सांगितले मी मला
किती वारंवार
नको धरू गोडी
विषयाची………
वासना मनीची
जाळते अंतरा
अडविते रस्ता
हरीपदाचा………
नसे केले पूण्य
मागच्या जन्मात
करतो सुरुवात
आता श्रीहरी………….
जेंव्हा मिळे मला
जागा गुरुपदी
तोवरी श्रीहरी
सर्वच माझे……….
कृपा त्याने केली
भक्त प्रल्हादा
प्रगटला चिरुनी
स्तंभ ऐसा…………….
भक्ताचे कारणे
धावसी सर्वदा
रक्ष्ण्या भक्तासी
तू ची सदा……….
माझे मनीची आस
का न कळे तुजला
सर्वज्ञ असशी तू
माधवा………….
करणे कांही बरवे
मानव रूपा येउनी
आत्मभान सापडो
तवपदी……………
मागणे हे माझे
नसे कांही फार
व्हावे सुस्थिर चित्त
तवपदी………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ०५-११-२०२३
रात्री: २३:०५