अपरान्ह काली तिचे सूर आले
प्रतिक्षेत भिजुनी जणू शब्द आले,
तिची आर्त हाक तशी वेदना ती
नको ती प्रतिक्षा आता भेटण्याची……
कलत्या रवीला सांगू कसे मी
तिला आठविता अस्वस्थ होते,
नको वेदना त्या तिच्या मनाला
प्रिती फुलावी असे वाटते ते………..
मनी मिलनाची कशी ओढ माझ्या
गेलो तिथे मी तिला भेटण्याला,
प्रतीक्षेत होती सस्मित नयनी
युगांची प्रतिक्षा नयनात पाणी……
त्वरेने पुढे मी अतिशीघ्र गेलो
मनाच्या सवे मी धावुन गेलो,
गवाक्षा किनारी उभी स्नेह मुग्धा
निमीषात मी मज विसरून गेलो…….
तिच्या बाहुमध्ये असा हरवलो मी
विसरुन मजला तिचाच झालो,
विरली प्रतिक्षा तशी मिलनाची
माझ्यामध्ये ती एकात्म झाली……..
नुरले न कांही आता सांगण्याचे
तसे कांहीं आता समजावयाचे,
दुजे कांहीं आता नाही मनात
फुलो पारिजात असा जीवनात……
© मुकुंद भालेराव
फोंडा – गोंये
दिनांक: १९ नोव्हेंबर २०२३
दुपारी: १५:४७