अशी सकाळ कधी झालीच नाही,
रंगांची बरसात झालीच नाही,
सोन्याचा अभिषेक हिमशिखरावर,
असा कधी झालाच नाही………..
महेशाच्या मस्तकावर,
सोने कूणी असे उधळलेच नाही,
शुभ्र हिमाच्या शालीला,
सोन्यात कुणी विणलेच नाही………..
केदाराच्या मंदिराला सुवर्णाचे,
वर्ख कूणी चढविलेच नाही,
पवित्र गंधीत वायू कणांना,
सोन्याने कूणी भारलेच नाही…………
चित्तवृत्ती अशा प्रफुल्लित,
आधी कधी झाल्याच नाहीत,
धर्तीवर स्वर्ग असा सुवर्णमय,
कधी कधी झालाच नाही………….
निमीषात जलकण कधी,
सोन्यात रुपांतरीत झालेच नाहीत,
जन्मजन्मांतरीचे स्वप्न माझे,
खरे होईल कधी वाटलेच नाही…………
एक दिवस उगवला असा,
प्रभाती मी मंत्रमुग्ध झालो,
शिवाच्या कृपेने केदारी,
सुवर्णमय भाग्यवंत झालो…………..
आयुष्य सोनेरी होउन गेले,
मन देखील कांचन झाले,
सगळ्या माझ्या जाणीवांचे,
सूवर्णांकीत साक्षात ब्रम्ह झाले……….
© मुकुंद भालेराव
फोंडा- गोंय
दिनांक: ११ आक्टोबर २०२३
रात्रौ २३:३८