दिव्यांची आरास व
फटाक्यांची आतिषबाजी
म्हणजे दिवाळी का?
गोड पदार्थांची रेलचेल,
नवीन कपड्यांची खरेदी
म्हणजे दिवाळी का?
पाहुण्यांची वर्दळ,
मित्रांची आवक
म्हणजे दिवाळी का?
महागड्या आणि गरज नसलेल्या
वस्तूंची खरेदी
म्हणजे दिवाळी का?
नाही, मुळीच नाही,
हे सर्व म्हणजे दिवाळी नाही……………………..
हे सर्व असायला हरकत नाही
पण या ही पलीकडे जाऊन
एकमेकांशी जोडण्याची मनोमन
तीव्र इच्छा म्हणजे
दिवाळी……………………
अंत:करणात ओलावा निर्माण
करणारी कृती म्हणजे
दिवाळी……………..
नाते जपणारे व असलेले नाते
घट्ट करणे म्हणजे
दिवाळी…………………
एकमेकांविषयी ओढ
निर्माण निर्माण करणारी
प्रत्येक गोष्ट म्हणजे
दिवाळी………………………..
माया, ममता व आपुलकी यांची
अविरत बरसात म्हणजे
दिवाळी……………
दुसर्याच्या चुकांना नजरेआड
करण्याचा दिलदारपणा
दाखविणे म्हणजे
दिवाळी…………………..
आपल्या वागण्यात पारदर्शकता
बाळगणे म्हणजे
दिवाळी…………………….
जे ही बोलतो ते हृदयातून
बोलणे म्हणजे
दिवाळी………………….
मी दुसर्यासाठी काय करू शकतो
याचा विचार करून जगणे म्हणजे दिवाळी……………………….
दुसर्याच्या वेदना व दु:ख पाहून
अंत:करण कासवीस होणे म्हणजे दिवाळी……………………..
आपल्या घासातील घास
काढून भूकेलेल्याच्या तोंडी
घालणे म्हणजे
दिवाळी……………
सर्वांबरोबर मैत्र घडणे, आणि
सर्वांचा सखा बनणे म्हणजे
दिवाळी…………
दुर्दैवाने दुष्कर्मात अडकलेल्यांना
सत्कर्मात रस वाटू लागणे
म्हणजे
दिवाळी………
सगळ्यांच्या कल्याणाची सतत
इच्छा बाळगणे म्हणजे
दिवाळी…………
सगळ्यांच्या आयुष्यातील
दु:खाचा अंध:कार
दूर होवो अशी कामना
करण्याचा काळ म्हणजे
दिवाळी………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: १३ नोव्हेंबर २०२३
रात्री: ००: २९