
त्यालाच नित्य नमुनी
जावे चक्र मार्गे
हृदयात स्थापूनी त्या
तेवो अनंत ज्योती……
हृदयात उमललेली
शक्ती अशीच राहो,
लाभो अनंत सर्वा
आशीष गणपतीचे……
मांगल्य रूप त्याचे
आनंद कंद आहे,
विद्या मिळोत सर्वा
तो आदिनाथ आहे….
तो भाव सात्वीकाचा
लाभो सदैव सकला,
आयुष्य ज्ञान धनदा
बुद्धी मिळो नरांना…….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
गणेश चतूर्थी
दिनांक: १९ सप्टेंबर २०२३