जराशी कुठे ती, तिथे थांबलेली,
नदीच्या किनारी, पुढे वाकलेली…………
शुभ्रधवल वस्त्रामध्ये, ती वाटे तपस्वी,
विहरत मेघवर्णी, केस लडिवाळ सारे………
करीचा घडा तो, जला माजी गेला
घड्याच्या जलाशी, पाहते स्वरुपा……..
नयनात भरले, स्मितरंग सारे
स्वतःच्या रुपाचा, कसा मोह वाटे………
तशी थांबली ती, नदीच्या किनारी
मुखावरी त्या, महीरप गुलाबी………..
नुरे भान तिजला, स्थळ काळाचे
क्षणांच्या प्रवाही, तिचे चित्त थांबे……….
अवचित तैसी, हवा मंद आली
वर्षा फुलांची, झाली गुलाबी………
तशी पाहता ती, नभांगणाशी
निशिकांत हसता, प्रेमार्द्र झाली…….
कसे काय झाले, कळले न तिजला
पदन्यास तिचे, मोहवी मनाला…….
उत्फुल्ल उन्मेष, उमलले मुखाशी
जणु चांदण्यांची, आरास झाली………
वनी रातराणी, यमनात न्हाली
माझ्या मनाला, धुंदी निराळी………
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ६-११-२०२३
वेळ: सकाळी: ०७:१२