काय हे वाटे मनाला,
माझेच मजला हे आता,
व्यर्थ वाटे जगणे असे,
मारून साऱ्या भावना…….
कुणा वाटे हे निरर्थक,
माझेच जगणे फाटके,
लावू आता ठिगळे किती,
व्यर्थ आहे हे वाटणे…….
केले असे सर्व कांही,
सर्वास सुखिया पाहणे,
पावता ते सुख सर्वही,
आता न वाटे कांही उणे……..
आप्त माझे ईष्ट माझे,
सारेच माझेच वाटणे,
निषाद आहे फक्त ईतुका,
फक्त माझेच आहे वाटणे……..
नाही आता धनसंपदा,
रिक्त ही झोळी अशी,
फाटली ती सहस्त्राक्षी,
तरी दु:ख ना मज मानसी……
दोष ना आहे कुणाचा,
व्यर्थ आता बोलणे,
चालतो मी मार्ग माझा,
माझेच मजला साहने…..
साथ देती हात देती,
सोबतीला सर्वही,
फक्त म्हणती ऐसेच व्हावे,
माझी न रुचते वैखरी…….
शिक्षित झालो काय झाले,
ज्ञान सारे मम मनी,
दिसते न आहे ते कुणाला,
कांही न बोलणे वैखरी……..
अंतराचा शोध आता,
अंतर्यामी चालला,
चेतती ह्रुदयस्थ ज्योती,
पसरेल प्रकाश मम मना……..
ईश भक्ती मार्ग आहे,
मन:शांती ध्येय ही,
कांही न लागे भक्तीला ते
फक्त हरीची आवडी……….
तो चिरंतन सत्य आहे,
वृथा साऱ्या कल्पना,
अंश त्याचा सत्य इतके
रुजले असे माझ्या मना……..
झडो आता वासना ह्या
अन मनाचे खेळ ते
फक्त जडावे मैत्र ऐसे
हरी आवडी मम मानसी
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ८ ऑक्टोबर २०२३ / वेळ: मध्यरात्र: ००:२२
दिनांक: १ नोव्हेंबर २०२३ / सायंकाळी : १७:५१